Monday, January 13, 2025
Homeसाप्ताहिककोलाजअध्यात्म, सायबर क्षेत्रातही 'ती' पुढे...

अध्यात्म, सायबर क्षेत्रातही ‘ती’ पुढे…

  • ज्योत्स्ना कोट-बाबडे

शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम्
आद्यां जगद् व्यापिनीम्।
वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्।।
हस्ते स्फाटिकमालिका विंदधतीं पद्मासने संस्थिताम्।
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धि प्रदां शारदाम्।।

आदिशक्ति देवी शारदेच्या या स्तवनाने महिला दिनाच्या कार्यक्रमाचा सुरमयी श्रीगणेशा राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. वीणा खाडिलकर यांच्या संवादाने झाला. अशा सुरेल प्रारंभामुळे वातावरणात आध्यात्मिक प्रसन्नता आली आणि पुढे जे जे त्यांनी कथन केले त्यामुळे अल्हड ‘वीणा’ची हभप वीणा खाडिलकर कशी झाली? याचे उत्तर सर्वांना मिळाले.

साहित्यसङ्गीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः। 

(अर्थात साहित्य, संगीत, कलाविहीन मनुष्य साक्षात पशूसमान आहे.) असे प्रसिद्ध सुभाषित आहे. वयाच्या चौथ्या वर्षीपासून या सुभाषिताचा संस्कार त्यांच्या जिव्हेवर झाला. त्यामुळे साहित्य, कीर्तन, कला याचे लहानपणापासूनच संस्कार झाले. अशा कलेच्या वातावरणात वाढल्यामुळे त्या कीर्तनकार नसत्या झाल्या, तर आश्चर्य असते. दोन भावांसोबतच्या जडणघडणीत घडल्यामुळे तसेच लहानपणी हट्टाने वडिलांबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला जाण्यामुळे नकळत कीर्तनाचे व संस्कृतचेही संस्कार त्यांच्यावर होत गेले. प्राचीन नारदीय आणि वारकरी अशा दोन्ही शैलीचे कीर्तन त्या करतात. एकदा वडिलांचा आवाज अचानक बसल्याने त्यांच्यावर अचानक कीर्तन करण्याची वेळ आली आणि करकचून ओढणी बांधून घेत जेव्हा त्या पहिल्यांदा २-४ हजार लोकांसमोर कीर्तनाला उभ्या राहिल्या तेव्हा, वडिलांची ती स्थिती सांभाळणे आणि आध्यात्मिक भाव जागृत करून प्रसंग तारून नेणे त्या वयात जमेल की नाही अशी भीती होती. पण लहानपणापासून झालेली तालीम यावेळी कामाला आली आणि कीर्तनाचा हा पहिलाच गड या कीर्तनकार झाशीच्या राणीने यशस्वीरीत्या सर केला. त्यानंतर त्यांनी तिथल्या अनेक मुलींना कीर्तन शिकवले. एक मुलगी म्हणून वडिलांनी लहापणापासून जे संस्कार केले त्यामुळेच खऱ्या अर्थाने मी घडले, असे त्या अभिमानाने सांगतात. यावेळी एक मुलगी, स्त्री, कीर्तनकार अन् आता एक लेखिका म्हणून घडताना आलेले प्रसंग असा थक्क करणारा प्रवास त्यांचा आहे.

