- सेवाव्रती: शिबानी जोशी
बाबा आमटे यांचे कुष्ठरोग्यांसाठी अफाट कार्य आपल्याला ज्ञात आहे. कुष्ठरोगग्रस्तांचे जीवन सुकर करण्यासाठी त्यांच्य प्रयत्नांना सलाम आहे. समाजातल्या या वंचित घटकांकडे लक्ष देऊन त्यांच्यासाठी कार्य करणे हे त्या काळात खूपच आव्हानात्मक होते. ते आव्हान सामान्य माणसाच्या आकलन आणि शक्तीपलीकडचे होते. पण ते आमटे दांपत्याने पेलले, यशस्वी केले. तशाच प्रकारचे कार्य छत्तीसगडसारख्या राज्यात एका कोपऱ्यात अविरत, अविचलपणे सुरू आहे, हे महाराष्ट्रात कदाचित कमीजणांना माहीत असेल. समाजात कुष्ठरोग्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच नकारात्मक असताना छत्तीसगडसारख्या छोट्याशा आणि काहीशा दुर्लक्षित राज्यात अशा दुर्लक्षित लोकांसाठी काम करणे ही खरेच खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल. स्वतःला कुष्ठरोग झालेला असताना एका कुष्ठरोग्यांनी कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेले हे भारतातलं पहिलेच कुष्ठरोग केंद्र म्हणता येईल.
उत्तर प्रदेशचे सदाशिव कात्रे यांना स्वतःला कुष्ठरोगाची बाधा झाली होती. ते बैतलपूर इथे असलेल्या मिशनरी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आले असताना त्यांच्या असं लक्षात आलं की, गरीब, दीनदुबळ्या कुष्ठरोग झालेल्या व्यक्तींना मिशनरी धर्म परिवर्तनासाठी प्रवृत्त करत आहेत. येशूची प्रार्थना केल्यामुळे रोग बरा झाला असे सांगून समाजकार्याबरोबर धर्म परिवर्तनाचे काम ते करत होते, हे कात्रे यांच्या लक्षात आल्यामुळे मिशनऱ्यांनी त्यांना औषधपचार दिला नाही, त्यामुळे कात्रे बाहेर पडले आणि त्याने स्वतः कुष्ठरोग्यांना औषधोपचार देण्याचे ठरवले. कात्रे स्वतः संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे त्यांनी वंदनीय श्री गुरुजी यांना तशा स्वरूपाचे पत्र लिहिले आणि श्री गुरुजींनी त्यांना पुढे जाण्याची सूचना केली. श्री गुरुजींचा आशीर्वाद आणि सूचना घेऊन कात्रे यांनी चापा जिल्ह्यात अगदी छोट्या प्रमाणात हे भारतीय कुष्ठनिवारक संघ सुरू केला. १९७२ साली दामोदर बापटजी संघ प्रचारक म्हणून इथे कामाला आले आणि त्यांनी या आश्रमाचा अफाट विस्तार केला. या कार्यासाठी बापटजी यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबीयांना तशाच प्रकारचे जीवन जगायला लागू नये, त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावं असं बापटजींना मनापासून वाटत होतं, त्यासाठी त्यांनी त्याच भागामध्ये कुष्ठरोगग्रस्तांच्या मुलं आणि मुलींसाठी छत्रावासही सुरू केलं होतं; परंतु खूप दूर आणि दुर्गम भागात असल्यामुळे तिथे सोयींचा अभाव होता. खूप मोठा परिसर असल्यामुळे मुलींना सुरक्षा देणे थोडं कठीण जात होतं तसेच त्या ठिकाणी काम करायला माणसं मिळणं हे कठीण होते.
बिलासपूर हे शहर त्या भागापासून काहीसे जवळ आहे. तिथे राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या नियमित कार्य करत होत्याच. त्यांच्यापैकीच सुलभा ताई देशपांडे यांना बापट काकांनी १९९५ पासून विनंती केली की, आपण कुष्ठरोगग्रस्त पालकांच्या स्वस्थ मुलींसाठी बिलासपूर येथे छात्रावास सुरू कराल का? सुरुवातीला सुलभाताईंना ही गोष्ट अशक्य वाटली. आपण एवढी मोठी जबाबदारी पेलू शकणार नाही, असं वाटल्यामुळे सुरुवातीला काही काळ त्यांनी नकारच दिला; परंतु समितीच्या कार्यकर्त्यांकडून अशा मुलींचे पुनर्वसन करून त्यांचं सक्षमीकरण करणं हे नियतीने लिहूनच ठेवलेलं असावे. २००९ साली संघाच्या एका बैठकीत बापटकाकांनी देशपांडेताई आणि इतर कार्यकर्त्यांना अशा मुलींसाठी छात्रवास सुरू करण्याची गळ घातली. त्या बैठकीला स्वतः समितीच्या संचालिका प्रमिलाताई उपस्थित होत्या. त्यांच्यासमोरच बापटजींनी सुलभाताई देशपांडेना आग्रह केला आणि त्या आग्रहाला समितीच्या कार्यकर्त्या नाही म्हणू शकल्या नाहीत. तसच बापटजींनी आम्ही तुमच्या संपूर्णपणे पाठीशी राहू, असं आश्वासनही दिलं. कसलीही साधनसुविधा उपलब्ध नसताना समितीच्या कार्यकर्त्यांनी उपक्रम हाती घेतला. समितीच्या कार्यकर्त्या ‘तेजस्विनी’ या नावाने एक प्रकल्प राबवतच होत्या. समितीच्या ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्या होत्या, त्यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा कार्यक्रम असे. तसेच समितीच्या द्वितीय संचालिका वंदनीय सरस्वतीबाई आपटे यांच्या स्मरणार्थही अनेक उपक्रम सुरू होत होते. त्यामुळे छात्रावासाला ‘तेजस्विनी कन्या छात्रावास’ असं नाव देण्याचं बैठकीत ठरलं. आणि १९९७ साली कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला जागेचा खूप शोध घेतला गेला. एखादी भाड्याची जागा मिळते का? त्याचाही शोध घेतला; परंतु २५ वर्षांपूर्वी कुष्ठरोगग्रस्तांच्या मुलींना राहण्यासाठी जागा देण्यासाठी अनेकांचे नकार आले. शेवटी देशपांडेताईंच्या घरातल्या खालच्या मजल्यावरच पहिल्या बॅचमध्ये आलेल्या ११ मुलींची सोय करण्यात आली. त्यांच्या घराच्या तळमजल्यावर मोठी जागा होती आणि तिथे समितीचे लहान-मोठे कार्यक्रम केले जात असत. त्याच ठिकाणी सुलभाताईंच्या आईने स्वतःहून सांगितलं की, आपण तिथेच या मुलींची सोय करूया आणि त्यानंतरही जवळजवळ बारा वर्षे हे छात्रावास त्याच ठिकाणी सुरू होते. मग मुलींची संख्या हळूहळू वाढत गेली. दुसऱ्या वर्षी १८ मुली आल्या. त्यानंतर २५ मुली आल्या. पहिल्या मजल्यावर सुलभा ताई आणि त्यांचे कुटुंबीय राहत असत आणि तळमजल्यावर या मुलींची राहण्याची सोय करण्यात आली होती. सुलभाताई स्वतः नोकरी करत होत्या, त्यामुळे त्या बाहेर जात असत. अशा वेळी त्यांच्या आईने या मुलींची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यांना वाढवलं, असं म्हणायला हरकत नाही. संघ किंवा समितीच्या विचारांचं हेच वैशिष्ट्य आहे की, घरातील एखादी व्यक्ती राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन काम करू लागली की, तिला घरातील सर्वजण सहकार्य करतात. त्यानंतर छात्रावासाला एक जमीन मिळाली आणि अनेकजणांचे मदतीचे हात पुढे आले. स्वतःची इमारत उभी राहिली. त्यासाठी ही समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. संपूर्ण शहरभर फिरून अगदी दहा-दहा रुपयांचं डोनेशनही गोळा केले आणि समितीचे काम म्हणजे प्रामाणिकच असणार या भावनेमुळे त्यानंतर आतापर्यंत कधीही छात्रावासाला आर्थिक चणचण भासली नाही. संस्थेने कधीही सरकारी अनुदान घेतलं नाही.
संस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकही पगारी नोकर किंवा व्यवस्थापक इथे काम करत नाही. सुलभाताई स्वतः नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ काम पाहतात. त्यांच्यासोबत उषाताई टेंबेकर या ८६ वर्षांच्या आणखी एक कार्यकर्त्या पूर्णवेळ राहात आहेत.राहणाऱ्या मुलीच छात्रावासातील सर्व कामे करतात म्हणजेच त्यांना स्वतःला लागणारी स्वच्छता, धुणेभांडी, स्वयंपाक हे आळीपाळीने करतात. त्यामुळे पैशांची बचत होतेच शिवाय या मुलींना लहानपणापासूनच संसारोपयोगी कामाची सवय लागते. एकमेकांसाठी काम करण्याची भावना निर्माण होते. छात्रावासाचा दिवस पहाटे साडेपाच वाजता सुरू होतो. दररोज पहाटे समितीची शाखा भरते आणि त्यानंतर योगासन, प्राणायामाचा वर्ग घेतला जातो. सर्व सण, उत्सव अतिशय उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे या मुलींना सांस्कृतिक वारसाही जाणून घेता येतो.त्यानंतर जवळच्या शाळेमध्ये या मुली शिकायला जातात.या मुली दहावी, बारावी, पदवीपर्यंत शिक्षण घेऊन नोकरीला लागल्या आहेत. अनेकजणींची योग्य ठिकाणी लग्नही होऊन त्या सुखी समाधानी आयुष्य जगत आहेत.
कुष्ठरोगग्रस्त रुग्णांच्या मुली असल्यामुळे इथे येणाऱ्या मुलींची प्रत्येकीची एक वेगळी कहाणी आहे. इथे येणाऱ्या मुली या स्वस्थ मुलीच असतात; परंतु अगदी सुरुवातीला आलेल्या एका मुलीची कहाणी थोडी वेगळी होती. तिला कुष्ठरोगाची अगदी पहिली सुरुवातीची लक्षणं दिसत होती. या मुलीला आई-वडिलांनी एका व्यापाऱ्याकडे कामाला लावून सोडून दिली होती आणि ते दोघं पैसे कमावण्यासाठी काश्मीरला निघून गेले होते. व्यापाऱ्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ती पळून कोरबा नावाच्या छोट्याशा ठिकाणी गेली होती. तिथल्या कार्यकर्त्यांनी तिला राष्ट्रीय कुष्ठरोग संस्थेमध्ये सोडले. तिला अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील कुष्ठरोग होता. तो संपूर्ण बरा करून कुष्ठरोग निवारण संस्थेने तिला तेजस्विनी छात्रवासाकडे सुपूर्द केलं होते. आज ती अतिशय स्वस्थ आयुष्य जगत आहे, चांगले शिकून तिचं लग्नदेखील छात्रावासातर्फे लावून देण्यात आले आहे. “ज्योत से ज्योत मिलाते चलो, कार्य की गंगा बहाते रहो” असं देशभरातले संघाचे प्रचारक एकमेकांना पूरक काम करत असतात, त्याचं ‘तेजस्विनी छात्रावास’ हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
तेजस्विनी कन्या छात्रावासामध्ये दरवर्षी अंदाजे २५ ते ३० मुली राहायला असतात. खरं तर मुलींसाठी छात्रावास चालवणे हे मोठ्या जबाबदारीचे काम आहे. त्यात कुष्ठरोगग्रस्तांच्या मुलींचे छात्रावास चालवणे आणखीच मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे, ती राष्ट्रीय विचाराने प्रेरक असलेल्या समितीच्या कार्यकर्त्या उत्तमपणे पार पाडत आहेत, हे तेजस्विनी छात्रावासाची कार्यपद्धती बघून आपल्या सहज लक्षात येईल.