छ. संभाजीनगर : एकीकडे इन्फ्ल्युएन्झा (H3N2) व्हायरसमुळे चिंता वाढली असताना आता पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन दिवसांत कोरोनाचे १५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आरोग्य विभागाकडून पुन्हा एकदा कोरोना चाचण्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात सरकारी कर्मचा-यांचा संप सुरू असतानाच अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता मार्च, एप्रिल व मे महिन्यातच कोरोनाची साथ अधिक तीव्र होती. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी कोरोना उद्रेकाची ही चिन्हे तर नाहीत ना, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.
दरम्यान महानगरपालिकेने प्रत्येक आरोग्य केंद्रावर आरटीपीसीआर आणि अँटिजेन टेस्टची सुविधा सुरु केली आहे. तर संशयित रुग्णांची टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. दोन-तीन दिवसांत केलेल्या अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचण्यामधून १५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. यातील दोन रुग्ण ग्रामीण भागातील असून १३ रुग्ण शहराच्या विविध भागातील आहेत. तसेच कोरोनाचा धोका लक्षात घेत मेल्ट्रॉनमधील उपचार सुविधा सज्ज केली जात आहे. नागरिकांनी गर्दीत वावरताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले.
दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत H3N2 व्हायरसचे ११ रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. मात्र कोणत्याही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा शहरातील आरोग्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.