- गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी
महिला दिनाचा मूळ उद्देश स्त्रियांना समानता देणे. महिलांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी जागे व्हावे. कुठलेही बंधन, दडपण न येता व्यक्ती म्हणून स्त्रीला जगता आले पाहिजे, मोकळा श्वास घेता आला पाहिजे. महिलांच्या श्रमाला योग्य न्याय मिळावा यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनाकडे जगाचे लक्ष वेधले गेले, त्यानंतर ८ मार्च हा महिला दिन अधिकृत झाला.
स्त्रियांचा सन्मान आणि आदर करणाऱ्या या भूमीत आजची स्त्री सशक्त बनविण्यामागे अनेक पुरुषांचे योगदान आहे. त्यांनी परिवर्तन चळवळीचा पाया घातला. भारताचा इतिहास पाहता, भारतात धाडसी, पराक्रमी, विदुषी स्त्रियांचा आलेख चढता आहे. त्यातील काहीजणींचा नामोल्लेख. पारतंत्र्यातही स्त्रियांच्या कर्तृत्वाची झेप मोठी होती. इंग्रजांच्या विरोधात धैर्याने लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, ताराबाई शिंदेंनी निर्भीडपणे लिहिलेला, ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ. सामाजिक सुधारणेला बळ देणाऱ्या रमाबाई रानडे, महिला सक्षमीकरणाच्या इतिहासांतील एक महत्त्वाचा भाग, भारताच्या पहिल्या शक्तिशाली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, आताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, मध्य प्रदेश विधानसभा निवडून आलेल्या तृतीयपंथी शबनम मौसी.
पुरुषप्रधान क्षेत्रात लष्कर खात्यात पुरुषांच्या बरोबरीने सर्व पदांवर, लढाऊ विमाने चालविण्यातही आज महिलांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. जकात खात्यावर अभावाने आढळणाऱ्या आयएएस महिला अधिकारी व्ही. राधा, त्याच क्षेत्रातील इतर महिला कबीर बेदी, मीरा बोरवणकर, नीला सत्यनारायण मुलीसमोर आदर्श आहेत. कॅस्टल इंडियासारख्या बलाढ्य कंपनीची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या प्रमुखवित्तीय अधिकारी रश्मी जोशी, पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी, जागतिक कीर्तीच्या मानववंश शास्त्रज्ञ इरावती कर्वे, संस्कृती आणि निसर्गावर अभ्यासपूर्ण लिहिणाऱ्या विदुषी दुर्गा भागवत, परखड इतिहास संशोधक रोमिला थापर यांनी समाज आणि संस्कृतीचा वारसा पुढे नेला.
शिक्षणासाठी पहिली शाळा उघडणाऱ्या सावित्रीबाई ते महिलांच्या शिक्षणासाठी उभे राहिलेले महिला विद्यापीठ, त्याच्या कुलगुरू डॉ. वसुधा कामत. समाज परिवर्तनाचे हत्यार म्हणून लेखणीतून नवशिक्षित स्त्रीला काय हवे आहे, काय खुपते, काय आवडते हे लिहिणाऱ्या गौरी देशपांडे, अमृता प्रीतम, इंदिरा गोस्वामी ते विद्या बाळ, नीरजा.
रिचर्ड अॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटाच्या कॅाश्युम डिझायनरसाठी पहिला ऑस्कर अॅवॉर्ड मिळविणाऱ्या ‘भानू अथैया’ या नावाची जगाला ओळख झाली. चित्रपट, नाट्य माध्यमाने महिलांचे अनेक प्रश्न हाताळले आहेत. महिलांच्या स्वच्छताग्रहाचा प्रश्न, टॅायलेट एक प्रेमकथा, पॅडमॅन, आनंदी गोपाळ, सध्याचे मुलींचे प्रश्न पिंक, क्वीन चित्रपटात एक साधी मुलगी एकटी दोन देश फिरून आत्मनिर्भर होऊन येते. स्त्री भ्रूणहत्येसाठी शांतता कोर्ट चालू आहे ते चारचौघी. फॅशनच्या दुनियेत स्वतःचा ब्रँड निर्माण करणाऱ्या वैशाली गडांगुळे म्हणतात, फॅशन म्हणजे जुन्याला नवीन टच. ती एक कला आहे.
मेहनतीला पर्याय नाही, हे सार्थ ठरविणाऱ्या क्रीडाक्षेत्रात, ऑलिम्पिकमध्येही अनेक महिलांनी यशस्वी कामगिरी केली. मेरी कोम, मीरा चानू, कविता राऊत, आता महिला क्रिकेटच्या नव्या युगाला झालेला प्रारंभ, महिला प्रीमियरला झालेली सुरुवात.
तरीही आज दुसऱ्या बाजूला समाजात अंधार आहे. बऱ्याच घराघरांत पुरुषी दबाब, वर्चस्व, कौटुंबिक हिंसाचाराने महिला असुरक्षित आहेत. १९२० नंतर समाजातील मध्यमवर्गीय महिलांना आत्मभान आले. आजच्या महिलांचे अनेक कंगोरे असलेले गृहिणीपद. अनेक अडचणी, आपत्ती, संकटावर मात करीत आपल्या मुलांना समर्थपणे शिकवितात, मुलाच्या करिअरसाठी धडपडणाऱ्या तरी स्वतः सन्मानाने राहणाऱ्या मातांना सलाम! ‘अरे संसार संसार…… येड्या गळ्यातला हार’ म्हणून… पूर्वीची स्त्री गळ्यातला हार सांभाळण्यासाठी सगळं सोसत होती. आजची महिला जर तिला न पेलणारा त्रास होत असेल, तर प्रसंगी गळ्यातला हार तोडून हार न मानता वेगळी होतं एकल पालकत्व चांगल्या प्रकारे निभावत आहे. हाच सक्षम महिला पालकत्वाचा झालेला विस्तार. मुलगा हवा म्हणणारी आज अनेक कुटुंब ‘मुलगीच हवी’ असे म्हणतात. हीच लोकांची बदललेली मानसिकता. हाच महिला शक्तीचा विजय होय.
काही कर्तृत्वान महिलांचा परिचय –
१. प्रा. डॉ. रेणू खटोड या मूळच्या उत्तर प्रदेशातील कानपूरच्या रहिवासी. कला शाखेत पदवी घेतल्यावर पर्ड्यू विद्यापीठात राज्यशास्त्र एम. ए. लोकप्रशासनामध्ये डॉक्टरेट. शैक्षणिक कारकीर्द बहरात असतानाच प्रोफेसर या पदासोबत अनेक जबाबदारीची पदे भूषवली. भारतीय पंतप्रधानांच्या जागतिक सल्लागार मंडळावर कार्यरत होत्या. पर्यावरण, जागतिक हवामान बदल, फ्लॉरिडातील जलधोरण असे अनेक शोधनिबंध लिहिले. सध्या अमेरिकेच्या मंत्रालयात शैक्षणिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
२. अमेरिकेतील (अंतराळ संशोधन संस्था) नासाच्या प्रमुख कार्यकारी पदावर नियुक्ती झालेल्या भव्या लाल. भव्या दिल्लीची, रोझरी आणि पब्लिक स्कूलमध्ये शिकताना साऱ्यांत प्रवीण. सातवीत असतानाच रशियन सरकारच्या चित्रकला स्पर्धेत रशियांत जाऊन बक्षीस मिळविले. बारावीनंतर भव्याला मॅसेच्यूसेटमध्ये प्रवेश मिळाला. न्युक्लिअर इंजिनीअरमध्ये पदवी घेतली. शिक्षणाबरोबर धोरणं कशी आखली जातात, त्याचे ज्ञान, तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले. अवकाश तंत्रज्ञांच्या विविध क्षेत्रांत अनेक वर्षाच्या योगदानानंतर ‘नासा’मध्ये संस्थेच्या कार्यकारी प्रमुख पदावर नेमणूक झाली. शिवाय वरिष्ठ आर्थिक सल्लागार म्हणूनही काम पाहतात.
३. ड्रॅग डिस्कव्हरी म्हणजे विविध रोगांसाठी औषध शोधून काढणे. अतिशय आव्हानात्मक क्षेत्र. काबाडकष्ट करूनच अभ्यास हे डॉ. कल्पना जोशी यांच्या जीवनाचा स्थायीभाव. इथे पगार कमी, रिटन्स कमी आणि कष्ट जास्त. खेडेगावातून आल्यामुळे त्यांना इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास नाही, अमेरिका म्हणजे काय याची कल्पना नाही, तरी एकटीने तिथे गेल्या. या धाडासामागे ध्यास होता. सामाजिक भान जपत २८ वर्षांच्या वर अत्यंत चिकाटीने, बुद्धीच्या जोरावर कर्करोग, सांधेदुखीवरच्या औषधांची १० आंतरराष्ट्रीय पेटंट्स त्यांनी मिळविली, त्या डॉ. कल्पना जोशी.
महत्त्वाकांक्षा बाळगा, त्या पूर्ण करण्यासाठी नेटाने प्रयत्न करा. ते करताना स्वतःला हरवू नका. येणाऱ्या काळांत महिला नोकरीत असोत किंवा कुठल्याही क्षेत्रांत स्वकर्तृत्वावर भरारी घेणारच. जेवढ्या महिला अधिक करिअर ओरिएण्टेड होतील, तेवढे पुरुष घरात अधिक जबाबदारीने वागतील हे चित्र सुखावह आहे. तेव्हा महिलांनो स्वकर्तृत्वावर भरारी घ्या..!