मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा चार वर्षांत पूर्ण होतो. ७८० किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे काम जलदगतीने होऊ शकते, तर मग ५८२ किलोमीटरचा मुंबई-गोवा महामार्ग नऊ वर्षे झाली तरी अद्याप पूर्ण का झाला नाही, अनेक सरकारे बदलली तरी रस्ता का रखडलाय,’ असे प्रश्न कोकणातील आमदारांनी विधानसभेत उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरले. यानिमित्ताने कोकणातील सर्वपक्षीय आमदारांची एकी दिसून आली. त्यावर येत्या मे महिन्यापर्यंत सिंगल लाइन, तर नऊ महिन्यांत संपूर्ण रस्ता पूर्ण करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. गेले अनेक वर्षे हा विषय विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत येत आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या महामार्गाच्या चौपदरीकरणासंदर्भात केंद्र सरकारची भूमिका ही नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. देशात रस्त्याचे जाळे निर्माण करणारे हेविवेट मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्ग लवकर पूर्ण व्हावा यासाठी रस्ता बाधितांचे नुकसान होऊ नये यासाठी एकरी दामदुप्पट दर सरकारी दरबारी मंजूर केला. त्यामुळे स्थानिकांच्या विरोधामुळे किंवा अन्य अडचणींमुळे हा मार्ग रखडलेला नाही ही बाब नमूद करावीशी वाटते.
आठ महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्या सरकारच्या काळात झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न सभागृहात उपस्थित झाला होता. अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी विचारला होता. आमदारांच्या प्रश्नाला तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या उत्तरात महामार्गाची रखडलेली कामे २०२२ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. आज १५ मार्च २०२३ उजाडला आहे. पुन्हा तोच प्रश्न कोकणातील आमदारांना विचारावा लागत आहे. त्याची कारणे तशी आहेत. कोकणातील माणूस हा नोकरी-धंद्याच्या निमित्ताने मुंबई-पुणे शहरांत स्थिरावलेला असला तरी, गावाशी त्याची नाळ जोडलेली आहे. मुलांना शाळेला सुट्टी पडल्यानंतर एप्रिल महिन्यात, गौरी-गणपती सणाला आणि होळीनिमित्ताने कोकणात कुटुंबासह गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोकण रेल्वेचा पर्याय उपलब्ध असला तरी रेल्वे स्थानकापासून खेडेगावात जाण्यासाठी तेथील रिक्षा किंवा टमटमसारखे वाहन केल्यास मुंबईपासून गावी जाण्यासाठी तिकिटाची जी किंमत आहे त्यापेक्षा जास्त खर्च हा स्थानिक वाहनासाठी लागत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरून जाण्याकडे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील अनेकांचा कल असतो. गेल्या आठ-नऊ वर्षांत मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाच्या कामानिमित्त दुरुस्तीचे काम जागोजागी होत असल्याने वाहतुकीची कोंडी ही पाचवीला पुजलेली आहे. चौपदरीकरणाचे काम रखडल्याने तसेच रस्त्याची दुरवस्था झाल्याने सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ९५ अपघात झाले आहेत.
या महामार्गावरील कासू ते इंदापूर हा रस्ता सर्वात खराब असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे. हा महामार्ग लवकर पूर्ण व्हावा या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांत दोन मोठी आंदोलने झाली. मात्र १५ दिवसांत काम सुरू करतो, असे पोकळ आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. आता या महामार्गासाठी राज्याने केंद्र शासनाला विनंती करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी आणि त्यात कोकणातील लोकप्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी आमदारांकडून जोर धरू लागली आहे. सध्या चौपदरीकरणाच्या कामाची सद्यस्थिती काय आहे ते पाहता येईल. मुंबई-गोवा महामार्गामध्ये भू-संपादन, विविध खात्यांच्या परवानग्या यामध्ये बराच कालावधी लागला, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. गोव्यापासून राजापूरपर्यंत काम पूर्ण झाले आहे. कणकवलीजवळ १०० मीटरपर्यंतचे भू-संपादन वगळता सिंधुदुर्गात भू-संपादन पूर्ण झाले आहे. रत्नागिरीतील परशुराम घाटामध्ये भौगोलिक परिस्थिती साथ देत नाही. तिथे कटिंगचे काम करताना माती कोसळत असल्याने घाटरस्ता पूर्णपणे बंद करून काम करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील आमदारांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न केला आहे. या बैठकीला केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंधित अधिकारी उपस्थित होते. जे काम अपूर्ण राहिले आहे, त्या सर्व कामाची प्रगती पाहण्याच्या दृष्टीने या कामाचे शूटिंग ड्रोनच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. महामार्गाच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हेच या सरकारचे उद्दिष्ट आहे. महामार्गाचे काम १० पॅकेजेसमध्ये सध्या सुरू आहे. त्यापैकी ५ पॅकेजेसचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पॅकेजेसचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्ग चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदारांच्या बैठकीत दिले असले तरी २०२५ आता उजाडायला नको, अशी कोकणवासीयांची भावना आहे.