अहमदाबाद (वृत्तसंस्था) : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने एक चांगली धावसंख्या रचली आणि सामन्यात जोरदार पुनरागमन केले आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत तब्बल ४८० धावा जमविल्यावर भारताने चोख प्रत्युत्तर देत शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्या शतकांच्या मदतीने ५७१ धावा करत ९१ धावांची आघाडी घेतली. रविवारी चौथा दिवस संपताना ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता ३ धावा केल्या असल्याने भारताकडे सध्या ८८ धावांची आघाडी आहे.
सामन्यात सर्वात आधी टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी निवडली. एक मोठी धावसंख्या करण्याचा त्यांचा डाव होता. ऑस्ट्रेलियाने जवळपास दोन दिवस फलंदाजी केली. उस्मान ख्वाजा आणि ग्रीन यांनी खेळपट्टीवर चांगलीच फलंदाजी केल्याचं पाहायाला मिळालं. उस्मान ख्वाजा आणि ग्रीन यांच्या शतकाने तो डाव पूर्णही झाला. उस्मान ख्वाजाने १८० धावा केल्या. ख्वाजा याने ४२२ चेंडूचा सामना करताना २१ चौकारांच्या मदतीने १८० धावा केल्या. तर ग्रीन याने ११४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ग्रीन याने १८ चौकार लगावले. त्याशिवाय मर्फीने ३४, ट्रॅविस हेड ३२, स्मिथ ३८ यांनीही कमीअधिक धावा करत आपआपले योगदान दिले. उस्मान ख्वाजा आणि कॅमरुन ग्रीन यांची द्विशतकी भागिदारी हे ऑस्ट्रेलियाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. दरम्यान या डावात भारताकडून आर. अश्विन याने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या.
अश्विन याने जवळपास ४८ षटके गोलंदाजी केली. त्यामध्ये त्याने १५ षटके निर्धाव टाकली. तर मोहम्मद शमीने दोन आणि जाडेजा, अक्षर पटेलने प्रत्येकी एक – एक विकेट घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव ४८० धावांवर संपुष्टात आल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरूवात करुन दिली. पण तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर रोहित शर्मा ३५ धावा करुन बाद झाला. मग पुजारा – गिलने चांगली भागिदारी केली. पण पुजारा ४२ धावा करुन बाद झाला. मग गिलने शतक पूर्ण केले. तो १२८ धावांवर बाद झाल्यावर कोहली संयमी खेळी करत होता.
जाडेजासोबत त्याने चांगली पार्टनरशिप केली. २८ धावांवर जाडेजा बाद झाला. मग श्रीकर भरत ४४ धावा करून तंबूत परतल्यावर अक्षर पटेलने दमदार अशी ७९ धावांची खेळी केली. त्यानंतर अश्विन ७ उमेश यादव ० धावांवर बाद झाल्यावर अखेर कोहली १८६ धावांवर बाद झाला. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर हा फलंदाजी करु शकला नाही. त्यामुळे भारताने ५७१ धावा केल्या असून आता ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत आहे. दिवस संपताना ऑस्ट्रेलियाने ३ धावा केल्या असून एकही विकेट गमावलेली नाही.