Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअवकाळी पावसाचे अस्मानी संकट

अवकाळी पावसाचे अस्मानी संकट

होळीत अग्नीच्या ज्वाळा पेटवल्या गेल्या. होळीनंतर खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झाली, असे मानले जाते; परंतु होळीच्या दिवशी महाराष्ट्राच्या अनेक भागांत अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. तापलेल्या जमिनीवर पावसाच्या सरींचा शिडकाव झाल्याने, ग्रामीण भागात वातावरणात थोडा थंडावा आल्याचा तात्पुरता आनंद मिळाला असला तरी, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेतात, तशी पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. होळीच्या दिवशी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कांदा हा खरेदीभाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतातच जाळल्याच्या मन विषण्ण करणाऱ्या घटना घडल्या. लासलगावच्या बाजारपेठेत ग्राहकांना विक्रीसाठी असलेला कांदा हा ३० रुपये किलोपेक्षा कमी भावाने मिळत नाही. मात्र तोच कांदा शेतकऱ्यांकडून दोन रुपये, तीन रुपये आणि पाच रुपये किलो दराने खरेदी केला जातो.

नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा विकत घेतला जातो, असा दावा केंद्र आणि सरकारकडून केला जात असला तरी त्यावर शेतकऱ्यांचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये झालेली ‘तू तू मै मै’ही लपून राहिलेली नाही. नुसता कांदा नव्हे तर गहू, द्राक्षे, डाळिंब, सफरचंद, कोंथिबीर, हरभरा आदी पिकांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोंथिबिरीच्या जुडीला एक रुपया खरेदी भाव मिळत नाही म्हणून कोथिंबिरीच्या जुड्या नाशिकच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकल्या. जो शेतकरी काबाडकष्ट करून पीक काढतो, त्याच्यावर सध्या ही वेळ का आली आहे याचा विचार सरकारने करायला हवा. आधीच शेतीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशात शेती व्यवसाय मातीमोल भावामुळे मरणासन्न झाला आहे. त्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करताना दिसत आहे. शासनही याची दखल घेत नसल्याने आणखी एक धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात समोर आला आहे. तो म्हणजे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी निषेध म्हणून चक्क संपूर्ण गावच विकण्याचा निर्णय घेतला. कुठल्याही शेतीमालाला भाव नाही. आत्महत्या करण्यापेक्षा उदरनिर्वाहासाठी जमिनी विकून जगता यावे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ गाव विकण्याचा एकमताने ठराव केला. यात केंद्र, राज्य शासनाने आमच्या जमिनी घेऊन आम्हाला पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी या शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे. हे सगळे ऐकताना राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना निश्चित वाईट वाटत असेल. तसेच खान्देशात गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान घातले.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील माळमाथ्यावरील दुपारी चारच्या सुमारास खोरी गाव परिसरात वादळीवाऱ्यांसह गारांचा जोरदार वर्षाव झाला. यामुळे शेतात, रस्त्यांवर सर्वत्र गारांचा खच पडला होता. परिणामत: शेतातील पिके आडवी झाली आणि अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा तोंडचा घास या गारपिटीने हिसकावला आहे. कापणीवर आलेल्या गहू, हरबरा, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने खोरीसह टिटाणे, इंदवे, निजामपूर, जैताणेसह माळमाथा परिसरात रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरबरा ही पिके काढणीवर आली असताना शेतकऱ्याच्या हातातून गेली, तर काढणीवर आलेला कांदा सडून नुकसान होणार आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला गारपिटीचा, तर शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांना अवकाळी पावसाचा हा फटका दहा हजार शेतकऱ्यांना बसला आहे. सुमारे ८१५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने भेट देऊन अवकाळी पावसाच्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी चर्चा केली व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. जळगाव जिल्ह्यात देखील १५ तालुक्यांत दहा हजार हेक्टरमधील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यात धरणगाव, एरंडोल, चोपडा या तालुक्यात पिकांचे विशेष नुकसान झालेले आहे. गहू, मका या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून सूर्यफूल, हरबरा, केळी या पिकांना देखील त्याचा फटका बसला असून पिके आडवी झाली आहेत. जळगाव जिल्ह्यात मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटलांना नुकसानीची पाहणी करण्यास वेळ मिळालेला नाही.

राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार येथे ७६० हेक्टरचे नुकसान झाले असून नाशिक जिल्ह्यात २६८५ हेक्टरचे नुकसान झाले. धुळे येथे ३१४४ हेक्टर, नंदूरबार येथे १५७६ हेक्टर, जळगाव येथे २१४ हेक्टर, अहमदनगर येथे ४१०० हेक्टर, बुलढाणा येथे ७७५ हेक्टर, तर वाशीम जिल्ह्यात ४७५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, अशी सरकारी दफ्तरातील माहिती आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आला असून त्यांना तत्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. तरी ही मदत या शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर देऊन त्यांना संकटातून सावरण्याची जबाबदारी मायबाप सरकारची आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -