Monday, January 13, 2025
Homeताज्या घडामोडीअवकाळी पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ

अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ

पूर्व आणि पश्चिम उपनगरात काही ठिकाणी पावसाची हजेरी

मुंबई : सकाळी झालेल्या अवकाळी पावसाने मुंबईकरांची काही प्रमाणात दाणादाण उडाली. पूर्व उपनगरात चेंबूर, मुलुंड, कुर्ला तर पश्चिम उपनगरात बांद्रा, सांताक्रुझ, बोरिवली, दहिसर या परिसरात आज सकाळी अवकाळी पाऊस पडला. वाऱ्याचा वेगही वाढला होता. ठाणे जिल्ह्यातही बदलापूर, अंबरनाथ भागात पहाटे पाऊस झाला. यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांची तारांबळ उडाली.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मराठवाडा, विदर्भासह, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र परिसरात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. काल रात्रीच्या सुमारास काही भागांना वीजेचा कडकडाट आणि मुसळधार पावसानं झोडपून काढलं. मागील अवकाळीच्या फटक्यातून अद्याप न सावरलेल्या बळीराजावर हे दुसरं एक संकट कोसळलं आहे. पुढचे दोन दिवस राज्यातील वातावरण ढगाळ राहून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

वसई- विरारमध्येही मध्यरात्री पावसाच्या सरी

वसई-विरारमध्ये रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी रिमझिम पाऊस पडला. सध्या परिसरात पाऊस नाही, पण ढगाळ वातावरण आणि काळेकुट्ट ढग असल्याने दिवसभरात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यातही फटका

पुणे शहर परिसरात रात्री धायरी, पौंड रोड, वडगाव मावळ भागात विजांचा कडकडाटसह पाऊस झाला. साताऱ्यात कराड शहरासह ग्रामीण भागात वीजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाने हजेरी लावली. पुण्याच्या भोर तालुक्यातील विसगाव खोरे परिसरात असणाऱ्या गावांना काल संध्याकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसानं झोडपलं. अर्धा तास पडलेल्या मुसळधार पावसानं आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झालं. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

नाशिकमध्येही जोरदार पाऊस

नाशिक मध्ये रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने आधीच अडचणीत आलेला बळीराजा आणखी अडचणीत सापडला आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे अद्यापही झालेले नसताना आता पुन्हा एकदा या अवकाळी पावसाने बळीराजाला झोडपून काढले. अचानक झालेल्या या अवकाळी मुळे कांदा, कोब, द्राक्ष आणि भाजीपाला या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले.

मराठवाड्यात काय स्थिती?

मराठवाड्यातही छ. संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. संभाजीनगरात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. तर ग्रामीण भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर दिसून आला. हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात रात्री अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे संत्रा, आंबा या फळबागांचे नुकसान झाले. तर उभ्या असलेला गहू, हरबऱ्यासह इतर पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -