Wednesday, May 7, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

शेतकरी हवालदिल! संपामुळे पंचनाम्यांना 'ब्रेक'

शेतकरी हवालदिल! संपामुळे पंचनाम्यांना 'ब्रेक'

आधी अवकाळीने छळले, आता संपाने नाडले!


मुंबई : राज्यात महसूल विभागाचे कर्मचारी संपावर गेल्याने नुकसानीच्या पंचनाम्यांना ब्रेक लागला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका अवकाळीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे.


अवकाळी पावसामुळे दुसऱ्यांदा नंदुरबार जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असली तरी महसूल कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसाठी संपावर असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत.


दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संपाचा राज्यभरातील विद्यार्थी, सामान्य नागरिक, रुग्णांवर याचा थेट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सोमवारी रात्री आवकाळी पावसाने झोडपले होते. अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं असून एक आठवड्यात दोनदा अवकाळी पाऊस झाला असून पहिल्या पावसाचे पंचनामे पूर्ण होत नाही, तोच दुसऱ्यांदा देखील अवकाळी पावसाने मोठ नुकसान केलं आहे. कृषी विभागाने नुकसानीचे प्राथमिक अंदाज घेतला आहे. दुसरीकडे महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी संपावर गेले असून, शेतकरी आता वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.


सोमवारी नंदुरबार जिल्ह्यात गारपीटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड नुकसान केले होते. काढण्यासाठी आलेला गहू, ज्वारी, हरभरा, मिरची, पपई, केळी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिल्या वेळेस झालेल्या नुकसानीचे पंचनामे बाकी असताना दुसऱ्यांदा झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारी कर्मचाऱ्यांचा संपामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनाम्यांना ब्रेक लागला आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झालेले गहू, ज्वारी, हरभरा, केळी, पपई आणि मिरची तसेच शेतात पडून आहे. जोपर्यंत नुकसानीचे पंचनामे होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या क्षेत्रातील शेतीमाल तसाच पडून आहे. शेतकऱ्यांनी नुकसान झालेला शेतीमाल पंचनामे होण्याचा अगोदर काढून घेतला तर त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही अशी भीती आहे. पंचनामे होत नसल्याने एकीकडे झालेले नुकसान तर निसर्गामुळे झालेले नुकसान असा दुहेरी मार शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने काढून घेतला आहे. त्यातच संपाच्या मानवनिर्मित संकटाचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचनाम्यांची वाट न पाहता शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment