ज्येष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन
मुंबई: ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे मुंबईत निधन झाले. गेली ५० वर्षे ते नाट्य समीक्षा लिहित होते. नाट्य समीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द पाच दशकांची आहे. त्यांनी आत्तापर्यंत शेकडो नाटकांची समीक्षा केली आहे.
वयाच्या ८९ व्या वर्षी कमलाकार नाडकर्णी यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मागील दोन ते तीन महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
‘लोकप्रभा’ या साप्ताहिकातून नाट्य समीक्षा लिहिण्यास त्यांनी सुरूवात केली. त्यांनी ‘महानगरी नाटक’, ‘राजा छत्रपती’ हे बालनाट्य, ‘नाटकी नाटक’ ही पुस्तके लिहिली आहे. कमलाकर नाडकर्णी हे सुरूवातीच्या काही वर्षांमध्ये सुधा करमकर यांच्या बालनाट्य संस्थेत लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून कार्यरत होते. त्यांची लेखनशैली खूप ओघवती आणि उत्तम होती. नाटक पाहिलं की त्यातले बारकावे टिपून दिग्दर्शक, कलाकरांच्या चुकांवर नेमकं बोट ठेवण्याचं काम ते आपल्या लेखनातून करत असत. एखादा प्रयोग रंगला तर तो का? किंवा का रंगला नाही याचं विश्लेषण करण्यात कमलाकर नाडकर्णी यांचा हात कुणीही धरू शकणार नाही. नाटकांवर विलक्षण प्रेम करणारे आणि त्यासाठी योगदान देणारे असे कमलाकर नाडकर्णी यांच्यासारखा लेखक, समीक्षक होणं हे दुरापस्तच.