तेरे नाम दिग्दर्शक

  246


  • मुक्तहस्त: अश्विनी पारकर


तेरे नाम हमनें किया है
जीवन अपना...


'तेरे नाम' या चित्रपटातील या गाण्याचे सुरुवातीचे केवळ सात शब्द जरी लिहिले तरी पुढील अख्खं गाणं तरुणाई सहज गुणगुणेल इतकी जादू समीर या गीतकाराने केलीय. समीर हा बॉलिवूडमधील जादुई गीतकार. त्याची या आधीच्या चित्रपटातील गाणीही हिट होतीच, पण खरं तर ‘तेरे नाम’ हा सिनेमा बॉलिवूडमधील दोन बड्या कलाकारांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. एक खुद्द दिग्दर्शक सतीश कौशिक आणि दुसरा बॉलिवूडचा दबंग चुलबुल पांडे अर्थात अभिनेता सलमान खान!


१९९९ चा नोव्हेंबर महिना. वर्ष सरत आलं होतं आणि ५ तारखेला सुरज बडजात्याचा ‘हम साथ साथ हैं’ हा मल्टिस्टारर सिनेमा रिलिज झाला. सलमान खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर, तब्बू, सोनाली बेंद्रे, मोहनीश, नीलम, आलोक नाथ, रिमा लागू, सतीश शाह, सदाशिव अमरापूरकर, शम्मी, राजीव वर्मा, शक्ती कपूर अशा एकापेक्षा एक कलाकार आणि तारेतारकांची फौज या सिनेमात होती. हा सिनेमा बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. पण त्यानंतर सलमान खानच्या करिअरला ग्रहण लागलं. तब्बल ४ वर्षं हे ग्रहण काही हटण्याच्या मन:स्थितीत नव्हतं. या कालावधीत सलमानने जवळपास अर्धा डझन फ्लॉप सिनेमे दिलेले.


त्यानंतर २००३च्या सुमारास ‘सेतू’ या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त तमिळ चित्रपटाचा रिमेक होणार असल्याच्या चर्चा फिल्मी वर्तुळात रंगू लागल्या. या सिनेमात मुख्य भूमिकेत होता सलमान खान. या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होता अनुराग कश्यप, पण अनुरागने सलमानला एक सल्ला दिला आणि तेव्हापासून आजपर्यंत सलमान आणि अनुरागमधून विस्तव जात नाहीये. या सल्ल्यामुळेच दिग्दर्शक म्हणून हा सिनेमा अनुराग कश्यपच्या हातातून सतीश कौशिक यांच्याकडे गेला.


हाच तो सतीश कौशिक यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट. या सुपरहिट ठरलेल्या सिनेमाने सलमानच्या फिल्म करिअरला नवसंजीवनी दिली आणि सतीश कौशिक यांना दिग्दर्शक म्हणून नाव. हा सिनेमा सतीश कौशिक यांच्याकडे का गेला, हे आपण जाणून घेऊच. पण त्याआधी सतीश कौशिकांना एकदा आत्महत्येचे विचार मनात का आले होते ते जाणून घेऊ.


‘मासुम’ या चित्रपटात सहदिग्दर्शक म्हणून काम केल्यावर ‘रूप की रानी चोरों का राजा...’ हा त्यांचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यावेळी ९ करोड बजेटचा सिनेमा फ्लॉप ठरला म्हणून सतीश कौशिक यांच्या मनात आत्महत्येचाही विचार आला होता. सतीश कौशिक यांच्या करिअरची सुरुवात ते त्यांचे गाजलेले सिनेमे, गाजलेल्या भूमिका याची इत्यंभूत माहिती इंटरनेटवर एका क्लिकवर मिळेल. पण यापुढील शब्द मला त्यांचे जास्त चर्चा न झालेल्या पण भावलेल्या आणि लक्षात राहिलेल्या भूमिकांचा, लेखनाचा आणि दिग्दर्शनाचा आढावा घेण्यासाठी वापरायचे आहेत.


सतीश कौशिक यांनी कॉमेडी भूमिका गाजवल्या असल्या तरी त्यांना हास्यकलाकार म्हणून संबोधलेले आवडत नव्हते. त्यांची एक मराठी चित्रपटातील भूमिका मला विशेष आवडते. तो चित्रपट म्हणजे ‘लालबाग-परळ झाली मुंबई सोन्याची.’ चित्रपटात चाळीतील ‘हॅपी गो लकी’ मामाची भूमिका साकारणारे सतीश कौशिक चित्रपटातील पत्नी कश्मिरा शहा हिला संतती सुख देऊ शकत नसल्याने प्रियकरासोबत शय्यासोबत करताना पाहून घराबाहेर शांत बसतात. पुढे तिला प्रियकरापासून मूल झाल्यावर पत्नी आणि मुलासोबत आनंदाने राहतात. त्यावेळी कौशिक यांची माणूस म्हणून जी दया येते ती गायिका मोनाली ठाकूर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटात चीड आणते. या चित्रपटात वेश्या व्यवसायातील दलालाची भूमिका करताना सतीश यांनी जो खलनायक साकारला आहे तो पाहून ते हास्य कलाकार आहेत याचा विसर आपल्याला पडेल.


