खर्डी (वार्ताहर) : ठाणे व पालघर जिल्हा रेल्वे मार्गाशी जोडला जाऊन ठाणे-पालघर अंतर आता कमी होणार आहे. यामुळे खर्डी, शहापूर या बाजारपेठेशीदेखील हे येथील जनता जोडली जाणार आहे.
यामुळे येथील जनतेला दिलासा मिळणार असून ठाणे त पालघरच्या जनतेला येजा करण्यासाठीचा वेळ वाचणार आहे.
खर्डी-टेंभा-वैतरणा-परळी-उज्जेनी-झाप या राज्यमार्ग असून या नुकतेच राज्य मार्गासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. खर्डी-टेंभा-वैतरणा-परळी-उज्जेनी-झाप या राज्य मार्गामुळे परळीला जाण्यासाठी खर्डी-वाडा-परळी हा ६० किलोमीटरचा वळसा वाचणार असून ४० किलोमीटर अंतर कमी होऊन खर्डी-वैतरणा-परळी हे अंतर २० किलोमीटर होणार आहे.
या रस्त्यामुळे परळी व येथील ८ ग्रामपंचायतीच्या नागरिकांचा थेट खर्डी रेल्वे स्थानकाशी संपर्क होणार असल्याने येथील नागरिक मुंबईच्या संपर्कात येणार आहेत. मोडकसागर धरण ते परळी गाव या रस्त्याला मोडकसागर धरणाखालील बाजूस पूल नसल्याने येथील रहिवाशांना खर्डीवरून रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी ६० किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा व जव्हार तालुक्यातून हा रस्ता जातो.
वाड्यातील सुशिक्षित बेरोजगार नोकरीसाठी, स्थानिक आदिवासी ग्रामस्थ, शेतकऱ्यांना आपला शेतीचा माल विक्रीसाठी खर्डी रेल्वे स्थानकात घेऊन येण्यासाठी सोपे होणार आहे. शिवाय वैतरणा (मोडकसागर) धरणाखाली पुलाचे बांधकाम झाल्यास सार्वजनिक वाहतूक, एसटी महामंडळाची बस सेवादेखील सुरू होऊ शकते. एकंदरीत परळी-वैतरणा हा रस्ता येथील नागरिकांना वरदान ठरणार असून रोजगार निर्मिती होऊन बेरोजगार तरुणांना संधी मिळणार आहे.