आर्य चाणक्यचे एक वाक्य आहे, ‘शिक्षक हा पुढील पिढ्या घडवतो म्हणून समाजात शिक्षकच सर्वात श्रेष्ठ आहे.’ मुलुंडमधील आर. आर. एज्युकेशन ट्रस्ट मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली भोसले व त्यांच्या सहाय्यक शिक्षिका अपूर्वा पवार यांनी मराठी प्राथमिक शाळेचे शिक्षक म्हणून आलेल्या अडचणींचा ऊहापोह मांडत मराठी माध्यमाच्या शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत व्यक्त केली. २०१० मध्ये अनुदान मिळाल्यानंतर शाळेचा पट घसरत गेला. आज अगदी मराठी पालकालाही विचारले, तर त्यांनाही आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातच शिक्षण द्यायचे असते. त्यामुळे मुले गोळा करताना मोठी कसरत करावी लागते. ज्यांना खायला पोटभर अन्न नसते, अशी गरीब घरातील ही मुले जेव्हा त्यांच्याकडे येतात तेव्हा त्यांना अक्षरशः बोट धरून शिकवताना खरा कस लागतो. शिक्षक म्हणून पूर्वीसारखा मानमरातब राहिला नसला तरी आज समाजात इतर क्षेत्रांतील आदर्श नागरिकांना घडविण्याचे काम शिक्षक म्हणून करत असल्याबद्दल अभिमान वाटतो, असे त्या नमूद करतात. यावेळी अनुदान मिळत असले तरी या अनुदानित शाळांकडे शासनाची दृष्टी उदासीन आहे ती बदलायला हवी, असे सहशिक्षिका अपूर्वा सांगत असताना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्याध्यापिका भावुक झालेल्या दिसल्या. सोबत सहाय्यक शिक्षिका अपूर्वा पवार यांनीही मराठी शाळांना सुगीचे दिवस येण्याची अपेक्षा व्यक्त केली.

आज प्रत्येक तिसरी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे सायबर क्राइमने त्रस्त आहे. सोशल मीडियाच्या या युगात आपण ज्या वेगाने प्रगती करत आहोत, त्याच वेगाने सायबर गुन्हेही वाढत आहेत. मात्र महाराष्ट्राची एक कन्या सायबरतज्ज्ञ सोनाली पाटणकर या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गेली १० वर्षे महाराष्ट्र आणि गोव्यात सायबर वेलनेसच्या माध्यमातून सायबर व्हिक्टिम अर्थात ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना सायकॉलॉजिकल सपोर्ट आणि समुपदेशन करण्याचे कार्य करत आहे. लहान मुले आणि महिलांबरोबर होणारे सायबर क्राइमचे प्रमाण कमी व्हावे यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.

दर ६ महिन्याला टेक्नॉलॉजी बदलत असते, त्यामुळे याकामी या भावी पिढीचा कसा वापर करता येईल याचा विचार करण्याचा त्या प्रयत्न करत अाहेत. इंटरनेटमुळे झालेला मेंटल हेल्थचा जो इश्यू झाला आहे तो कसा कमी करता येईल, त्यावरही समुपदेशन त्या करत आहेत. ‘इंटरनेटवर तुम्ही जसे खरे आहात तसे दाखवा आणि आपण जर हे उदाहरण मुलांसमोर सेट केले नाही, तर मुले फिल्टर लावून त्यांची अायडेंटिटी नष्ट करतील.’ त्यामुळे ‘Encourage children to be themselves’ असे मार्गदर्शन सायबरतज्ज्ञ सोनाली पाटणकर यांनी केले.

आपापल्या मार्गावरून नव्या पिढीला घडवण्याचे कार्य या साऱ्या महिला करत आहेत. एक कीर्तनाच्या माध्यामातून आध्यात्म आणि संस्कृतीशी नाळ जोडत आहेत. दोघी शिक्षकी पेशातील आव्हानांना सामोरे जात गरजू गरीब विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत आहेत, तर तिसरी या इंटरनेटच्या युगात टेक्नोसॅव्ही पिढीला नैतिकतेचे धडे देत सायबर गुन्ह्यांपासून परावृत्त करत लहान मुले, महिलांबरोबर होणारे सायबर क्राइमचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे. या साऱ्यांना व अशा अगणित तमाम घर-ऑफिस कसरत करून, येणारी आव्हाने लीलया पेलत जगणं शिकवणाऱ्या ‘ती’ला सलाम! एक स्त्री समाज घडवत असते याचा प्रत्यय केवळ या महिलांच्या कामांतून येतो. शेवटी या यशस्वितांमधील ‘स्त्री’ला पाहताना इतकेच म्हणेन की,

अभी रौशन हुआ जाता हैं रस्ता,
वो देखो एक ‘औरत’ आ रही हैं…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -