Tuesday, July 1, 2025

पोलीस सलमान खानची सुरक्षा वाढवण्याच्या तयारीत

पोलीस सलमान खानची सुरक्षा वाढवण्याच्या तयारीत

गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या धमकीमुळे खळबळ


मुंबई: एकेकाळी दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करुन गुंडांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या सलमान खानच्याच सुरक्षेची चिंता आता मुंबई पोलिसांना सतावते आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने दिलेल्या खळबळजनक धमकीनंतर पोलीस सलमान खानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या विचारात आहेत.


गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याने काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने सलमान खानला धमकी दिली आहे. आम्ही त्याचा अहंकार तोडल्याशिवाय राहणार नाही. त्याने परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे, असे तो म्हणाला आहे. या मुलाखतीनंतर मुंबई पोलिस अलर्ट झाले असून त्यांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे.


लॉरेंस बिश्नोई म्हणाला, माझ्या मनात सलमान खान बद्दल लहाणपणापासून राग आहे. त्याने काळवीटाची हत्या केल्याने आमचा समाज नाराज आहे. याबाबत सलमान खान याने आत्तापर्यंत आमच्या समाजाची माफी मागितलेली नाही. त्याने आमच्या देवाच्या मंदिरात येऊन सर्वांसमोर येऊन माफी मागावी अन्यथा त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. तसेच त्याने आमच्या समाजातील लोकांना पैसे देखील देऊ केले होते. त्यामुळे सलमान खानला मारणे हे आमचे ध्येय आहे, असेही बिश्नोई याने मुलाखतीत म्हटले आहे.



याआधीही दिली होती धमकी


दरम्यान, लॉरेंस बिश्नोईने याआधी देखील सलमान खानला मारण्याची धमकी दिलेली होती. त्यात हा प्रकार पुन्हा घडल्यामुळे पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा आढावा घेतला. सलमानला सध्या व्हाय कॅटेगिरीची सुरक्षा दिली आहे. ती वाढवून झेड किंवा एक्स कॅटेगिरीची सुरक्षा देण्यात यावी का? याबाबत पोलिस विचार करत आहेत.

Comments
Add Comment