Tuesday, April 22, 2025
Homeमहत्वाची बातमीबदलते ऋतू; बेभरवशाचे हवामान

बदलते ऋतू; बेभरवशाचे हवामान

  • डॉ. श्वेता चिटणीस

महाराष्ट्रात अवकाळी पावसाने ऐन होळीच्या दिवशी हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. भारतात ऋतुचक्रानुसार शेतकरी पेरणी, कापणी करीत असतात. धान्य विक्रीसाठी तयार होते, फळे पक्व होतात त्या सुमारास सण साजरे केले जातात. जगभरात सुद्धा आपापल्या देशाच्या ऋतूप्रमाणे सण साजरे होतात; परंतु यावेळेस होळीच्या दिवशी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले. काही वर्षांपूर्वी आम्ही ख्रिसमसच्या सुट्टीत लंडनला होतो. तेव्हा तेथे सर्व जण वाट पाहत होते (शुभ्र)व्हाइट ख्रिसमसची. तेथे ख्रिसमसच्या सुमारास बर्फ पडतो आणि चोहीकडे प्रसन्न, सर्वत्र शुभ्र वातावरण होतं; परंतु त्या वर्षी लोकांना बर्फाशिवाय ख्रिसमस साजरा करावा लागला, म्हणून काहीसे नाराजीचे वातावरण होते. स्वित्झर्लंड इथे ह्या वर्षी खूप कमी बर्फ पडल्यामुळे स्की (ski) करण्यासाठी असलेले काही रिसॉर्ट बंद झाले.

विषुववृत्तापासून ४-११ डिग्री दक्षिणेस असलेल्या छोट्या बेटांचा सुंदर देश आहे सेशेल्स. ह्या द्वीपसमूहाची भौगोलिक रचना विषुववृत्ताजवळ असल्यामुळे तेथे क्रिसमसच्या वेळेस पाऊस असतो. तेथे लोक वेट क्रिसमस अर्थात ओलाचिंब पाऊस आणि दाट हिरवळीच्या सान्निध्यात क्रिसमस साजरा करतात; परंतु आम्ही गेलो त्यावर्षी तेथे ख्रिसमसच्या सुमारास अजिबातच पाऊस पडला नव्हता आणि लोक पावसाची आतुरतेने वाट बघत होते. तर असे हे बदलते हवामान आणि त्याचे चटके जगभर बसत आहेत. अशा विषम परिस्थितीत उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर बर्फ विरघळतोय आणि समुद्रात बर्फाचे पाणी मिसळून पाण्याची पातळी वाढते आहे. कार्बन उत्सर्जन समुद्राचे तापमान वाढवते, जेणेकरून बर्फात आणि पाण्यात राहणारे प्राणी विस्थापित होतात. जैव विविधतेचा समतोल ढळल्यावर, त्या भागात राहणारे मानव विस्थापित व्हायला वेळ लागणार नाही.

मानवाने निसर्गचक्रात हस्तक्षेप करून हे बदल घडवले आहेत. त्यात हे वर्ष एल निनोचे आहे. त्यामुळे भारतात कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई इत्यादी बदल घडण्याची शक्यता आहे. तापमान नेहमीपेक्षा वाढल्यामुळे शेतात रोगराई पसरणे, कीटकांचा प्रादुर्भाव होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

मुळात हे एल निनो आहे तरी काय? एल निनो आणि ला नीन्या हे सागरी प्रवाह आहेत. सोळाव्या शतकात ख्रिसमसच्या सुमारास काही खलाशी पाण्यात बोटी घेऊन गेले असताना त्यांना समुद्रावरील पृष्ठभागाचे तापमान वढल्याचे जाणवले. तसेच पॅसिफिक महासागरात काही उष्ण प्रवाहही जाणवले. या प्रवाहाचे नामकरण एल निनो असे त्यांनी केले. एल निनो म्हणजे स्पॅनिश भाषेत लहान मुलगा. ह्या उष्ण प्रवाहांमुळे भारतात कमी पाऊस पडतो किंवा दुष्काळी परिस्थिती उद्भवते. ह्याउलट आहे ला निन्या. स्पॅनिश भाषेत ला निन्या म्हणजे लहान मुलगी. ला निन्याच्या प्रभावाखाली भारतात पाऊस पडतो आणि थंडीचा प्रभाव वाढतो. समुद्रात उष्णता आणि गारवा निर्माण करण्याचे कार्य हे दोन प्रवाह आळीपाळीने करीत असतात. हे बहीण-भाऊ अर्थात एल निनो आणि ला निन्या आपले हवामान त्यांच्या प्रभावाखाली बदलत असतात. दर दोन किंवा सात वर्षांनी समुद्रात हे प्रवाह उद्भवतात. उष्ण आणि दुष्काळी हवामान एल निनोमुळे होते आणि शीत हवामान ला निन्यामुळे होते.

आपण ह्या दोन्ही सागरी प्रवाहांचा प्रभाव कमी करू शकतो. प्रदूषण नियंत्रणात आणून केवळ जीवाश्म इंधनाचा वापर न करता सौर ऊर्जा, पवनचक्क्यातून निर्माण होणारी ऊर्जा, पाण्यातील लाटा आणि प्रवाहांमुळे निर्माण होणारी ऊर्जा ह्यांचा वापर वाढवल्यामुळे आपण वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करू शकतो. रोगराईचा प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेऊ शकतो. टिकाऊ विकासकामे मार्गी लावू शकतो. थोडक्यात पर्यावरणास पूरक आणि टिकाऊ जीवनशैलीचा वापर करून आपण विषम हवामान, अवकाळी पाऊस ह्यांनी होणारे नुकसान नक्कीच कमी करू शकतो.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -