कोकणातील बेकार असलेल्या तरुणांना शेतीत काम करायला नको. त्यांना कष्टाचं काही करायलाच नको. त्यांना फक्त गजाली आणि आयतं मिळायला हवं, असे टोमणे गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्याच घरातील हा सूर असायचा; परंतु गेल्या काही वर्षांत शेतीत राबणारे अनेक तरुण दिसतात. शेती क्षेत्रात प्रायोगिकता राबवून अरे, हे देखील शक्य आहे. हे अगदी राजकीय भाषेत सांगायचे तर करून दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. शेतीमध्ये राबण्यासाठीचे वातावरण कोकणात नाही आहे. भातशेतीतून फार तर वर्षभर पुरेल इतकाच भात पिकवण्याची मानसिकता आहे. गावातील कुठल्याही कुटुंबात किती मुडी आणि कणगी भरून भात आहे, त्यावर त्यांच्या घरची श्रीमंती ठरवण्याचे मोजमाप फार पूर्वी होते. या भातशेतीतून फार मोठा काही फायदा होत नाही, असे अंकगणित मांडतच या पूर्वीच्या पिढीतील गाववाले, नोकरी-धंदा शोधण्यासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरात गेले आणि तिथेच स्थिरावले. यामुळे कोकणात शेतीत थांबणाऱ्यांची आणि राबणाऱ्यांची संख्या कमी-कमी होत गेली. मधल्या कोरोनाच्या दोन-तीन वर्षांत शहरात राहणे कठीण झाले. त्यांनी आपल्या गावी राहणे पसंद केले.
यातूनच भातशेती करण्यात आली. भातशेतीचे क्षेत्र वाढले. शेतकऱ्यांनी भातपीक घेताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भातशेती केली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. भाताला चांगला दर मिळाला. निव्वळ भातशेती करून आपल्याच घरात मुडी आणि कणग्या भरून न ठेवता त्यातून पैसे कमावले पाहिजेत, हे एक नवे तंत्र या भातशेतीत तयार झाले आहे. भातशेतीचा तोट्याचा हिशोब कणकवलीतील संदीप राणेसारख्या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिला आहे. आंबा, काजू, कोकम, कलिंगड अशा सर्वच बाबतीत कोकणात प्रयोग होत आहेत. ग्रामीण भागात तरुण शेती क्षेत्रातही काही करू पाहतोय; परंतु त्याला अडवण्याचे, त्याचे नुकसान करण्याचे काम वन्यप्राण्यांकडून होत आहे. दोडामार्ग तालुक्यात तर गेली पंधरा-वीस वर्षे हत्तींचा वावर आहे. भातशेतीतून हत्ती एकदा फिरून गेले की, त्या शेतीत शेतकरी पाय ठेवण्याची हिंमतही करीत नाही. माकडांची आता माकडचेष्टा म्हणून उरलेली नाही, तर माकडांचा एवढा प्रचंड उपद्रव वाढलाय की, माकड काय करू शकतात, याचा आपण अंदाजही बांधू शकत नाही. ग्रामीण भागात सकाळी कुटुंबीय शेतात काम करायला जातात, घराला कुलूप असते; परंतु माकडांचा कळप त्या घराच्या छप्परांची कौले काढून खाली उतरतात. जे जेवण बनवून ठेवलेले असते ते अक्षरश: खाऊन उलट-सुलट करून टाकतात. घराशेजारी असणाऱ्या माडांवर नारळ शिल्लकच ठेवत नाहीत. नारळ कोवळे असतानाच तोडून टाकतात. केळींच्या बागेतही यापेक्षा वेगळा अनुभव नाही. आंबा, काजूंच्या बागायतीत गवारेड्यांचा वावर आहे. कोकणात आता गवारेडे कुठे नाहीत, तो गाव शोधावा लागेल. पूर्वी गगनबावडा किंवा फोंडा घाटातून कोल्हापूरला जाता-येता गवारेडे गाड्यांच्या आडवे आले, असे ऐकायला मिळायचे; परंतु आता तर गवारेडे गावोगावी कळपाने फिरत आहेत. आंबा, काजूच्या बागायतीमध्ये गवारेडे येत असल्याने सध्याच्या काजू हंगामातही काजू बागेत महिलांना आणि शेतकऱ्यांना जाणे धोक्याचे झाले आहे. गवारेड्यांकडून, हत्तींचा शेतकऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रकारही घडत आहेत आणि वाढतही आहेत. अपार कष्टाने उभी केलेली फळबागायत गवारेडे हत्तींच्या येण्याने होत्याचे नव्हते होते. आपणच कष्टाने उभी केलेली शेती, बागायत नष्ट होताना पाहावी लागते तेव्हा कोकणातील शेतकरी हे सारं हतबलतेने पाहत असतो. वनविभागाचे अधिकारी जेव्हा एखाद्या वन्यप्राणी मृतावस्थेत आढळून आला की, त्याचे सोपस्कार करतात. आजच्या वनविभागाकडे यासंबंधीची कोणतीही यंत्रणा नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीसंबंधी आ. नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित करून विधिमंडळात चर्चा घडवून आणली होती. त्यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंबंधी आमदार व प्रशासकीय अधिकारी यांची एक समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये आ. नितेश राणे यांचा समावेश करण्यात आला. वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या उपद्रवासंबंधी कोणता उपाय करता येईल, याचीही चर्चा या समितीत होईल. शेतकऱ्यांचे जे नुकसान होतेय त्यासंबंधीही संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या बागायतींमध्ये येणारे वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या घरांपर्यंत येत आहेत. वन्यप्राण्यांचा हा वाढलेला वावर आणि त्यांचा असलेला उपद्रव शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा आहे. शेतकरी आपले दु:ख कोणालाच सांगता येणारा नाही, जंगलात वन्यप्राण्यांना खाण्यासारखे काही उरले नाही म्हणून वन्यप्राणी शेतात आणि मानवी वस्तीत येत असल्याचे सऱ्हास विधान करतात. कोणी कोणाच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केले हा विषय वादातीत असला तरीही आजच्या घडीला शेतकऱ्याला बागायत आणि भातशेती अवघड झाली आहे.
एकीकडे जागतिक भरड धान्याला जगभरात महत्त्व आले आहे. भरड शेतीला प्राधान्य देण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला तरीही त्यांना वन्यप्राण्यांपासून हे भरड धान्य वाचेल, याची शाश्वती नाही. अशा या विचित्र स्थितीत कोकणातील शेतकरी रडकुंडीला आलाय. कलिंगडांच्या बागायतीत गवारेडे फिरून गेल्यावर काय अवस्था होते हे मागील वर्षी हिर्लोक भागातील कलिंगड बागायत उद्धवस्त केलेली पाहिली आहे. विक्री योग्य तयार झालेल्या बागेत गवारेडा फिरून गेला, त्यानंतर तो शेतकरी त्या बागेत कलिंगड काढायलाच गेला नाही. एवढं सारं गवारेड्याने उद्धवस्त केलं होतं. यामुळे तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे. शेती केली पाहिजे, हे जरी खरं असले तरीही वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या या उपद्रवाने कोकणातील शेतकरी रडतोय, ही वास्तवताही आहे.
santoshw2601@gmail.com
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…