Friday, July 12, 2024

बाबा…

  • ओंजळ: पल्लवी अष्टेकर

बाबा हा शब्द आपल्याला किती जवळचा वाटतो ना! पहिल्यांदा आपल्या डोळ्यांसमोर आपला बाबा उभा राहतो. आपल्यावर प्रेम करणारा, संस्कार करणारा, जगात वाटचाल करण्यासाठी आपल्याला उभा करणारा!

पूर्वीच्या बाबा लोकांची मुलांना आदरयुक्त भीती वाटायची. अगदी शाळेची फी असो, सहलीला जायचे असो, नकाशे किंवा आलेख वही विकत आणायची असो. आई म्हणायची बाबांना विचार! ते देतील पैसे! पूर्वीच्या काळातील स्त्री-गृहिणी या भूमिकेत जास्त होती, त्यामुळे मुले आपला हट्ट वडिलांकडून पूर्ण करून घ्यायची.

‘ओ बाबा’चा ‘ए बाबा’ या मधल्या काळात झाला; परंतु बाबाचे आपल्या पिल्लावरचे प्रेम कधी बदलले नाही, कमी झाले नाही. प्रसंगी मुळात कठोर, कर्तव्यदक्ष असलेला बापही मुलांसाठी बदलतो. काही ठिकाणी बाबाचे कर्तृत्व, संस्कार पाहून मुलांनीही आपापल्या कार्यक्षेत्रात झेप घेतली आहे. आयुष्यात स्वतःच्या बाबांसोबत भरपूर बाबा पाहण्यात आले. त्यांनी बाबा म्हणून निभावलेली भूमिकाही डोळ्यांसमोर तरळू लागली. माझ्या एका मैत्रिणीचे वडील म्हणजे एकदम निवांत माणूस. ‘हॅपी गो लकी’ प्रकारातले! आपल्या मुलांनाही फार ताण-तणावाचे, स्पर्धेचे आयुष्य जगू नये असे सांगणारे! आपल्या पायांवर उभे राहून पोटापुरते मिळवा असे सांगणारे! आई हौशी, स्वभावाने महत्त्वाकांक्षी! आई शाळेत शिक्षिका होती. आपल्या दोन्ही मुलांनी भरपूर अभ्यास करावा व उत्तुंग यश मिळवावे, अशी अपेक्षा असणारी! घरात कधी कुणी पाहुणे मंडळी आली, त्यांनी मुले कितवीत आहेत, असे विचारले की, वडील पाहुण्यांशी गप्पा करता-करता हॉलमधून आत हाक मारायचे, “तरल बाळा, तू यंदा कितवीत ते सांग बरं?”

मग तरल येऊन सांगायची, “सहावीत.” असे दोन्ही मुलांबाबत वर्षानुवर्षे व्हायचे. मुलांना कधी आपल्या बाबांचा राग यायचा नाही. उलट बाबा आपल्याला वारंवार अभ्यासाचा ताण देत नाही म्हणून सुटल्यासारखे वाटायचे. आई तेवढी डोक्याला हात लावून घ्यायची. आता तरल सासरी सुखाने नांदत आहे व तिचा भाऊ शेखर चांगल्या नोकरीत स्थिरस्थावर आहे. मात्र हा प्रसंग आठवला की सर्वांनाच हसू येते. बाबांनाही या आठवणीने गंमत वाटते. आणखी एका बाबांचे व्यक्तिमत्त्व शांत व प्रसन्न! त्यांचे नाव बाबा ऊर्फ सुभाष झाडबुके. त्यांनी आपल्या पत्नीला साधना झाडबुके यांना त्यांच्या जगावेगळ्या समाजकार्यात खंबीर पाठिंबा दिला. प्रा. साधना झाडबुके यांनी देवदासी, तृतीय पंथीयांचे पुनर्वसन या कार्यासाठी आपले आयुष्य वेचले. बाबांची शांत, संयमी साथ असल्यामुळे आपण हाती घेतलेले हे कार्य सचोटीने करू शकलो, असे साधनाताई सांगतात.

साधनाताईंच्या या कामासाठी खेडोपाड्यांतून या मंडळींची सतत ये-जा असायची. घर सदैव भरलेले असे. पण बाबांनी साधनाताईंना मागे वळू दिले नाही. त्यामुळे समाजसेवेचे व्रत अंगीकारत साधनाताई कचरावेचक स्त्रिया, शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासंबंधीच्या अडचणी, स्त्री-भ्रूण हत्यांची कारणे व परिणाम या विषयांवर लढत राहिल्या आहेत. अनेक वेळा रस्त्यावरून येता-जाताना आपण ट्रकमधून सिमेंटची, वाळूची पोती उचलणाऱ्या, घामेघूम होणाऱ्या मजुरांना पाहतो. तेव्हा मनात विचार येतो, त्यांच्या कुटुंबाला, मुलाबाळांना आपल्या बापाच्या कष्टांची वेदना समजत असेल का? कितीतरी कष्टकरी, चाकरमानी बाप पोटासाठी आपले गाव, कुटुंब सोडून एकटेच दूरवर शहर गावात साध्यासुध्या नोकऱ्या करायला येतात. छोट्याशा, पैसे साठवून घेतलेल्या मोबाइलवर ते आपल्या मुलाबाळांशी गप्पा करतात. तेव्हा आपल्या शिक्षणासाठी, आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपला बाप राबतो आहे याची जाणीव मुलांना असते का?

तरीही आपली कुटुंबव्यवस्था बळकट आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वृद्धाश्रम उभे असे चित्र अजून तरी समाजात दिसत नाही. आपल्या वृद्ध माता-पित्यांची काळजी घेणारी मुलं म्हणूनच दिसतात. सदृढ कुटुंबव्यवस्था ही काळाची गरज आहे. शिवाय आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट उपसलेल्या बापाचे, आईचे ऋण फेडण्याची संधी मुलांना यातून मिळते. कर्तव्यदक्षतेच्या, प्रेमाच्या जाणिवेतून तरुण पिढीकडून ही गोष्ट घडायला हवी. आमच्या शाळेत एक वल्लरी नावाची दिव्यांग मुलगी होती. तिला दररोज शाळेत व्हील चेअरवरून आणावे लागे व शाळा सुटल्यावर न्यावे लागे. आपल्या मुलीने शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी तिच्या वडिलांची रोजची धडपड आम्ही पाहत होतो. आयुष्यात एक मोठा धडा आम्हाला त्यातून मिळत होता. वल्लरीचे दप्तर, वॉटरबॅग स्वतःच्या खाद्यांवर तिला व्हीलचेअरवर बसवून दररोज हा बाबा सज्ज व्हायचा. तितक्याच प्रसन्न, शांतचित्ताने. मधल्या सुट्टीत आम्ही वल्लरीशी बोलायला जायचो, तेव्हा सुरुवातीला लाजरीबुजरी असलेली वल्लरी आता आत्मविश्वासाने हळूहळू झळाळू लागली होती. आयुष्यात बापाच्या कष्टाचे पांग फेडण्याची तिची इच्छा होती. तिची आई साधी-सुधी गृहिणी! वल्लरीच्या वडिलांच्या जिद्दीपुढे आम्ही नतमस्तक होत असू.

गीता फोगाट, बबिता कुमारी, संगीता फोगाट आणि रितू फोगाट यांचे वडील महावीरसिंग फोगाट सगळ्यांना ठाऊक आहेत. एक भारतीय कुस्तीगीर (व्रेस्टलर), सीनिअर ऑलिम्पिक कोच म्हणून त्यांची ख्याती आहे. आपल्या मुलींना व्रेस्टलिंगचे प्रशिक्षण, तर त्यांनी दिलेच, शिवाय इतर तरुणांना देखील घडविले. भारत सरकारने त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविले आहे. आपल्या वडिलांच्या खडतर प्रशिक्षणातून गेल्यावर, ‘२०१०’च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये गीता फोगाट हिने भारताचे पहिले सुवर्णपदक महिला व्रेस्टलिंगमध्ये (५५ किलो फ्री स्टाईल विभागात) मिळविले. बबिता कुमारी या त्यांच्या दुसऱ्या कन्येने ब्राँझ पदक २०१२ च्या वल्ड व्रेस्टलिंगमध्ये मिळवले.
आणखी एक बाबा नावाचा पहाड, कर्मयोगी, कुष्ठरोग्यांच्या, दीन-दुबळ्यांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणारे, समाजाने बहिष्कृत, केलेल्या निराधारांचे, आदिवासींचे, महान माणुसकीचे प्रेरणास्त्रोत बाबा आमटे ऊर्फ मुरलीधर देवीदास आमटे. या बाबाला तर कोणीच विसरू शकणार नाही. असे हे बाबा! आपण सर्व बाबांच्या ऋणातच राहूया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -