उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान
- प्रिया बैरागी
निफाड : ऐन होळीच्या दिवशीच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाडला प्रचंड तडाखा बसलेला असून द्राक्ष, गहू, कांदा, हरभरा, टोमॅटो या सर्वच पिकांचे मोठे नुकसान आले आहे. त्यानंतर सलग तीन दिवस पाऊस पडल्याने प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
हवामान तज्ज्ञांकडून ५ मार्चपासून ८ मार्चपर्यंत संपूर्ण परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. हा अंदाज चुकावा अशी प्रत्येक जण प्रार्थना करीत होता मात्र काही उपयोग झाला नाही. सोमवारच्या पहाटे दोन वाजेपासूनच निफाड परिसरात प्रचंड मेघ गर्जना व विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे चार तास कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसतच राहिला.
जोरदार वारा आणि तुफानी पाऊस यामुळे अनेक ठिकाणी कापणीला आलेल्या गव्हाचे पीक आडवे पडल्याचे दिसून येत आहे. हजारो शेतकऱ्यांचे विक्रीला आलेले द्राक्षाचे पीक देखील संकटात सापडले असून बागायतदारांची वर्षभराची मेहनत एका तडाख्यात नष्ट झाले आहे. एका बाजूला उन्हाचा चटका बसून द्राक्षांची गुणवत्ता ढासळू नये यासाठी द्राक्ष घडाना खूप मोठा खर्च करून कागदाचे आवरण चढवावे लागते. लावलेला कागद पावसाच्या चार थेंबांमध्येच खराब होऊन जातो त्यामुळे इतका प्रचंड खर्च करून लावलेला कागद आणि त्यासाठी केलेले श्रम तर वाया जाणार आहेतच शिवाय या द्राक्ष घड्यांना आता बुरशी जीवाणूजन्य रोग आणि इतर गोष्टींचा सामना करावा लागून प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.
चौकट –
द्राक्ष बागांचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळी पावसाचा फटका नाशिकमध्ये विशेषत: द्राक्ष बागांना बसला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नाशिक तालुक्यातील बेळगांव ढगा परिसरात गारपीट झाल्याने निर्यातक्षम द्राक्षाला मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे निर्यातक्षम द्राक्षांचे नुकसान झाले असून ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बागा जगवण्यासाठी मोठा खर्च केला, तो खर्च होऊनही अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात बागेचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.