नवी दिल्ली : देशात H3N2 इन्फ्लूएंझा या विषाणूचा उद्रेक झाला आहे. या व्हायरसने भारतात दोन जणांचा बळी घेतल्याची माहिती आरोग्य अधिकार्यांनी दिली आहे. यापैकी पहिला मृत्यू कर्नाटकात तर दुसरा हरियाणामध्ये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोविड (COVID) आणि H3N2 प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझाची ९० प्रकरणे समोर आली आहेत तसेच H1N1 चे आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अहवालांनुसार आतापर्यंत दोन प्रकारचे इन्फ्लूएंझा विषाणू आढळून आले आहेत.
H3N2 व्हायरस म्हणजे काय?
H3N2 विषाणू हा श्वसनासंबंधी विषाणूजन्य संसर्ग आहे. इन्फ्लूएंझा ए विषाणूचा हा उपप्रकार १९६८ मध्ये मानवांमध्ये सापडला. इंस्टिट्यूट ऑफ इंटरनल मेडिसिन, रेस्पिरेटरी अँड स्लीप मेडिसिन येथील वैद्यकीय शिक्षणाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, या काळात H3N2 विषाणू दरवर्षी वेगाने संक्रमित होतो. शिंका किंवा खोकल्याद्वारे पसरतो.
H3N2 व्हायरसपासून कसे संरक्षण करावे
कोणत्याही विषाणूजन्य संसर्गापासून दूर राहण्यासाठी प्रथम लसीकरण आवश्यक आहे. नियमित अंतराने साबणाने हात धुवून आपला परिसर स्वच्छ ठेवा. आजारी असलेल्या किंवा मास्क घातलेल्या लोकांशी संपर्क टाळा. जर तुम्हाला शिंक येत असेल किंवा खोकला येत असेल तर फेस मास्क घाला किंवा तोंडावर हात ठेवा कारण व्हायरल इन्फेक्शन्स संसर्गजन्य आहेत.