एखादा आडदांड माणूस चिडला की, त्याला आपण सहज बोलतो, ‘शांत गदाधारी भीम शांत.’ या डायलॉगचे निर्माते आहेत सतीश कौशिक. चित्रपट ‘जाने भी दो यारों’ या उपहासात्मक हास्यप्रहसनासाठी संवाद लिहिणं आणि अभिनयातून हा चित्रपट हिट करणं हे फक्त आणि फक्त नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून उत्तीर्ण झालेल्या कलाकारांचच श्रेय आहे. नासिरुद्दीन शहा, ओम पुरी आणि भक्ती बर्वे या दिग्गज कलाकारांच्या जोडीला सतीश कौशिक यांनी संवाद लेखनासोबत या सिनेमात अभिनेता म्हणूनही हजेरी लावली होती.


‘तेरे नाम’ हा सिनेमा सतीश कौशिक यांच्याकडे आला. कारण अभिनेता सलमान खान आणि निर्माते सुनील मंचन्दा यांना असा दिग्दर्शक हवा होता, जो त्यांच्या अटी-शर्ती मान्य करून कोणताही विरोध न करता सिनेमा हिट करून दाखवेल. अनुराग कश्यपचे सिनेमे हे जास्त वास्तवदर्शी असतात. त्यामुळे अनुराग सलमानला असं म्हणाला की, तेरे नाम या चित्रपटात तू तुझ्या छातीवरचे केस काढायचे नाहीत. एका मुलाखतीत अनुरागनं हा किस्सा सांगितेला. त्यावेळी तो म्हणाला, हा चित्रपट मथुरा-आग्रा येथील एका मुलाची प्रेमकथा दाखवतो आणि उत्तर प्रदेशातील या भागात पुरुष छातीवरील केस काढत नाहीत. माझी ही कल्पना सलमान खान आणि चित्रपट निर्मात्यांना आवडली नाही आणि मला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. पण, अनुरागची एक्झिट सतीश कौशिक यांच्यासाठी संधी ठरली आणि त्यांनी त्याचं सोनं केलं.


त्यानंतर सतीश कौशिक यांनी सलमानसाठी क्युंकी या सिनेमाची निर्मिती केली होती. पण, तो फ्लॉप ठरला. त्यानंतर २०२१मध्ये कागज या सिनेमानंतर सतीश कौशिक ‘तेरे नाम’चा सिक्वल आणणार, अशी चर्चा होती. त्यांचं लेखनाचं काम पूर्ण झालेलं. पण, त्यात त्यांनी सलमानचे नाव घेतले नव्हते.तेरे नाम या गाण्याचा शेवट


तेरे लिए दुनिया का हर दर्द,
हर सितम है गवारा सनम
या शब्दांनी होतो.


याचा अर्थ असा की, तुझ्यासाठी जगातलं कुठलंही दु:ख अन् वेदना सहन करायला मी तयार आहे.


सतीश कौशिक हे दोनच दिवसांपूर्वी शबाना आझमी आणि जावेद अख्तर या त्यांच्या खास मित्रमैत्रिणीसोबत आणि इतर सेलिब्रिटींसोबत मनसोक्त होळी खेळले. त्यावेळी त्यांच्या फोटोतील शेवटचे हास्य बघून त्यांच्या आप्तेष्टांना अश्रू अनावर होत असतील. पण तेरे नाम या गाण्यातील शेवटच्या शब्दांप्रमाणे असं कोणतं दु:ख किंवा वेदना सतीश सहन करत होते अथवा त्यांनी अशा कोणत्या भावना हृदयात दडवून ठेवलेल्या की, झटका येऊन ते अनमोल हृदयच बंद पडले आणि तेरे नाम या त्यांच्या टर्निंग पॉईंटचा सिक्वल येता येता राहिला.

Comments
Add Comment

विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची पहिली झलक प्रदर्शित

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका

'माऊली माऊली'... आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा

मुंबई: दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. आज आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरात

"श्रीरंग" तर्फे गतिमंद विद्यार्थ्यांसाठी 'सितारे जमीन पर' सिनेमाचा विशेष खेळ

मुंबई : श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गतिमंद विद्यार्थ्यांसाठी लालबाग येथील जय हिंद सिनेमा गृहात आमिर खान

संत तुकारामांची भूमिका साकारणार अभिनेता सुबोध भावे...

'संत तुकाराम’ चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुण्यातून सुरु झाली आहे. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक

शरद उपाध्याय यांच्या वक्तव्यावर निलेश साबळे यांचं मुद्देसूद प्रत्युत्तर...

शरद उपाध्याय यांच्या वक्तव्यावर निलेश साबळे यांचं मुद्देसूद प्रत्युत्तर... झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'