Saturday, July 13, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यअर्थसंकल्पात मराठवाड्यावर मदतवृष्टी

अर्थसंकल्पात मराठवाड्यावर मदतवृष्टी

  • मराठवाडा वार्तापत्र: डॉ. अभयकुमार दांडगे

राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्याला भरभरून निधी जाहीर झाला आहे. मराठवाड्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विकासासाठी तरसत असणाऱ्या मराठवाड्याला शिंदे-फडणवीस सरकारने खूप मोठा न्याय दिला असल्याची भावना मराठवाड्यातील जनतेतून व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात रद्द करण्यात आलेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प या अर्थसंकल्पात चर्चेचा विषय ठरला. त्यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने भविष्यात मराठवाड्यासाठी ‘अच्छे दिन’ नक्कीच येणार, असे स्पष्ट झाले आहे.

मराठवाडा हा तेलंगणा व कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेलगत आहे. श्री गुरुगोविंद सिंगजी महाराज यांच्यामुळे नांदेडला विशेष महत्त्व आहे, तर कर्नाटकमधील बिदर या जिल्ह्याला श्री गुरुनानक देव यांच्यामुळे महत्त्व आहे. नांदेड व बिदर येथे गुरुद्वारा दर्शनासाठी देशविदेशातून लाखो शीख भाविक येत असतात. नांदेड नायगाव मार्गे देगलूर-बिदर या नवीन रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित होता; परंतु राज्य सरकारने या रेल्वेमार्गासाठी ५०% वाटा उचलण्याचे जाहीर केल्यामुळे हा प्रलंबित रेल्वे प्रश्न आता मार्गी लागणार आहे. नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर व बिदरचे खासदार भगवंत खुब्बा यांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मराठवाड्याचेच असल्याने त्यांनीदेखील यासाठी विशेष पाठपुरावा केला व त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद केली.

मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणारा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प हा महाविकास आघाडीच्या काळात रद्द करण्यात आला होता. पावसाचे पाणी समुद्राला मिसळून गेल्यानंतर त्याचा शेतीसाठी काहीही उपयोग नाही; परंतु समुद्रात जाणारे पाणी मराठवाड्यातील विविध धरणांद्वारे शेतीसाठी उपयोगात आणण्याचा दृष्टिकोनातून मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. यामुळे मराठवाड्यातील लाखो शेतकरी समृद्ध होतील, हा त्यामागचा उद्देश आहे. या प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे भविष्यात हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आशा आहे. याचबरोबर मराठवाडा व विदर्भातील संकटग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना दर वर्षी अठराशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला. तसेच पीक विम्यासाठी आता शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक ताण कमी होणार आहे. यासाठी राज्य शासनाने ३३१२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयांमध्ये पीक विमा मिळणार असल्याने भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नक्कीच टळतील, अशी आशा मराठवाड्यातील नागरिक करीत आहेत.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील चार मोठ्या पुलांच्या कामासाठी १६५ कोटींचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात असलेल्या हिमायतनगर- हदगाव तालुक्यातील वाटेगाव व विदर्भात असलेल्या उमरखेड तालुक्यातील कारखेडदरम्यान पैनगंगा नदीवर मोठा पूल बांधण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांमधून गत अनेक दशकांपासून होती. याच पुलाच्या मंजुरीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारने ५५ कोटी रुपयाच्या निधीस मंजुरी दिली. मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा राज्याचा दळणवळणाचा मार्ग यामुळे आणखी मजबूत होणार आहे.

विदर्भातील उमरखेड, महागाव तालुक्यातील बंदी भाग तसेच मराठवाडा व तेलंगणा सीमेवरील किनवट, हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. पैनगंगा नदीवर हरडफ बंधारा आहे, पावसाळ्यात नदीला पाणी असताना खरिपाच्या दरम्यान बंधारा कोंडल्यावर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. परीणामी पंचक्रोशीतील नागरीकांना लाकडी तराफा व रूकावरून प्रवास करत हदगावला जावे लागते. केवळ पैनगंगा नदीवरील पुलामुळे होणारी वाताहत थांबवण्यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून पुलास मंजुरी मिळून द्यावी, अशी मागणी केली होती. यामुळे पुलास मंजुरी तर मिळालीच त्यासोबत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ५५ कोटी रुपयास मंजुरी देण्यात आली आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिमायतनगर-हदगाव या जवळच्या रस्त्यावर, कारखेड फाटा ते वाटेगाव दरम्यान पैनगंगा नदीवर पूल होणे आवश्यक होते. सदरील पूल झाल्यास मराठवाडा व विदर्भातील २० ते २५ गावांना प्रवास करण्यासाठी व वाहतूकीसाठी जवळपास ४० कि.मी.चे अंतर कमी होईल, हे स्पष्ट झाले होते. हिमायतनगर-हदगाव हे अंतर जवळगाव मार्गे ४५ किमी आहे. कारखेड-वाटेगाव पूल झाल्यानंतर केवळ ३० कि.मी. हिमायतनगर-हदगाव अंतर राहणार आहे. याचा विचार करून मौजे कारखेड ते वाटेगावदरम्यान पैनगंगा नदीवर पूल मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा, ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास खासदार हेमंत पाटील यांनी आणून दिली होती, त्यामुळेच या पुलाच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. जनतेच्या एकदिलाच्या मागणीतून गेली ४० वर्षे जुन्या दुर्लक्षित मागण्या पूर्ण होऊन विकास साधला जात आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या वार्षिक योजना निधीमध्ये सरकारने ११.५० टक्क्यांनी वाढ करीत २९४५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत वाढीव निधीला मंजुरी देण्यात आली होती.

abhaydandage@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -