मांडा: रविवारी कर्नाटकच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या वर्षातील त्यांचा हा सहावा राज्य दौरा आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, ‘काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण मोदी बंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे बांधण्यात व्यस्त आहे. काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात आणि मोदी गरिबांचे जीवन सुखकर करण्यात व्यस्त आहेत. देशाच्या करोडो माता-भगिनींचे आशीर्वाद मोदींचे सर्वात मोठी सुरक्षा कवच आहे, हे मोदींची कबर खोदण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसवाल्यांना माहीत नाही.’
पुढे मोदी म्हणाले, ‘काँग्रेसने देश लुटला’ पीएम मोदी पुढे म्हणतात, ‘२०१४ पूर्वी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, त्या काळात त्यांनी गरीबाला उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. गरिबांच्या विकासासाठी असलेला हजारो कोटींचा पैसा काँग्रेस सरकारने लुटला. काँग्रेसने गरिबांच्या दुःखाचा कधीच विचार नाही केला. उलट, शेतकऱ्यांच्या छोट्या-छोट्या अडचणी दूर करुन भाजप त्यांचे प्रश्न सोडवत आहे. मांड्यातील २.५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे पाठवण्यात आले आहेत,’ असेही मोदी यावेळी म्हणाले.