सावंतवाडी ( प्रतिनिधी ): डी. के. सावंत म्हणजे पर्यटन क्षेत्रातील चालते बोलते विद्यापीठ होते. पर्यटन क्षेत्रात सातत्याने नवनवीन संकल्पना राबविणारे ते खरे पर्यावरण आणि पर्यटन अभ्यासक होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनातून खऱ्या अर्थाने विकास व्हावा, नवनवीन पर्यटन केंद्रे सुरू व्हावीत व माध्यमातून देश विदेशातील पर्यटक जिल्ह्यात यावेत व जिल्ह्याची आर्थिक भरभराट व्हावी अशी त्यांची नेहमीच तळमळ असे. आज त्यांच्या जाण्याने पर्यटन क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे, असे भावोद्गार मुख्यमंत्री कार्यालयाचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी सतीश पाटणकर यांनी काढले.
सावंतवाडी रेडी मार्गावरील डी. के. रेसिडेन्सी येथे पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व स्वर्गाय डी. के. सावंत यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सतीश पाटणकर यांच्यासह उपस्थित सर्वांनीच डी के यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.बापू गव्हाणकर, ॲड. नकुल पार्सेकर, माजी सभापती प्रमोद सावंत, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, भाई देऊलकर, अशोक देसाई, कॉनबॅकचे संचालक मोहन होडावडेकर, अभिलाष देसाई, सेवानिवृत्त प्राचार्य अन्वर खान, बाळ बोर्डेकर, दीनानाथ सावंत, माजी जि.प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, नंदू तारी, आबा कोटकर, विनोद सावंत, शामकांत काणेकर, रामदास पारकर, जेष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, अभिमन्यू लोंढे, प्रा. रूपेश पाटील, दिलीप वाडकर, गुंडू साटेलकर, माजी उपसभापती शितल राऊळ, लायन्स क्लबचे अध्यक्ष विद्याधर तावडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सुधीर धुमे, डी. के. सावंत यांच्या पत्नी शिवांगी सावंत, मुलगा शिवप्रसाद सावंत, कन्या शिवप्रिया सावंत, सून सेजल सावंत आदी उपस्थित होते.
स्व. डी. के सावंत यांना श्रद्धांजली वाहताना पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले की, डी. के. सावंत म्हणजे पर्यटनाचा प्रचंड अभ्यास आणि विकासाचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व होते. आज त्यांच्या जाण्याने आपल्या जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.
बाबा मोंडकर म्हणाले, डी. के. म्हणजे आमच्या जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्ती होते. अत्यंत ध्यास घेतलेली व्यक्ती आज हरपली. पर्यटन विकास संस्थेचे ते सर्वात आदर्श असे मार्गदर्शक होते.
सेवानिवृत्त प्राचार्य अन्वर खान यांनीही स्वर्गीय सावंत यांच्या बद्दल आदर युक्त भावना अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे म्हणाले की, डी. के सावंत यांनी आपल्या जीवनात कायमस्वरूपी संघर्षाच्या विरोधात लढा दिला. कोकण रेल्वे प्रवासी संघटना व कोकणातील पर्यटन क्षेत्रात त्यांनी मुजोर अधिकारी व प्रशासन यांच्या विरोधात शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला.
यावेळी उपस्थित असलेल्या अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे – परब म्हणाल्या की, डी के सावंत यांच्या रूपाने आपण कोकणातील एक पर्यटन क्षेत्रातील महान रत्न गमावले आहे त्यांची उणीव सदैव जाणवेल मात्र त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण सतत काम केल्यास त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चितच त्यांच्या आत्म्यास शांती लाभेल.यावेळी उपस्थित असलेले पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद सावंत, प्रा.रूपेश पाटील, शामकांत काणेकर, प्रसन्ना कोदे, सुधीर धुमे यांनी आपल्या मनोगतात स्व. सावंत यांच्या विषयी आदरभावना व्यक्त करीत शब्दसुमनांजली अर्पण केली. शोकसभेचे सूत्रसंचालन व समारोप ॲड. नकुल पार्सेकर यांनी केला.