पुणे: अल निनोच्या संकटासाठी राज्य सरकार सज्ज असून पाणी फाऊंडेशन, इतर संस्था आणि राज्य सरकार भरीव काम करण्याच्या तयारीत असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ते म्हणाले, “महाराष्ट्रातील ५० टक्के भागात कमी पाऊस पडतो. हा भाग अवर्षणप्रवण आहे. त्यातच आता अनेक हवामान संस्था हे वर्ष अल निनोचे असू शकते असा अंदाज व्यक्त करत आहेत. जर तसे असेल तर आपल्याला जलसंधारणाशिवाय पर्याय नाही. पाण्याचा थेंब न थेंब साठवावा लागणार आहे. वैरण विकास करावा लागेल. त्यादृष्टीने पाणी फाउंडेशन चांगले काम करत आहेत. त्यामुळे पाणी फाउंडेशन आणि आणखीही चांगले काम करणाऱ्या संस्थांना बरोबर घेऊन आम्ही काम करणार आहोत.”
फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ”जलयुक्त शिवार योजनेत २० हजार गावांत जलसंधारणाची कामे केली. त्यातून ३७ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. त्यानंतर ही योजना बंद केली होती. आता आम्ही ही योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पाच हजार गावे घेतली आहेत. या गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले”.
दरम्यान, सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकणी अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली आहे. त्यामुळे राज्यात थंड वातावरण झाले होते. परंतु या अवकाळी नंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.