कीर्तन, आरती, पालखी सोहळ्यात नागरिकांचा सहभाग
देहू नगरी (वार्ताहर) : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस म्हणजेच ३७५ व्या तुकाराम बीजच्या निमित्ताने गुरुवारी लाखो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहू येथे दाखल झाले होते.
संत तुकाराम महाराजांनी ज्या स्थळावरून वैकुंठगमन केले, त्या स्थळावर नांदुरकी नावाचा वृक्ष आहे. तुकाराम बिजेला दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी नांदुरकी वृक्ष प्रत्यक्ष हलतो, याची अनुभूती वारकरी आणि भाविकांना येते, असे सांगितले जाते. त्यामुळे या वृक्षाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वारकरी प्रामुख्याने शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. यंदा झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. याच वातावरणात शेतकरी तुकोबारायांना साकडं घालणार आहे.
या सोहळ्याची कीर्तनाने सुरुवात, तुकोबारायांच्या पादुकांची आरती, तसेच काही अंतरावर असलेल्या तुकारामांच्या वैकुंठ गमन मंदिरात पालखी काढण्यात येणारी पालखी असा आयोजित कार्यक्रम पाहता या कार्यक्रमात नागरिक सहभागी होताना दिसून येतात. यावेळी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांपर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर, वारकऱ्यांच्या समजुतीप्रमाणे नांदुरकी वृक्ष थरारला की तुकोबा सदेह वैकुंठ गमनास गेले असा त्याचा अर्थ होतो.
सोहळ्यासाठी मोठा बंदोबस्त
या सोहळ्यासाठी एक अप्पर पोलीस आयुक्त, एक पोलीस उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, २५ सहायक पोलीस निरीक्षक, १३० पोलीस कर्मचारी, दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दोन शीघ्र कृतिदल असा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच बॉम्बशोधक पथक, श्वान पथक आणि साध्या वेशात ५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.
वारकरी देहूत दाखल
या बीजोत्सवासाठी शेकडो वारकरी देहूत दाखल झाले. कोरोनामुळे दोन वर्ष हा सोहळा होऊ शकला नाही मात्र मागच्या वर्षी हा सोहळा दिमाखात पार पडला. यंदाही या देदीप्यमान सोहळ्यासाठी हजारो वारकरी देहूत दाखल झाले. यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यंदा झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. येणारे वर्ष नीट जाऊ दे, असे म्हणत तुकोबा चरणी शेतकरी विलीन होत, भजनांनी सगळा परिसर यावेळी दुमदुमला.