Thursday, July 4, 2024
Homeमहत्वाची बातमीशीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात?

शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात?

मातोश्री नावाच्या पेजवरुन व्हिडिओ व्हायरल

आदित्यच्या खास माणसाला पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन उचलले

मुंबई : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कालपासून व्हायरल होत आहे. याप्रकरणात आदित्य ठाकरेंच्या खास माणसाला पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन उचलले आहे. मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय युवासेनेचा पदाधिकारी साईनाथ दुर्गे याला अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हा मुंबईबाहेर होता. सोमवारी सकाळी तो मुंबई विमानतळावर येताच दहिसर पोलिसांनी साईनाथ दुर्गे याला ताब्यात घेतले. त्यामुळे आता याप्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, ‘मातोश्री’ या फेसबुक पेजवरुन शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा रोड शोमधील एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी रविवारी रात्री कल्याणमधून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतले होते. यानंतर आता साईनाथ दुर्गे याला अटक करण्यात आली आहे.

साईनाथ दुर्गे युवासेनेचा कार्यकारिणीचा सदस्य होता. याशिवाय, त्याने मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण समितीमध्येही काम केले आहे. मातोश्री या फेसबुक पेजवरुन शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे आता पोलीस चौकशीत साईनाथ दुर्गे काय जबाब नोंदवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. साईनाथ दुर्गे हा सध्या दहिसर पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. आतापर्यंत याप्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी ठाकरे गटाविरोधात रान उठवले आहे. शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडिओ मॉर्फ करण्यात आल्याचा दावा करत पोलिसांत धाव घेतली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शीतल म्हात्रे यांना खडे बोल सुनावले होते. शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओशी आमचा कोणताही संबंध नाही. तुमची पापं लपवण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर हात टाकत असाल तर हे कायद्याला धरुन नाही. हा व्हिडिओ खरा आहे किंवा खोटा आहे, याचा तपास करावा. व्हिडिओ खरा असल्यास सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शीतल म्हात्रे यांच्यावरच गुन्हा दाखल करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

तर प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी सोमवारी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. राजकीय हेतूने माझ्या वडिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचदृष्टीने मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. राजकीय वैमनस्यातून हा सगळा प्रकार सुरु आहे. संबंधित आरोपींविरोधात लवकरात लवकर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी राज सुर्वे यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -