Wednesday, March 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाजरिक्षा, बसचे स्टेअरिंग महिलेच्या हाती!

रिक्षा, बसचे स्टेअरिंग महिलेच्या हाती!

  • अल्पेश म्हात्रे

मुंबई अग्निशमन दलातील महिला अग्निशामक निर्मला ढेंबरे व रोहिणी आव्हाड यांनी सातारा ते कधी न पाहिलेल्या मुंबईतील भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलातील प्रवास सर्वांसमोर उलगडून दाखवला. आज मुंबईनेच आपल्याला सर्व काही शिकवल्याचे त्या सांगतात. आगीच्या घटनांवेळी आपले वरिष्ठ आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला या आग विझवण्याच्या मोहिमेवर पाठवतात, तेव्हा खूप अभिमान वाटतो असे त्या सांगतात. आग विझवताना कधी थरकाप उडवणारे, तर कधी लोकांना आपले प्रिय प्राणी, वस्तूंबाबत असलेल्या काळजीबाबतचे प्रसंग त्यांनी कथन केले. पण आग विझवण्याच्या मोहिमेवर असताना मुंबईकरांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

ऐतिहासिक चित्रपटांची सध्या सर्वत्र लाट आहे. अशा वेळी ऐतिहासिक चित्रपटांबद्दल प्रेक्षक हा खूपच संवेदनशील असल्याचे मनोरंजन क्षेत्रातील सीनियर पीआर एक्सिक्युटिव्ह प्रियांका भोर सांगतात. ऐतिहासिक चित्रपटात ही व्यक्तिरेखा का घेतली, या व्यक्तिरेखेला कलाकार न्याय देऊ शकणार नाही, अशी हिरीरीने मते मांडणारे प्रेक्षकही भेटतात. मग त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करून त्यांचे समाधान करणे खूप कठीण असल्याचे त्या सांगतात. सिनेमांचे शूटिंग सुरू असतातानाच तो चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेत कसा राहील यावर आमचे काम सुरू असते. तो चित्रपट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आमची संपूर्ण टीम दिवस-रात्र मेहनत घेते. विशेष म्हणजे आमच्या संपूर्ण टीममध्ये सर्व महिलाच असल्याचे प्रियांका आवर्जून सांगतात.

घरात कमालीची गरिबी, त्यात खाणारी तोंडे दहा अशा परिस्थितीत नवऱ्याच्या तुटपुंज्या पगारात घरात भागत नव्हते. मग चेंबूर येथील सुशीला देशनेहारे यांनी घराला हातभार लावण्यासाठी रिक्षाचे स्टेअरिंग हाती घेतले. या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी आहे. मात्र त्यावर मात करत सुशीला या रिक्षा चालवून घराचा गाडा हाकतात. महिला इतर ठिकाणी मिळेल ती कामे करतात. मग रिक्षा चालवण्यात गैर काय? उलट हा असा स्वयंरोजगाराचा धंदा आहे की यात कोणाचेही जास्त बंधन नसते. आपले घर सांभाळून महिला या क्षेत्रात येऊ शकतात. इतर क्षेत्रासारखेच हेही क्षेत्र असून येथे वयाचे कोणतेही बंधन नसल्याचे त्या सांगतात.

मुंबई शहरातील पहिल्या बसचालक असलेल्या लक्ष्मी जाधव यांनी महिला दिनानिमित्त दैनिक प्रहारच्या संवाद कार्यक्रमात बसचालक बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास सांगितला. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी अंडा भुर्जीची गाडी लावण्यास सुरुवात केली. मात्र काही कालावधीनंतर त्यांचे त्यात लक्ष लागत नव्हते. आपणही पुरुषांसारखी काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटत असे. बुर्जी पावच्या गाडीवर येणाऱ्या रिक्षाचालकांकडे बघून आपणही रिक्षा चालवली पाहिजे असे त्यांना वाटत असे. रिकामा वेळ मिळतात त्या ओळखीच्या रिक्षाचालकांकडून रिक्षा चालवण्यासाठी आग्रह धरला. मात्र एका महिला असल्याने डावलले गेले. अखेर एका रिक्षाचालकाने त्यांना आपली रिक्षा चालवण्यास दिली. त्या वेळेचे रिक्षा चालवण्याचे त्यांचे कौशल्य पाहून त्यांना रिक्षाचा परवाना मिळवण्यासाठी त्या रिक्षाचालकाने भरपूर मदत केली. पुढे त्यांनी महागड्या गाड्याही चालवल्या. आज त्या बसचालक म्हणून अभिमानाने वावरत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -