Wednesday, May 14, 2025

कोलाजमहत्वाची बातमी

‘तिची’ झेप...

‘तिची’ झेप...

  • रोहित गुरव



चूल आणि मूल; रांधा, वाढा, उष्टी काढा या घराच्या चौकटीत महिलांना अडकवून ठेवणाऱ्या प्रचलित उक्तीतील वास्तव केव्हाच मागे पडले आहे. प्रगतीच्या मोकळ्या अवकाशात ‘ती’ने यशाची सारी कवाडे उघडत भरारी घेतली आहे. तिच्या कर्तृत्वापुढे जगच तिच्या कवेत आले आहे. यशाची सारी शिखरे तिने सर केली आहेत. त्याचा प्रत्यय महिला दिनानिमित्त आयोजित दैनिक प्रहारच्या ‘महिलांशी संवाद’ कार्यक्रमात आला. मरिन बायोलॉजी आणि पाणपक्षी हा अभ्यासक्रम तसा महिलांसाठी अनोखाच. नैसर्गिक अधिवास, पाणथळ अशा निर्जन ठिकाणी अवेळी जात तासनतास पक्ष्यांचा अभ्यास करण्याचे आव्हान असते. तेव्हा कुठे काही हाती लागले तर लागले. नाहीतर एवढा वेळ देऊन हाती काहीच नाही. त्यात आपल्या संयमाचीही परीक्षा घेतली जाते. या सर्वच आव्हानांवर मात करत डॉ. श्वेता चिटणीस यांनी या क्षेत्रात पीएच.डी. मिळ‌वली. असे सर्वसामान्यांसाठी वेगळ्या असलेल्या वाटेवर जात आपले अनुभव लेखिका आणि संशोधक डॉ. श्वेता चिटणीस यांनी कथन केले. त्यांनी पत्रकार, उपसंपादक म्हणूनही काम केले आहे.


मुलींनी फार शिकू नये, ठरावीक वेळेत लग्न करावे, असा विचार अनेक पालकांचा असतो; परंतु माझे वडील उदार विचारांचे होते. उलट मुलींनी शिकावे, त्यांना पुढे काही अडचणी येऊ नयेत, हा त्यांचा मानस होता. त्यामुळे शिक्षणासाठी घरातूनच प्रोत्साहन मिळाल्याचे भांडुप महावितरणच्या जनसंपर्क अधिकारी ममता पांडे यांनी सांगितले. घरातील कोणीही सरकारी कर्मचारी नसल्याने या नोकऱ्यांबाबत फारशी माहिती नव्हती. माझी कारकीर्द खासगी कंपन्यांमधील असल्याने केवळ भरायचा म्हणून फॉर्म भरला. मात्र सध्या तरी महावितरणच्या इतिहासात आतापर्यंत एकमेव महिला जनसंपर्क अधिकारी असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.



मोठे होऊन आपण काही तरी करावे हे स्वप्न शाळेत असतानाच उराशी बाळगले होते. लेखनाची आवड होती. कुटुंबाची तशी फारशी चांगली आर्थिक परिस्थिती नव्हती. मात्र तरीही मेहनत करून इथपर्यंत पोहोचले असल्याचे पनवेल महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी सांगतात. इतर कोर्सपेक्षा कमी ‘फी’ असल्याने पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सुरुवातीला ग्रामीण भागातील लोकल पेपरला काम केले. त्यानंतर मोठमोठ्या वृत्तपत्रांत काम केले. वेगळी वाट धरावी असा मनात विचार आल्याने मिस्टरांसोबत मिळून पब्लिकेशन सुरू केले. त्यानंतर यजमानांना चांगली नोकरी मिळाल्याने मुंबईला येण्याची संधी मिळाली. त्यामुळे पुन्हा माझी कारकीर्द थांबली. मुंबईबाबत फारशी माहिती नसल्याने सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र आता सवय झाल्याने मुंबईची भीती नाहीशी झाल्याचे वर्षा कुलकर्णींनी सांगितले.



नोकरीचा विचार कधीही केला नव्हता; सासरची सर्व मंडळी मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. माझेही शिक्षण असल्यामुळे मी घरी बसू नये असे माझ्या यजमानांना वाटायचे. त्यामुळे करिअर करण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला. नोकरीमध्ये निमसरकारी ते कॉर्पोरेट समूह असा प्रवास अदानी इलेक्ट्रिकलच्या जनसंपर्क अधिकारी नीता डोळस यांनी अनुभवला आहे. त्यामुळे सरकारी आणि खासगी सेक्टरमधील कामाचे अनुभव त्यांनी सांगितले. एका कंपनीत पीआरओ म्हणून काम करत असताना हे महिलांचे क्षेत्र नसल्याचे तेथीलच एकाने म्हटले होते. कारण रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. त्यामुळे मी काहीशी नाराज झाले होते. मात्र माझ्या यजमानांनी पाठिंबा दिला आणि तू बिनधास्त जा, उशीर झाला तरी चालेल, असे म्हणाले. त्यानंतर पुढे खासगी कंपनीत काम करताना सर्वांचे लक्ष्य आपल्या कामावर असते. त्यामुळे शिकायला बरेच मिळाल्याचे नीता डोळस सांगतात.

Comments
Add Comment