मुंबई : सलमान खानच्या ‘जय हो’ मधील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते समीर खक्कर यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका नुक्कड (१९८६) मध्ये ‘खोपडी’ या मद्यपीची अतिशय प्रसिद्ध व्यक्तिरेखा समीर खक्कर यांनी साकारली. तेव्हापासून ते खोपडी या नावानेही ओळखले जात होते.
समीर खक्करचे भाऊ गणेश खक्कर यांनी सांगितले की, समीर खक्कर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती. काल दुपारी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ते बेशुद्ध झाले आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आज पहाटे ४.३० वाजता त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले.
बोरिवलीतील बाभई नाका स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
समीर खक्कर हे बोरिवली येथील आयसी कॉलनीमध्ये एकटेच राहत होते. समीर खक्कर यांची पत्नी अमेरिकेत राहते. अॅमेझॉन प्राइमच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फर्जी’ या मालिकेत ते अखेरचे दिसले होते.
समीर त्यांच्या ३८ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत विविध टीव्ही शो आणि चित्रपटांचा भाग होते. या अभिनेत्याने शोबिझमधून थोडा ब्रेक घेतला होता आणि ते यूएसएमध्ये स्थायिक झाले होते. नंतर, त्यांनी पुनरागमन केले आणि दोन गुजराती नाटके देखील केली आणि सलमान खानच्या ‘जय हो’ मधील भूमिकेमुळे ते प्रसिद्ध झाले.
समीर यांनी मनोरंजन, सर्कस (शाहरुख खानसोबत) सारख्या मालिकांमध्येही काम केले. समीर यांनी ‘परिंदा’, ‘ईना मीना डीका’, ‘दिलवाले’, ‘राजा बाबू’, ‘आतंक ही आतंक’, ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’, ‘अव्वल नंबर’, ‘प्यार दीवाना होता है’, ‘हम हैं कमाल के’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारल्या.