सांगली (वार्ताहर) : सांगलीमध्ये रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत असल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. दरम्यान सांगलीमध्ये रासायनिक खत खरेदी करताना झालेल्या या प्रकाराबद्दल केंद्राला कळवणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
जात विचारून खते देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला असून यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत केंद्राला कळवणार असल्याची प्रतिक्रिया दिली. शेतकरी आणि सभागृहाची भावना लक्षात घेऊन याबाबत आम्ही केंद्राला कळवणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
दरम्यान गुरुवारी ज्या प्रकारे अर्थसंकल्प मांडला आहे, त्यामुळे विरोधकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती समजून घ्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले. रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकऱ्यांना पॉस मशीनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारून खत देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. सांगली जिल्ह्यात सहा मार्चपासून शेतकऱ्यांसाठी जातीची अट बंधनकारक करण्यात आली आहे.