नागरिकांचा खेळ होतो, आमचा जीव जातो…

Share
  • रवींद्र तांबे

२८ मार्च, २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील तळगाव गावडेवाडी येथे बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आलेले होते. त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होईल. त्या झुंजीमध्ये वेंगुर्ले तालुक्यामधील आसोली गावातील विली केरकर यांचा बाबू नावाचा बैल जखमी झाल्याने त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. म्हणजे त्याला किती इजा झाली असेल? याची कल्पना येते. आपल्याला साधी ठेच जरी लागली तरी दोन-तीन दिवस किती त्रास होतो याची सर्वांना माहिती आहे. त्यावेळी आपल्याला आपले आई-वडील आठवतात. जर बैलाला बोलता आले असते, तर नक्की बैल म्हणाला असता ‘नागरिकांचा खेळ होतो, आमचा जीव जातो.’ तेव्हा असे प्रकार पुढे होऊ नयेत आणि दुसऱ्या बाबू बैलाचा जीव जावू नये म्हणून सरकार तसेच नागरिकांना जागृत करण्यासाठी घेतलेला थोडक्यात आढावा.

तेव्हा बैलांच्या झुंजी आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आधीच जिल्ह्यातील नागरिक रोजीरोटीसाठी शहरात जात असल्यामुळे एकवेळ गोठ्यात बैल, गाई व वासरे असणारे गोठे आज ओस झालेले दिसतात. सध्या तर घर सारवायलासुद्धा विकत शेण आणावे लागते, अशी परिस्थिती पाहायला मिळते. तेव्हा पुन्हा दुसरा बाबू जाणार नाही, याची खबरदारी शासनाला घ्यावी लागेल. कधाचित झुंजीत जिंकणारा बैल मालक डोक्याला फेटा बांधून पारितोषिक घेऊन मोकळा होईल. मात्र मुक्या जनावरांचे हकनाक बळी जाऊ लागले, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक लोक प्रतिनिधीनी पुढे येणे आवश्यक आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, कडक उन्हाळ्याचा विचार करता, उन्हाळ्यामध्ये बैल झुंजी लावणे योग्य आहे का? त्याला सरकारची परवानगी आहे का? बैल झुंजी लावण्या योग्य जागा आहे का? त्यासाठी कशा प्रकारे नियोजन केलेले आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आयोजकाला अगोदर शोधावी लागतील.
आज बैलांच्या किमतीसुद्धा गगनाला भिडलेल्या आहेत. अशातच बाबू नावाच्या बैलाचा मृत्यू झाल्याने बैल मालकाला काय वाटले असेल? हा प्रसंग पाहिल्यानंतर व स्थानिक वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्यावर जिल्ह्यातील जनता हळहळली. तेव्हा पुन्हा हळहळ नको म्हणून ठोस पावले उचलावी लागतील. मात्र पुढाकार कोण घेणार? हा खरा प्रश्न आहे.

आता मार्च महिना सुरू आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण होईल. यातून आपण काय शिकणार आहोत याचा विचार जिल्ह्यातील जागृत नागरिकांनी करावा. म्हणजे असे प्रकार पुढे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. बैल झुंजीमुळे लोकांची करमणूक जरी होत असली तरी उन्हामध्ये झुंजणाऱ्या मुक्या बैलांची काय अवस्था होत असेल? हे बोलक्या माणसांना सांगून काय उपयोग होणार आहे? तेव्हा मुक्या प्राण्यांचा खेळ होऊ नये, या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे.

आता जबाबदारी केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची नाही, तर प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांची आहे. कारण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले. उद्या दुसऱ्या जिल्ह्यातही होईल. तेव्हा नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. म्हणजे मुक्या प्राण्यांना त्रास होणार नाही. कारण लोकांची करमणूक होत असली तरी जवळजवळ एक तास झुंज असणे, त्यांच्या तोंडाला फेस येणे, मानेला टोकधार शिंगे लागल्यामुळे रक्तबंबाळ होणे व जीव कासावीस झालेला दिसणे ही राक्षसी प्रवृत्ती नष्ट होणे गरजेचे आहे. तेव्हा यापुढे असे प्रकार केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे, तर कोणत्याही जिल्ह्यात होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देणे आवश्यक आहे. माझे वडील म्हणायचे, ‘रेड्या-पाड्याची झुंज आणि झाळीचे मरण’ आता परस्परविरोधी परिस्थिती पाहायला मिळते. भविष्यकाळाचा विचार करता हे प्राण्यांच्या दृष्टीने घातक असून हे चित्र बदलणे गरजेचे आहे.

अशा जीवघेण्या झुंजी थांबविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राणी मित्राने पुढे यायला हवे. तेव्हा यापुढे एकही बाबू (बैल) झुंजीमध्ये मरण पावणार नाही, याची बैल मालकांनी काळजी घ्यावी. यात बिनतिकिटामध्ये नागरिकांची करमणूक होत असली तरी त्यात बैलांचा जीव जातो. तेव्हा करमणुकीची अनेक साधने आहेत. बैल झुंजीमुळे आपली करमणूक होते असे वाटत असले तरी अशा झुंजींना विरोध केला पाहिजे. तो सुद्धा तात्पुरता नको तर कायमस्वरूपी हवा. त्यासाठी कायद्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. म्हणजे असे प्रकार पुढे होणार नाहीत, तरच मुक्या प्राण्यांना ‘नागरिकांचा खेळ होतो, आमचा जीव जातो’ असे म्हणण्याची वेळ येणार नाही.

Recent Posts

Ambadas Danve : काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंची वरिष्ठांकडून कानउघडणी!

अखेर विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून व्यक्त केली दिलगीरी; सभागृहातही दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी मुंबई…

6 mins ago

Eknath Shinde : दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…

39 mins ago

Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी

मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…

1 hour ago

Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…

3 hours ago

Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार

आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…

3 hours ago