- स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा कायम आहे, हे निकालानंतर स्पष्ट झाले. या तीनही राज्यांत भाजप व मित्र पक्षांना बहुमत मिळाले आहे. या तीनही राज्यांत विधानसभेच्या प्रत्येकी ६० जागा आहेत. नागालँडमध्ये नेफ्यू रियो यांनी पाचव्यांदा, तर मेघालयात कॉनराड संगमा आणि त्रिपुरामध्ये माणिक साहा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
त्रिपुरामध्ये भाजपने आपली सत्ता कायम राखली, नागालँडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आणि मेघालयात गेल्या वेळेपेक्षा भाजपने चांगले यश संपादन केले. ईशान्य भारतातील या तीनही राज्यांत भाजपला नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळालेल्या मोठ्या यशाने पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाला या तीनही राज्यांत मतदारांनी नाकारून मोठा झटका दिला आहे. नागालँडमध्ये काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही. काँग्रेसचे सर्वोच्च नेते खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा पक्षाला या राज्यांत काहीही लाभ झाला नाही. ईशान्येकडील तीनही राज्यांत काँग्रेसला जो मोठा धक्का बसलाय, त्याचे पक्षपातळीवर आत्मपरीक्षण केले जाणार की नाही, एवढाच मुद्दा बाकी आहे. पुढील वर्षी २०२४ मध्ये देशात लोकसभा निवडणूक होणार आहे, या वर्षी नऊ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असून त्रिपुरा, नागालँड व मेघायल या राज्यांत झालेल्या निवडणुका म्हणजे क्वार्टर फायनल होती.
मेघालयात तेथील जनतेने कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. मेघालयात ६० जागा आहेत, पैकी ५९ जागांसाठी निवडणूक झाली. कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) ५९ पैकी २६ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले. एनपीपीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने दोन जागा जिंकल्या. सन २०१८ मध्ये एनपीपी व भाजपने मिळून सरकार स्थापन केले होते. पण यंदाची निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली. सर्व जागांवर भाजपने उमेदवार उतरवले होते. पण ५७ ठिकाणी पराभव पत्करावा लागला व दोनच जागा पक्षाला मिळाल्या. अर्थात भाजपला मेघालयात नवा लाभ झाला नाही तसेच कोणतेही नुकसानही झाले नाही. एपीपीचे यावेळी दोन आमदार जास्त निवडून आले.
नागालँडमध्ये आश्चर्यकारक लाभ झाला, तो महाराष्ट्रातील दोन राजकीय पक्षांना. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ आमदार तेथे निवडून आले आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचे २ आमदार विजयी झाले. आठवले यांनी तातडीने एनडीए सरकारला पाठिंबा देऊन टाकला आणि नंतर राज्याचे हित समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसनेही सरकारला पाठिंबा दिला. मेघालयात एनपीपीला २६ जागा मिळाल्या. निवडणुकीपूर्वी एनपीपी व भाजप यांची युती मोडली होती, पण निकालानंतर पुन्हा युती झाली. कॉनराड संगमा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून सरकार स्थापन करण्यासाठी मदत मागितली. भाजपने दिलेल्या समर्थनाबद्दल संगमा यांनी आभारही मानले.
सन २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे २१ जागा जिंकल्या होत्या. पण एनपीपी व भाजपने युती करून सरकार स्थापन केले. यंदा झालेल्या निवडणुकीत काँग्रसचे १६ जागांचे नुकसान झाले व केवळ ५ आमदार निवडून आले. काँग्रेस पक्षाने आपला पराभव झाल्यानंतरही अन्य पक्षांशी युती-आघाडी करून यापूर्वी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न अन्य राज्यांत केला होता. कर्नाटक व महाराष्ट्रात अनुक्रमे जनता दल एस व ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करून भाजपला दोन्ही राज्यांत काही काळ दूर ठेवले होते.
मेघालयात काँग्रेसला जागा जेमतेम मिळाल्याने अन्य कोणाबरोबर युती आघाडी करायलाही वाव राहिलेला नाही. नागालँडमध्ये भाजप व नॅशनल डेमॉक्रॅटिक पक्षाने (एनडीपीएफ) युती करून निवडणूक लढवली होती. एनडीपीएफने ४० जागा लढवल्या व भाजपने २० जागा लढवल्या. युतीने ३७ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसने निवडणुकीत ३२ जागा लढवल्या. पण सर्वच ठिकाणी पराभव झाला. नागालँडमधील राजकीय नकाशावरून काँग्रेसचे नाव पुसले गेले. रामदास आठवले यांनी नेफ्यू रियो सरकारला पाठिंबा दिल्याने सरकारचे समर्थन असलेल्या आमदारांची संख्या ३९ झाली आहे. शरद पवारांनी नागालँडमध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. प्रद्योत किशोर देब शर्मा यांच्या टिकरा मोथा या नवीन पक्षाने या निवडणुकीत १३ जागा जिंकल्या. या पक्षाने भाजपच्या ११ व काँग्रेस-डावी आघाडीच्या २ जागा खेचून घेतल्या. त्रिपुरामध्ये काँग्रेसचे केवळ तीन आमदार निवडून आले.
त्रिपुरामध्ये ६० जागांसाठी ८६.१० टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा हे मतदान ४ टक्के कमी आहे. सन २०१८ मध्ये त्रिपुरातील ५९ जागांसाठी ९० टक्के मतदान झाले होते व भाजपने ३५ आमदार निवडून आणून नंबर १ चे स्थान प्राप्त केले होते. एवढेच नव्हे, तर भाजपने या राज्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मक्तेदारी मोडून काढली. मार्क्सवादी कम्युसिस्ट पक्षाचा पंचवीस वर्षांचा गड भाजपने उद्ध्वस्त केला. गेल्या वेळी निवडणूक झाल्यानंतर भाजपने विप्लव देव यांना मुख्यमंत्री बनवले होते, नंतर गेल्या वर्षी त्यांना हटवून माणिक साहा यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट चढविण्यात आला. यंदाच्या निवडणूक प्रचारात माणिक साहा हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून भाजपने जाहीर केले नव्हते, तरीही मतदारांनी भाजपलाच सरकार स्थापनेचा कौल दिला.
माणिक साहा यांनी यावेळी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते डेंटल सर्जन असून राजकारणातील एक सद्गृहस्थ अशी त्यांची ओळख आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपने ईशान्य भारतात चांगला विस्तार केला व आपला पाया भक्कम रोवला. भाजपला २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरामध्ये १.५ टक्के मते मिळाली, २०१८ च्या निवडणुकीत ४३.४ टक्के, तर २०२३ च्या निवडणुकीत ३८.९७ टक्के मते मिळाली. भाजपला मेघालयात सन २०१३ च्या निवडणुकीत १.३ टक्के, २०१८ च्या निवडणुकीत १५.४ टक्के, तर यंदा २०२३ मध्ये १८.८१ टक्के मते प्राप्त झाली. भाजपला नागालँडमध्ये २०१३ मध्ये १.८ टक्के, २०१८ मध्ये ९.७ टक्के, तर यंदा २०२३ च्या निवडणुकीत ९.३३ टक्के मते मिळाली.
पूर्वोत्तर तीनही राज्यांमध्ये काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या या पक्षाची या तीनही राज्यांत अधोगती झाली आहे. लागोपाठ चार निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतरही काँग्रेसमध्ये आत्मचिंतनाची तयारी नाही. ईशान्य भारतातील ही तीनही राज्ये छोटी आहेत, म्हणून काँग्रेस पराभवाकडे दुर्लक्ष करणार असेल, तर त्याची किंमत त्यांना इतरत्रही मोजावी लागेल. या उलट पराभव झालेल्या प्रत्येक जागेचे भाजप आत्मचिंतन करतो, पराभवाची कारण शोधतो, प्रत्येक निवडणूक गंभीरपणे घेत असतो. या वर्षी आणखी सहा राज्यांत निवडणुका होणार आहेत. त्यात काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान व छत्तीसगड तसेच मध्य प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू व मिझोरामचाही समावेश आहे. लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर लढवली जाते. विधानसभा निवडणूक प्रादेशिक मुद्द्यांवर लढवली जाते. प्रत्येक निवडणुकीत जनतेची मानसिकता समजत असते. म्हणूनच त्रिपुरा, नागालँड व मेघालयाचे निकाल हे महत्त्वाचे आहेत.
त्रिपुरा, नागालँड व मेघालयातील निवडणूक निकालानंतर पंतप्रधानांनी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांसमोर आनंद व्यक्त करताना म्हणाले, ‘हमारी जित से घबराए, कुछ कट्टर विरोधी कहतें हैं, मर जा मोदी…. लेकिन मरे देशवासी कहतें है, मत जा मोदी….’