स्नेह राणाकडे नेतृत्वाची कमान
मुंबई (प्रतिनिधी) : दुखापतीचा फटका गुजरात जायंट्सला बसला असून त्यांची कर्णधार बेथ मुनी महिला प्रीमियर लीगमधून बाहेर पडली आहे. तिच्या जागी स्नेह राणाकडे गुजरातच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. तर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅश्ले गार्डनरची नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना दुखापतग्रस्त मुनी रिटायर हर्ट झाली होती. एक झेल घेण्याच्या प्रयत्नात तिच्या पायाचा गुडघा फिरला. त्यानंतर संघाची कमान उपकर्णधार स्नेह राणाकडे होती. दरम्यान बेथ मुनीला संपूर्ण महिला प्रीमियर लीगमधून बाहेर पडावे लागले आहे. तसेच मुनीच्या जागी लॉरा वोल्वार्डचा संघात समावेश करण्यात आला आहे. गुजरात जायंट्सच्या फ्रँचायझीने गुरुवारी ही माहिती दिली. बेथ मूनीला गुजरात फ्रँचायझीने २ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
सलगच्या दोन पराभवांनंतर स्नेह राणाच्या नेतृत्वाखाली गुजरात महिला संघाने बुधवारी स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात विजय साजरा केला. गुजरात संघाने सामन्यात स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा ११ धावांनी पराभव केला.