- गोलमाल: महेश पांचाळ
२५ डिसेंबर २०१६ रोजीची घटना. पुणे-अहमदनगर रस्त्यावर गव्हाणवाडी या ठिकाणी मोटार अपघात झाला. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत पावलेली व्यक्ती साधारणत ३५ ते ३६ वयोगटातील होती. पोलिसांनी पंचनामा केला. ज्या वाहनाने अपघात केला, ते जागेवर नव्हते. मृतदेहाशेजारी ओळख पटेल अशी कोणतेही वस्तू बेलवंडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना सापडली नव्हती. आधार कार्ड, पॅनकार्ड तत्सम कोणताही ओळख पटण्यालायक पुरावा त्याठिकाणी नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्यू पावलेली व्यक्ती आपला मुलगाच असल्याचे सांगत त्याच्या आई- वडिलांनी पोलीस ठाणे गाठले होते. मृतदेहाची ओळख पटवून रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दिनेश टाकसाळे (वय ३५) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव पोलीस डायरीत नोंद करण्यात आले. आई नंदा प्रमोद टाकसाळे, वय ५९ वर्षं आणि वडील प्रमोद टाकसाळे वय ६१ यांच्या सह्या पोलिसांनी घेतल्या होत्या. टाकसाळे कुटुंबीय हे अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती अपमृत्यू नोंद या गुन्ह्यात पोलीस दफ्तरी रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती.
आता थोडे मागे जाऊ या. दिनेश प्रमोद टाकसाळे, वय ३५ वर्षं, रा. अहमदनगर व त्याची आई नंदा प्रमोद टाकसाळे, वय ५९ वर्षं यांच्या नावे २१ एप्रिल २०१५ रोजी दिनेश टाकसाळे याने दोन कोटी रुपये रकमेची इन्शुरन्स पॉलिसी काढली होती. दिनेश टाकसाळे यांचे निधन झाले असल्याने मृत्यूचा दाखला सादर करत १४ एप्रिल २०१७ रोजी इन्शुरन्स मिळण्यासाठी एलआयसी कंपनीकडे अर्ज केला गेला. दिनेश टाकसाळे हा अहमदनगर जिल्ह्यातील असला तरी त्याची पॉलिसी मुंबईतील एका एजंटमार्फत उतरविली होती. इन्शुरन्स कंपनीने क्लेमचा अर्ज प्राप्त झाल्यांनतर चौकशी केली. त्यामधे एल.आय.सी.च्या अधिकाऱ्यांच्या चौकशीत दिनेश टाकसाळे मरण पावला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यानंतर गोखले रोड दादर (प) चे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे सहायक प्रशासकीय अधिकारी ओमप्रकाश साहू यांच्या फिर्यादीवरून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये २१ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासातही इन्शुरन्स पॉलिसी काढणारा दिनेश प्रमोद टाकसाळे हा जिवंत असल्याची माहिती समोर आली. त्यावेळी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केशवकुमार कसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश जमदाडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश राणे यांच्या पथकाने कौशल्याने तपास करून खऱ्या दिनेश टाकसाळेचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपी दिनेश हा व्यावसायिक असून डिप्लोमा इंजिनीयर आहे. हा सगळा बनाव त्याचा मित्र अनिल भीमराव लटके व विजय रामदास माळवदे यांच्या मदतीने नियोजनपूर्वक केल्याची कबुली त्याने दिली. पोलीस तपासात या प्रकरणातील सत्यस्थिती पुढे आली. त्याने पोलिसांना पोपटाचासारखा बोलून सर्व माहिती सांगितली. २०१५ मध्ये दिनेश टाकसाळे याने आठ कोटींचा इन्शुरन्स काढण्याचे ठरवले होते; परंतु एवढ्या मोठ्या रकमेचा इन्शुरन्स काढण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न दाखवावे लागते. त्यानुसार त्याने ३६ लाख शेतीतून, तर मेसमधून आठ लाख असे ४४ लाख रुपये वार्षिक उत्पन्न दाखवले. त्यासाठी त्याने दोन पॉलिसीसाठी अर्ज केला. एक पॉलिसी साडेपाच लाख रुपयांची, तर दुसरी अडीच कोटी रुपयांची काढण्याचे ठरवले; परंतु एलआयसीकडून उत्पन्नाचे स्त्रोत लक्षात घेऊन दोन कोटी रुपयांची पॉलिसी पात्र ठरली.त्यानुसार एक वर्षे तो दोन कोटी रुपयांच्या पॉलिसीचे हप्ते नियमित भरत होता.
या त्रिकुटाने इन्शुरन्स पॉलिसी काढल्यानंतर ग्रामीण रुग्णालय श्रीगोरा, जि. अहमदनगर या रुग्णालयातील रस्ते अपघातामधे मरण पावलेल्या एका बेवारस पुरुषाचे प्रेत हे दिनेश टाकसाळ असल्याचे दाखवण्याचा मोठ्या कौशल्याने प्रयत्न केला. त्यासाठी संबंधित कागदपत्रे तयार करून पोस्ट मॉर्टम नोटमध्ये दिनेशचे नाव कसे येईल याचीची काळजी घेतली.त्यानंतर या कागदपत्रा आधारे इन्शुरन्स क्लेम मिळण्यासाठी अर्ज केला. पोलीस ठाण्यात दिनेश टाकसाळे याचे जे आई-वडील दाखवण्यात आले आहेत तेही खरे नसल्याची माहिती तपासात उजेडात आल्याने पोलीसही चक्रावून गेले होते. दिनेशचे वडील हे पाच वर्षांपूर्वी वारले होते. त्यामुळे एका बेवारस मृतदेहाचा ताबा घेण्यासाठी गेलेले ते डमी आई-वडील नक्की कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. दिनेशच्या खऱ्या आईला हा प्रकार काय आहे याची कल्पना नव्हती. सदर गुन्ह्यात आणखी कोणकोणाचा सहभाग आहे याचा तपास चालू आहे. ज्या चपळाईने हा गुन्हा करण्याचे धाडस केले त्यामागे यातील मास्टरमाईड कोण याचा शोध सुरू आहे. त्यातील एकावर किरकोळ गुन्ह्याची नोंद आहे. दिनेश टाकसाळे याच्या मृत्यूनंतर दोन कोटींचा केलेला क्लेम अद्याप एलआयसीकडून मंजूर करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे हा सगळा खटाटोप करून एक दमडीही पैसा हाती मिळाला नाही. मात्र टाकसाळेचा क्लेमचा बनाव, तर उघडकीस आला आहे. आता बेवारस मृत्यूची नोंद असलेली व्यक्तीचा शोध अहमदनगर पोलिसांना नव्याने करावा लागणार आहे.
तात्पर्य : पैसे मिळविण्याच्या अनेक क्लृप्त्या बुद्धी चातुर्याच्या बळावर समाजातील हुशार मंडळी शोधून काढतात. मृत्यूचे बनाव करण्यापर्यंत मजल जाते हे या प्रकरणावरून लक्षात आले. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. ते लपून राहिले नाही. म्हणूनच जिवंत असलेल्या दिनेशचे बिंग फुटले.