Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीसांच्या घोषणेनंतर धनंजय मुंडेंनी मानले आभार

देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेनंतर धनंजय मुंडेंनी मानले आभार

मुंबई: अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी चक्क आभार मानले. या आभारप्रदर्शनामागे कारण ठरली ती देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा.

मागील ८ महिन्यांपासून ठप्प असलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला राज्य शासनाकडून निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेच्या उत्तरादरम्यान केली.

त्याआधी धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत सत्ताधारी पक्षाला स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा विसर पडल्याचा आरोप करत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसल्याबाबत खंत व्यक्त केली होती. त्याचबरोबर मागील काही वर्षांपूर्वी भाजपचे सरकार सत्तेत असताना छत्रपती संभाजी नगर येथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाची केलेली घोषणा अपूर्ण असल्यावरून देखील धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

अर्थसंकल्पीय चर्चेअंती देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या या दोनही प्रश्नांचे निराकरण केले. ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला १३५ कोटी रुपये निधी जाहीर करण्यात आला असून, प्रचलित नियमानुसार त्याच प्रमाणात कल्याण निधी संकलित केल्यास महामंडळाला एकूण २७० कोटी रुपये निधी मिळणार आहे.

छत्रपती संभाजी नगर येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक उभारणीसाठी लागणाऱ्या विविध परवानग्या घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, त्या परवानग्या पूर्ण होताच स्मारक उभारणीचे काम सुरू केले जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -