कामाचा ताण काही अंशी कमी
मुंबई (प्रतिनिधी) : जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्यातील १८ लाख कर्मचारी तीन दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. या संपामुळे रुग्णालयीन कामकाजावर ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत जे.जे.रुग्णालयातील १२२ बदली कामगारांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेत कामावर दाखल झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयावरील कामाचा ताण काही अंशी कमी झाला आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील १८ लाख शासकीय कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून रुग्णांची गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांची मोठी संख्या असलेल्या जे.जे. रुग्णालयातील बदली कामगारांनी बेमुदत संपावर न जाण्याचा निर्णय घेत रुग्णालयावरील ताण कमी केला आहे.
जे.जे. गेली २५ ते ३० वर्षे रुग्ण सेवा करणारे जे.जे. रुग्णालयातील बदली कामगार कायम सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. औद्योगिक न्यायालयाने २७ जुलै २००३ मध्ये आणि १४ फेब्रुवारी २०२२ रोजी मॅट कोर्टाने जे. जे. रुग्णालयातील बदली कामगारांना कायमस्वरुपी सेवेत घ्या असे आदेश राज्य सरकारला दिले होते. दोन्ही न्यायालयाने आदेश देऊनही बदली कामगारांना कायमस्वरुपी सेवेत घेण्यास टाळाटाळ केली जात असून जे.जे. रुग्णालयातील बदली कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. २५ वर्षांपासून लढा देणाऱ्या ११८ कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोविड काळातही १२ ते १६ तास ड्युटी करून जबाबदारी पार पाडली. कोविड काळात ५० हून अधिक बदली कामगारांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोनामुळे दोन बदली कामगारांचा मृत्यू झाला. आता राज्यातील १८ लाख कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. अशा वेळी आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संपात सहभागी होता आले असता. मात्र रुग्णालय प्रशासन व विशेष करून रुग्णांना त्रास सहन करावा लागू नये यासाठी कामगार कामावर रुजू झाल्याचे जे.जे. रुग्णालयातील बदली कामगारांनी सांगितले.