पहिल्या दिवसाअखेर ऑसींच्या २५५ धावा; शमीने घेतल्या २ विकेट
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : सलामीवीर उस्मान ख्वाजाचे नाबाद शतक आणि त्याला मिळालेली कॅमेरॉन ग्रीनची (नाबाद ४९ धावा) अप्रतिम साथ या बळावर पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर ४ फलंदाजांच्या बदल्यात २५५ धावा जमवत आश्वासक सुरुवात केली. मोहम्मद शमीने दोन, तर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत ऑसी फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या गोलंदाजांना त्यात फार यश आले नाही.
नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेडने ६१ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला छान सुरुवात करून दिली. हेडला सहाव्या षटकात संजीवनी मिळाली. विकेटकीपर केएस भरतने उमेश यादवच्या चेंडूवर त्याचा झेल सोडला होता. मात्र, १६व्या षटकात अश्विनने त्याला ३२ धावांवर जडेजाकरवी झेलबाद केले. त्यानंतर मोहम्मद शमीने मार्नस लॅबुशेनचा त्रिफळा उडवत पाहुण्यांना दुसरा धक्का दिला. कर्णधार स्टीव्ह स्मिथने संयमी खेळ दाखवला. त्याने १३५ चेंडूंचा सामना करत ३८ धावा जमवल्या. जडेजाने स्मिथला क्लीन बोल्ड केले. पीटर हँड्सकॉम्बला अवघ्या १७ धावा जोडता आल्या. हँड्सकॉम्बच्या रुपाने शमीनेच भारताला दुसरी विकेट मिळवून दिली. त्यानंतर मात्र उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन जोडगोळीने चांगली भागीदारी करत कांगारूंच्या धावफलकावर अडिचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. सलामीवीर उस्मान ख्वाजा नाबाद १०४ धावांवर खेळत आहे. ख्वाजाने १४ वे कसोटी शतक झळकावले आहे. कॅमेरॉन ग्रीन ४९ धावा करून मैदानात तळ ठोकून आहे.
पंतप्रधान मोदी-अल्बानीज यांनी दिली रोहित-स्मिथला कॅप गिफ्ट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मैत्रीला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारच्या सामन्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे स्टेडियममध्ये उपस्थित होते. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी सामन्यापूर्वी आपापल्या संघाच्या कर्णधारांना विशेष कॅप गिफ्ट म्हणून दिली. याचे फोटो आणि व्हीडिओ जोरदार व्हायरल झाले आहेत. नाणेफेकीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पीएम अल्बानीज हे खास रथावर स्वार होऊन मैदानात फिरले आणि त्यांनी प्रेक्षकांचे स्वागत केले. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी अँथनी अल्बानीज यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच, गोल्फ कार्टमध्ये बसून संपूर्ण मैदानाची चक्कर मारली