शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण
मुंबई: शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मॉर्फ्ड व्हिडिओवर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचा चांगलाच समाचार घेतला आहे. म्हस्के यांनी थेट ठाकरे गटाच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाईं यांना टॅग करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
नरेश म्हस्के यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “किती खाली पडाल रे…..नीच हरकती कराल रे… जाणीव नावाची, संस्कारांची, इतिहासाची ठेवाल रे??? माता भगिनी विश्वासावर काम करायला येतात रे, सगळं सांभाळून राजकारणात आपले पाय रोवतात रे… आव्हानांना तोंड देत, यशाचे झेंडे गाडतात रे, त्यांनाच महिला दिनाच्या, शुभेच्छा तुम्ही देता ना रे?? त्यांच्याच चारित्र्यावर मग शिंतोडे उडवता रे?? मातोश्री नावाच्या पेजवरुन, औरंगी हरकती करता रे?? नाव, पत घालवलीतच, कुठे फेडाल ही पापं रे….”‘. हे ट्वीट सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरलं आहे.
याआधी त्यांनी व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी, ”हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन लढा. हे बायकी उद्योग आहेत. हातात बांगड्या भरल्यात वाटतेय म्हणून हे असले उद्योग करीत आहात. बाळासाहेबांचे तत्व विसरलात म्हणणार नाही तर त्यांना तिलांजली दिली असे म्हणावे लागेल !!!”, असं ट्विट केलं आहे.
काल या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नरेश म्हस्के ही उपस्थीत होते. त्यावेळी त्यांनी काही नेते मातोश्रीवर बसून काही आमदार आणि खासदारांना व्हिडीओ पाठवून तो व्हायरल करण्याच्या सूचना देत होते, असा गंभीर आरोप केला. तसेच राजकीय लढाई ही विचारांची आणि तत्वांची असली पाहिजे असे म्हणत त्यांनी असे प्रकार घडणे गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. तर जी स्त्री आपल्या विचारांनी, तत्त्वांनी राजकीय विरोध करत असते तिला उत्तर देता येत नाही म्हणून अशा प्रकारे तिची निंदानालस्ती करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.