Wednesday, July 3, 2024
Homeमहत्वाची बातमीरंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा

  • मनातले कवडसे: रूपाली हिर्लेकर

किचनमध्ये पुरणपोळीचा घाट घालून मी होळीची गाणी ऐकत एक एक काम करत होते. अन् अचानक खिडकीतून मुलाची हाक ऐकू आली , ‘आई ते बाकीचे पण रंग दे सगळे.’

लाल, पिवळा, हिरवा, निळा, केशरी असे अनेक रंग रचून ठेवलेली डिश हॉलमध्ये ठेवली होती किती छान वाटत होते हे सर्व रंग. प्रत्येक रंग वेगळा आणि ते विविध रंग पाहत असताना त्यांच एक वेगळेच वैशिष्ट्य मला वाटू लागलं.

लाल म्हणजे उत्साह,
नवीन जीवनाचा प्रतीक.
पांढरा रंग म्हणजे शांतीचं,
स्वच्छतेचे प्रतीक.
हिरवा रंग म्हणजे समृद्धीचं.
केशरी वीरतेच प्रतीक, त्यागाचे प्रतीक.
निळा धैर्याचं आणि गगनाच प्रतीक.
गुलाबी प्रेमाचं, तर पिवळा वैभवाचं.
प्रत्येक रंगात एक वेगळेपण आहे.

जीवनातही या रंगांप्रमाणे आपल्याला माणसे भेटत असतात. प्रत्येक माणसाकडून कोणता ना कोणता रंग आपल्याला मिळत असतो. काही माणसे इतकी महत्त्वाची असतात की, तिच्या असण्याने आपण प्रसन्न होतो. त्यांच्या असण्याने, त्यांच्या बोलण्याने सहकार्याने आपलं जीवन समृद्ध होत जातं. जसा हिरवा रंग समृद्धीकडे नेतो. नावीन्यता नवनिर्मिती देतो, तशीच काहीजण आपल्या आयुष्यात नावीन्य आणून आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊन जातात.

कार्यालयातील आपले सहकारी, अधिकारी, बॉस यांच्या मार्गदर्शनाने आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवतात. पिवळ्या रंगाप्रमाणे आपल्या आयुष्यात वैभव आणतात. आपण खूप दुःखी असलो, तर आपले मित्र-मैत्रिणी आपल्याला आधार देतात. दिलासा देऊन समजावतात. ते कळत-नकळत निळ्या रंगाप्रमाणे आपल्याला धैर्यशील बनवत असतात.

काळा रंग हा भयानकतेच, भीतीच प्रतीक आहे. कधी-कधी काही माणसांच्या जवळच काय पण त्यांना दुरून जरी पाहिलं तरी वाटतं यांच्या आसपासही जायला नको. त्याचं असणं नकोस वाटतं. ती नकारात्मकता नको असं वाटू लागतं, ते सतत दुसऱ्यांचा द्वेष, दुसऱ्यांची निंदा करत असतात. नकोसं वाटतं त्यांच्याबरोबर राहणं पण त्यांचाही असण्याला एका प्रकारे अर्थ आहे, कारण जर अशी माणसंच नसती, तर चांगुलपणा कसा बरं उठून दिसला असता!

‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हणतात. निंदक असतील, तर आपण आपल्या चुकांवर काम करून योग्य बदल घडवून उत्तम बनू शकतो. पण, ज्याप्रमाणे काळा रंग एकीकडे भीतीच प्रतीक आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे तो आनंदाच ही प्रतीक आहे. कारण सौभाग्याच लेणं मंगळसूत्र हेही काळ्या मण्यांनीच बनतं. संक्रांतीत स्त्रिया काळी साडी परिधान करतात. त्याचप्रमाणे कधी कधी माणसांची एक बाजू आपल्याला नकारात्मक वाटते. पण जर त्या माणसांच्या अशा वागण्याचा दुसऱ्या अंगाने विचार केला, तर त्यांचा चांगुलपणाही आपल्याला दिसून येतो.

आणि ज्या माणसाशिवाय आपण राहूच शकत नाही. ज्यांची सोबत आपल्याला सतत हवीहवीशी वाटते. आपण बेधडक त्यांच्यासमोर बोलू शकतो, वागू शकतो. सगळं बिनधास्त सांगूही शकतो. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. अशी प्रेम देणारी व्यक्ती असल्याने आपलं आयुष्य गुलाबी करून टाकते.

या रंगांप्रमाणे अनेक नाती अनेक माणसं आपल्याला भेटतात. माणसं ही रंगांप्रमाणेच असतात काही स्वार्थी माणसं सरड्याप्रमाणे रंग बदलून आपलं काम काढून घेत स्वतःचा फायदा बघत असतात, तर काही माणसं स्वतःचं आणि स्वतःबरोबर दुसऱ्याचाही उद्धार करून आयुष्य रंगवून जातात. काहींच्या नुसत्या सहवासाने, असण्याने आजूबाजूचं सारं सुंदर वाटू लागतं.

‘फुलासंगे मातीचा वास लागे’ फुलाचा सुगंध मातीलाही मिळतो, त्याचप्रमाणे काही सज्जन व्यक्तींच्या संगतीत दुसरेही सतकर्म करू लागतात. जेव्हा अनेक लोक एकत्र येतात त्यांच्यातले चांगले गुण, त्यांच्यातील वैशिष्ट्य एकत्र येतात तेव्हा एखाद्या महान कार्यची निर्मिती होते जणू आकाशात सप्तरंगाचे इंद्रधनू अवतरते.

सगळ्यात वेगळेपण म्हणजे अशी काही माणसं असतात, जी अनेक काम करतात. अनेक ठिकाणी ते त्यांच्या कार्यातून त्यांचा ठसा निर्माण करत असतात. सगळीकडे सगळ्यात असूनही त्यांचे वेगळेपण जाणवतं. त्यांच्या गुणांनी, त्या वेगळेपणाने ते सगळ्यांपेक्षा वेगळे आणि छान वाटू लागतात. अशी माणसं फार निराळीच असतात म्हणूनच ती फार दुर्मीळ असतात. मनस्वी असतात. या सर्व विचारात असताना माझा मुलगा धावत आला अन् त्या थाळीतील रंग हातात घेऊन माझ्या गालावर लावत म्हणाला, ‘आई हॅप्पी होली!!

एवढा वेळ मी स्वतःला सर्व रंगांपासून दूर ठेवत होते. पण ते सर्व रंग एकत्र येऊन माझ्यात मिसळले गेले. तेव्हा मला माझी मीच वेगळी भासले अन् मला सुरेश भटांच्या गजलेची आठवण करून गेले.

‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा,
गुंतूनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा’.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -