कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढतच आहेत. आज पहाटेपासूनच कोल्हापूरातील कागल तालुक्यातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी सुरु आहे. तब्बल ९ तास ही कारवाई सुरु आहे. पण या गदारोळात हसन मुश्रीफ कुठे आहेत, याचं उत्तर मिळालेलं नाही.
ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कुटुंबियांकडून जबाब नोंदवून घेत आहेत. मात्र हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकत नाहीये. कागलमध्ये एवढा राडा सुरु असताना मुश्रीफ संपर्काबाहेर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.
गेल्या दीड महिन्यात सलग तिसऱ्यांदा ही छापेमारी झाली. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या ४० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी सुरु आहे. त्याच अनुषंगानं कोल्हापूर जिल्हा बँकेतल्या काही खात्यांचाही तपास करण्यात येत असून यासंदर्भात इडीने बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच जणांना ताब्यात घेतलं होतं.
दरम्यान या छापेमारीमुळे सध्या एकच खळबळ उडाली असून, मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी बंगल्याच्या बाहेर ठाण मांडून मुश्रीफ यांच्या नावे घोषणा सुरू केल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.