मुंबई : राज्यात ७ मार्चला झालेल्या वादळी पावसानंतर पुन्हा १३ ते १७ मार्च दरम्यान काही ठिकाणी वादळी, तर काही ठिकाणी तुरळक व हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
वादळी वारा व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त अंदाजानुसार, हवामानात पुन्हा बदल होत आहे. राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यात १३ ते १७ मार्चदरम्यान हवामानात बदल राहील. काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होईल.
वादळी वारे व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, नागरिकांनी व शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, कापणी केलेली रब्बी पिके आच्छादित करून घ्यावीत, केळी व पपई यांची तोडणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. हेडगेवार समितीच्या कोळदा कृषी विज्ञान केंद्राने केले आहे.