Saturday, August 30, 2025

शीतल म्हात्रेंचा तो मॉर्फ व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना अटक

शीतल म्हात्रेंचा तो मॉर्फ व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना अटक

मुंबई: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ फॉरवर्ड करुन व्हायरल करणाऱ्या दोघांना दहिसर पोलिसांनी अटक केली. शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ व्हिडीओ असल्याचा आरोप करत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अशोक मिश्रा आणि मानस कुवर असं या अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.

सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केलाय.

शनिवारी रात्री हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रात्री उशिरा दहिसर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारावर शीतल म्हात्रे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, "आज मी सुद्धा कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहिण आहे. विरोधकांच्या घरीही महिला आहेत. अशा वेळी इतक्या खालच्या थराला जाऊन खोटे व्हिडीओ टाकणे, अश्लील संदेश टाकणे हा प्रकार अत्यंत वाईट आहे. विरोधक एखाद्या महिलेच्या संदर्भात इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात हे दिसून येतंय. हा व्हिडीओ युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी."

फेसबुकवर मातोश्री नावाच्या पेजसह ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारींनी तो व्हिडीओ अपलोड करुन व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. त्यानंतर यावर संताप व्यक्त करत शीतल म्हात्रे आणि सुर्वे समर्थकानी दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहे.

Comments
Add Comment