Wednesday, July 17, 2024
Homeमनोरंजन...आणि करिअरचा ग्राफ उंचावत गेला

…आणि करिअरचा ग्राफ उंचावत गेला

  • टर्निंग पॉइंट: पंकज विष्णू

पंकज विष्णूची अभिनयाची घौडदौड हिंदी, मराठी मालिका, चित्रपटातून सुरूच आहे. झी मराठी वाहिनीवरील त्याची ‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिका सध्या गाजतेय. नेटफ्लिक्स वरील हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कूप’ ही माझी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘टर्निंग पॉइंट’विषयी पंकज विष्णू म्हणाला की, आपल्या आयुष्यात टर्निंग पॉइंट येत असतात, त्या वळणावर हा टर्निंग पॉइंट महत्त्वाचा ठरतो, कारण आपण त्याला म्हणतो की, मेक किंवा ब्रेक अशी ती परिस्थिती असते. तो टर्निंग पॉइंट तुम्हाला खूप पुढे नेऊ शकतो किंवा कधी कधी तो मागे नेऊ शकतो.
लहानपणी मी रत्नाकर मतकरींच्या अनेक बालनाट्यात कामे केली. तिथूनच मला नाटकात काम करण्याची आवड निर्माण झाली आणि आपण या क्षेत्रात काहीतरी करू शकतो याचा आत्मविश्वास मिळाला. मी व्यावसायिक नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी मी दादर-माटुंगा या विभागात राहत होतो. तेथे तेव्हा अनेक सांस्कृतिक ॲक्टिव्हिटी होत होत्या. नाटकाच्या तालमी, प्रयोग व्हायचे.

मी मध्यम वर्गीय कुटुंबात वाढलो. मी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होतो, त्याच वेळी प्रायोगिक नाटक व मालिका करीत होतो. माझे ग्रॅज्युएशन झाले व मी नोकरीला लागलो. त्याच वेळी चंद्रलेखा निर्मित व वामन केंद्रे दिग्दर्शित ‘रणांगण’ नाटकाची मला ऑफर आली; परंतु तेव्हा नोकरी व नाटकाची तालीम करणे हे शिवधनुष्य पेलणं तितकंच कठीण काम होतं. त्यामुळे दोन्ही दगडावर पाय ठेवणं कठीण होत चाललं होतं. आपण आता ठोस असा काही तरी निर्णय घ्यावा, असा मनात विचार आला. नाटकाकडे करिअर म्हणून पाहायचं की केवळ हौस म्हणून पाहायचं की नोकरी करायची; परंतु माझा ओढा अभिनयाकडे जास्त होता. आई-वडिलांशी मी सल्ला मसलत केली. त्यांनी सांगितलं दोन वर्षं अभिनयासाठी प्रयत्न कर. नाही जमलं, तर परत इंजिनीअरिंगच्या क्षेत्राकडे येऊ शकतो. तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. त्यानंतर नोकरी सोडून पूर्ण वेळ मी अभिनयाचे क्षेत्र निवडले. सुदैवाने त्यानंतर मला ‘रणांगण’ नाटक, ‘समांतर,’ ‘चार दिवस सासूचे,’ अशा मालिका मिळत होत्या. त्या काळात नवीन वाहिन्या येत होत्या, त्यामुळे कलाकारांसाठी कामाचा व्याप वाढत होता. पुढे अभिनयासाठी एका मागून एक संधी मिळत गेल्या व माझ्या करिअरचा ग्राफ उंचावत गेला.
दुसरा टर्निंग पॉइंट म्हणजे माझं मानसी अंतरकरशी झालेलं लग्न. हे क्षेत्र किती अस्थीर आहे, हे जाणूनसुद्धा तिने आमच्या लग्नाला संमती दिली. आयुष्यात चांगला साथीदार भेटणे खूप आवश्यक असतं, याबाबत मी भाग्यशाली ठरलो.

‘अवघाचि संसार’ ही माझी मालिका सुरू होती, त्याच वेळी मला हिंदी मालिका करण्याची संधी मिळाली. बालाजी टेलिफिल्म्सची ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत मला अभिनेता सुशांत सिंग, अंकिता लोखंडे यांच्यासोबत काम करायला मिळाले. या मालिकेला खूप नामांकने मिळाली. झी हे इंटरनॅशनल चॅनल होते, त्याचे १६० देशांत प्रसारण झाले होते. त्यामुळे अनेक देशांत ही मालिका पाहिली गेली. आम्हाला पब्लिसिटीदेखील चांगली मिळाली. परदेशात ज्यावेळी मी गेलो, तेथेदेखील प्रेक्षक मला अजित लोखंडे या व्यक्तीरेखेमुळे ओळखू लागले होते. आजदेखील ती मालिका लोकांच्या चांगलीच लक्षात राहिलेली आहे. अजून एक टर्निंग पॉइंट म्हणजे कोविडचा काळ. त्या काळात सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. अभिनय क्षेत्र व पर्यटन क्षेत्राला भरपूर फटका बसला. घरखर्च सुरू होता; परंतु इन्कम काहीच नव्हते. त्यात काहीजणांनी इन्कम कमावण्याची संधी शोधली. टर्निंग पॉइंट प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. पण त्या टर्निंग पॉइंटचा आपण वापर कसा करून घेतो, त्या संधीच आपण सोनं कसं करून घेतो हे महत्त्वाचं आहे.

शब्दांकन : युवराज अवसरमल

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -