Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यआर्थिक फसवणूक कशी केली जाते?

आर्थिक फसवणूक कशी केली जाते?

  • अभय दातार: मुंबई ग्राहक पंचायत

बँक खातेदारांची आर्थिक फसवणूक झाल्याबद्दलच्या अनेक बातम्या सातत्याने वर्तमानपत्रात येत असतात. असे असूनही हे प्रकार बंद अथवा कमी झाले, वाचक अधिक सावध झाले, असे फारसे दिसून येत नाही. कारण एक प्रकार वापरून झाला की आर्थिक गुन्हेगार काहीतरी नवीन शक्कल लढवतात आणि फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधून काढतात. एटीएम कार्ड किंवा बँक खाते ब्लॉक केल्याचा संदेश, विजेचे बिल भरले नसल्याने वीज पुरवठा खंडित केला जाईल, असा संदेश, केवायसी अद्ययावत करा म्हणून संदेश, हे फसवणूक करणारेच असतात. हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग लोकपाल कार्यालयातर्फे ‘आर्थिक फसवणूक किती आणि कशा प्रकारे केली जाते’ यावर एक अतिशय माहितीपूर्ण आणि उपयुक्त पुस्तिका छापली आहे. आजच्या लेखात आपण या पुस्तिकेत सांगितलेल्या बँकिंगसंबंधी प्रकारांचा ऊहापोह करणार आहोत.

बनावट संकेतस्थळे आणि लिंक्स – या प्रकारात मूळ अधिकृत संकेतस्थळाच्या नावात लहानसा बदल करून त्याच्याचसारखे दिसणारे बनावट संकेतस्थळ तयार केले जाते. त्याच्याशी जोडलेल्या बनावट लिंक्स एसएमएस, समाजमाध्यमे इत्यादींमार्फत सगळीकडे पसरवल्या जातात. बरेच जण फसून या लिंक उघडतात आणि आपली माहिती उघड करतात. तिचाच वापर करून गुन्हेगार बँक खाते साफ करतात. याला ‘फिशिंग’ असे नाव आहे. त्यामुळे खात्री करून घेतल्याखेरीज कोणतीही लिंक उघडू नये.
फसवे फोन कॉल्स – असे फसवे कॉल्स करणारे गुन्हेगार स्वत: बँकेचे अथवा विमा कंपनीचे अधिकारी आहोत, असे भासवून आपला विश्वास संपादन करण्यासाठी आपले नाव, जन्मतारीख, यासारखा तपशील सांगतात आणि गोड गोड बोलून इतर माहितीही काढून घेतात. जोडीला तितक्याच गोड शब्दात काहीतरी भीती दाखवतात आणि मदत करायचा आव आणतात. ते इतकी घाई करतात की आपण त्यांच्या बोलण्यात गुंततो आणि नको ती, म्हणजे अर्थातच त्यांना हवी ती माहिती देऊन बसतो. याला ‘व्हिशिंग’ असे म्हणतात. कोणतीही बँक, विमा कंपनी, आपली माहिती विचारत नाही, हे पक्के लक्षात ठेवावे आणि सावध राहून असा फोन कट करावा.

विक्री करणाऱ्या संकेत स्थळांचा गैरवापर – काही संकेतस्थळे वापरून आपण आपल्याकडील जुन्या वस्तू, जुनी कार विकता येईल का ते पाहतो. गुन्हेगार आपण खरेदीदार असल्याचा बहाणा करून खरेदी करण्यात स्वारस्य दाखवतात आणि यूपीआयद्वारे पैसे आपल्याला पाठवण्याऐवजी पैसे मिळण्याचा पर्याय वापरतात. लगेच दूरध्वनीवरून पिन विचारतात. वस्तू विकली गेल्याच्या आनंदात आपण विसरतो की पिन हा पैसे देण्यासाठी असतो, घेण्यासाठी नाही. पिन दिला गेल्यावर साहजिकच आपल्या बँक खात्यातून रक्कम काढली जाते आणि मगच आपण फसवले गेल्याचे ध्यानात येते. त्यामुळे कोणतेही आर्थिक व्यवहार करताना संपूर्ण लक्ष त्या व्यवहारावर केंद्रित करा. आपण काही चुकीचे करत नाही ना, हे तपासून पाहा आणि मगच व्यवहार पूर्ण करा.

कोणतीही माहिती नसलेल्या मोबाइल अॅपचा वापर – वरीलप्रमाणेच बँकेतील अधिकारी असल्याचा बहाणा करून एखादे अॅप आपल्या मोबाइलवर अथवा संगणकावर डाऊनलोड करायला सांगितले जाते. त्यासाठी एसएमएस अथवा समाजमाध्यमांचा उपयोग करून एखादी लिंक पाठवली जाते. सकृतदर्शनी अधिकृत वाटणारी ही लिंक प्रत्यक्षात एखाद्या बनावट संकेतस्थळाकडे घेऊन जाते. एकदा का हे अॅप डाऊनलोड झाले की आपल्या मोबाइल / संगणकाचा संपूर्ण ताबा घेऊन गुन्हेगार आवश्यक ती माहिती चोरतात आणि आपले बँक खाते साफ करतात. त्यामुळे कुणी सांगितले म्हणून कोणतेही अॅप डाऊनलोड करू नका.

एटीएममधून माहितीची चोरी – या प्रकारात गुन्हेगार एटीएममध्ये गुपचूप एक विशिष्ट प्रकारचे उपकरण बसवतात. ग्राहक जेव्हा आपले कार्ड वापरतो, तेव्हा हे उपकरण कार्डाचा सगळा तपशील गोळा करते. कधी कधी गुन्हेगार आपल्यामागे उभे राहून आपल्याला मदत करायच्या बहाण्याने सर्व तपशील काढून घेतात. तो वापरून बनावट कार्ड तयार केले जाते आणि त्याद्वारे आपल्या खात्यातील पैसे काढले जातात. आपले कार्ड सहजगत्या मशीनमध्ये जात आहे ना ते तपासावे. संशय आल्यास बँकेत तक्रार करावी. आपला पिन वापरताना तो इतरांना दिसणार नाही अशा प्रकारे की-बोर्ड हाताने झाकावा. आजूबाजूला कुणी असेल, तर त्यांना सौम्य भाषेत दूर उभे राहण्याची विनंती करावी.

सर्च इंजिनवरील माहितीत हेतुपुरस्पर बदल करणे – बरेच जण एखादा संपर्क क्रमांक मिळवण्यासाठी संबंधित कंपनीचे अथवा बँकेचे अधिकृत संकेतस्थळ पाहण्याऐवजी गुगलसारख्या सर्च इंजिनचा वापर करतात. या ठिकाणी दिलेले संपर्क क्रमांक कुणीही बदलू शकतो. असे संपर्क वापरल्यास फसगत होण्याची भीती असते. समोरची व्यक्ती खरी आहे, असे वाटून आपण काही तपशील देतो आणि तो वापरून आपली फसगत केली जाते. त्यामुळे सर्च इंजिनऐवजी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हवी ती माहिती मिळवावी.

क्यूआर कोड – गुन्हेगार काही ना काही बहाण्याने आपल्या मोबाइलवर क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करायला सांगतात. तसे केले की आपल्या खात्यातून पैसे काढून घेणे त्यांना सोपे जाते. जेव्हा रक्कम कोणाला द्यायची असते, तेव्हाच क्यूआर कोड वापरावा लागतो. पैसे मिळण्यासाठी नव्हे, हे पक्के ध्यानात ठेवावे.

सार्वजनिक ठिकाणी केलेले मोबाइल चार्जिंग – मोबाइलची बॅटरी संपत आली आणि आपण सार्वजनिक ठिकाणी असलो, की साहजिकच तेथील मोबाइल चार्जिंगचा लाभ घेतो. पण अशा ठिकाणी काही विशिष्ट केबल्सद्वारे आपल्या मोबाइलमधील तपशील चोरला जाऊ शकतो. याला ‘ज्यूस जॅकिंग’ असे म्हणतात. त्यामुळे शक्यतो अशा ठिकाणी मोबाइल चार्जिंग करू नये. जर आपल्याला अशा चार्जिंगची वारंवार गरज पडत असेल तर पॉवर बँकसारखे उपकरण वापरावे. ते अधिक सुरक्षित आहे.

वरील सर्व प्रकारात महत्त्वाचे म्हणजे कधीही पिन तसेच ओटीपी आणि इतर माहिती कोणालाही देऊ नये. पुढील लेखात आपण फसवणुकीचे इतर प्रकार पाहू.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -