Tuesday, March 18, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सतेरा वल्लींचा अव्वल ‘शोले’

तेरा वल्लींचा अव्वल ‘शोले’

  • कर्टन प्लीज : नंदकुमार पाटील

‘संगीत शोले’ रंगमंचावर येणार हे लॉकडाऊनच्या पूर्वी घोषित झाले होते. विनोदी नाटक करायचे, तर ते संतोष पवार बरोबर असे हक्काने सांगणारे निर्माते दत्ता घोसाळकर हे या नाटकाची निर्मिती करणार होते. त्यांचे निधन झाले आणि नाटक लांबणीवर पडले. पवारांनी नाटक लिहिले आणि ते काही कारणास्तव पेटीत बंदिस्त झाले, असे सहसा त्यांच्या बाबतीत होत नाही.

धो धो नाही. पण निर्माता मुसू मुसू रडणार नाही, इतकी गर्दी हमखास त्यांच्या नाटकाला होत असते. यावेळी त्यांनी स्वतःच एक धाडस केले आहे. ज्या नवकलाकारांमध्ये तीन गोष्टींचा अंतर्भाव आहे. अशा कलाकारांची त्यांनी या नाटकासाठी निवड केलेली आहे. उत्तम अभिनय आणि प्रयोगासाठी वेळ देण्याची तयारी शिवाय नाटक उभारणीसाठी प्रत्येक कलाकारने कंबर कसली पाहिजे, अशी अट घातली. परिणामी पवारांनी जे सांगितले, ते कलाकार तंतोतंत करीत असतात. पवारांनी लेखन, दिग्दर्शनाबरोबर गीत, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य सबकुछ मनावे अशा साऱ्या गोष्टी त्यांनी ‘संगीत शोले’ या नाटकासाठी केलेल्या आहेत. कलाकार कोणाचीही मदत न घेता स्वतःहून रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य लावणे, या गोष्टी करीत असतात. दशावतार, नमन हा कोकणातला लोककला प्रकार‌ आहे. पूर्वी स्त्रीपात्र पुरुषच करत होते. आता कोणी युवा कलाकार कंबरेला पदर लावायला तयार होत नाही म्हणताना अलीकडे या कला प्रकारात महिला कलाकारसुद्धा दिसायला लागल्या आहेत. पण रंगभूषा, वेशभूषा परंपरेने आलेले कलाकारच करीत असतात. हा संदर्भ ‘संगीत शोले’ या नाटकासाठी जोडता येणार नाही. एक एकांकिका सर्व स्पर्धेत सादर व्हावी. त्यात सर्वोत्तम ठरावी, यासाठी सहकार्यातून सर्व कलाकार जी ऊर्जा लावतात, ती या नव्या नाटकातले कलाकार मंडळी लावत आहेत. तिकीट विक्रीवर त्याचा परिणाम झाला, तर प्रयोगाची संख्या वाढेल. त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, अशा उद्देशाने हे नाटक रंगमंचावर सादर होत आहे. ‘भूमिका थिएटर’ आणि ‘एस एस टुन्टि फोर क्रिएशन’ यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. समीर पाटील हे या नाटकाचे निर्माते आहेत.

‘शोले’ या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांग गाठलेला आहे. आज अठ्ठेचाळीस वर्षे होऊन सुद्धा त्यावर विडंबन करून मनोरंजन करणे काही थांबलेले नाही. ‘झपाटा’ या संस्थेने काही वर्षांपूर्वी ‘शोलेला लागले कोल्हे’ हे नाटक रंगमंचावर आणून हंगामा केला होता. पवारांना सुद्धा या नाटकासाठी शोलेची कथा घेतलेली आहे. दशावतार लोककला प्रकारात व्यंग, ढंग आणायचे झाले, तर त्यात काय नाट्य घडू शकते ही संकल्पना घेऊन पवारांनी नाटकाचे लेखन, दिग्दर्शन केलेले आहे. गावात शाळा नसल्यामुळे शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जावे लागते. शाळा उभारण्याची असेल, तर नाटकाच्या माध्यमातून निधी उभारता येईल. पुण्या, मुंबईच्या नाटकांचे प्रयोग मदतीसाठी लावण्यापेक्षा आपणच हे नाटक सादर करू, असे वस्ताद म्हणजेच कथेचे दिग्दर्शक या गावकरी कलाकारांना पटवून सांगतात. सर्वजण उत्साह दाखविण्यापेक्षा त्यांचे उत्सवी रूप पाहायला मिळते. त्यामुळे जय, वीरू, बसंती, ठाकूर, रामलाल, गब्बर सिंग, कालिया ही शोलेतील पात्र एक एक करून रंगमंचावर अवतरताना दिसतात. कपडे शोलेतल्या व्यक्तिरेखांशी मिळते-जुळते असले तरी दशावतारमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेशभूषेचा, रंगभूषेचा या कलाकारांना मोह काही आवरता आलेला नाही. त्यामुळे नमुनेदार माणसांकडून ज्या गमती जमती होतात. त्या या सर्व कलाकारांकडून होताना दिसतात. यातल्या बऱ्याच पात्रांना आपल्या भूमिकेचा विसर पडतो. अधूनमधून स्वतःचे व्यक्तिमत्त्व डोकावताना दिसते. भूमिकेची गरज काय याहीपेक्षा मी ठळकपणे कसा दिसेल, हा हट्ट आणि तसेच झाले पाहिजे हे पटून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न‌. त्यात नाटकात देखणी स्त्री कलाकार असेल, तर त्यांच्यात उडणारी तारांबळ, प्रत्येकाचे गुण, दोष सारे काही कथासूत्रात आणले की छान मनोरंजन होते. यापूर्वीच्या अनेक नाटकात हा प्रयत्न झालेला आहे. ‘वस्त्रहरण’ त्यापैकी एक ज्या नाटकाने सीमेपलीकडे धडक दिलेली आहे. यातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे अशा नाटकाचा एक स्वतंत्र असा प्रेषक वर्ग आहे. तो फक्त टिकून ठेवण्यात, मिळवण्यात पवारांना यश आलेले आहे. कथा शोलेची असली तरी संगीत, नृत्य, बोलीभाषा या साऱ्या गोष्टी लोककलेच्या रचनेतून आल्याचे पाहायला मिळते. दोन-अडीच तास छान मनोरंजन केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात मौलिक संदेश पात्र देत असतो. तो प्रयत्न पवारांनी याही नाटकात केलेला आहे. आजचे विनोदी नाटक पाहिल्यानंतर प्रसंग, देहबोली, शाब्दिक अशा सर्वच मार्गातून विनोदाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. त्याचा अभाव काही प्रसंगात दिसतो. लेखक, दिग्दर्शक या नात्याने तो पवारांनी अभ्यासावा असे वाटते.

कलाकार मालवणी भाषा सहज, उत्स्फूर्त बोलतीलच असे नाही. पवारांनी त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांच्याकडून भूमिका करून घेतलेल्या आहेत. हे जरी खरे असले तरी संगीत, गाणी यांचा कल्पकतेने केलेला वापर तंत्रज्ञांना जसा सर्तक राहा सांगतो, तसे कलाकारांनासुद्धा जागृत राहून भूमिका करा, असे सांगते. याबाबतीत सर्वच कलाकार माहीर दिसलेले आहेत. त्यांनी उत्तम काम केले त्याचा परिणाम त्या प्रसंगावर परिणामी नाटकावर झालेला आहे. ज्या कलाकारांनी ही गुणवत्ता दाखवली, त्यात वस्तादची भूमिका साकार करणारे संतोष पवार यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. लेखन, दिग्दर्शनाबरोबर त्यांनी अनेक नाटकात अभिनयला सुद्धा प्राधान्य दिले असल्यामुळे शब्द कोणते पेरले आणि काय हालचाली केल्या की, प्रेक्षकात हास्य निर्माण होईल याची जाण असलेले ते एक कलाकार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून, त्यांच्या टीमकडून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते. तेरा वल्लींचा अव्वल ‘शोले’ अशी दाद या नाटकाला द्यावी लागेल. या नाटकात एकूण तेरा कलाकारांचा ताफा आहे. त्यात दीपश्री कवळे, सुशील घाटकर, स्वप्नील जगताप, अभिषेक औटी हे कलाकार भूमिकेतली ऊर्जा कायम सोबत ठेवण्यात यशस्वी झालेले दिसतात. याशिवाय या नाटकात निशांत जाधव, रोहन कदम, ओशीन साबळे, सिद्धी पाटील, महेश गुरव, तेजस घाडीगांवकर, नितीन जाधव, सिद्धेश खंडागळे यांचा कलाकार म्हणून सहभाग आहे. तुषार देवल यांनी कथानकाला, वातावरणाला आवश्यक अशी संगीताची बाजू सांभाळलेली आहे. पण ती योग्य वेळी वाजवण्याचे कौशल्य विक्रम वाजे यांचे आहे. नृत्य दिग्दर्शक अनिकेत जाधव यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. नाटकात अनेक गाजलेली, लोकप्रिय गाणी ऐकायला मिळतात. त्यांनी अस्सल कोकणी बाजात परंपरेचा आब राखून नृत्य दिग्दर्शन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -