Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीमहिला, शेतकरी अन् कष्टकऱ्यांसाठीचा अर्थसंकल्प सादर

महिला, शेतकरी अन् कष्टकऱ्यांसाठीचा अर्थसंकल्प सादर

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकसेवकांच्या पगारात केली डब्बल वाढ

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अर्थमंत्री म्हणून हा पहिलाच अर्थसंकल्प होता, यामध्ये त्यांनी शेतकरी आणि महिलांना समोर ठेवत विशेष घोषणा केल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचला गेला.

शेतकऱ्यांना १२ हजार रुपयांचा निधी देत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात षट्कार लगावला. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारने भर टाकली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत राज्य सरकार प्रतीवर्ष प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार रुपये देणार आहे. केंद्राचे ६ हजार आणि राज्याचे ६ हजार असे मिळून शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. याचा फायदा १. १५ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे, यासाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना फक्त १ रुपयामध्ये पीक विमा मिळणार आहे. आधीच्या योजनेत विमा हफ्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती, आता शेतकऱ्यांवर कोणताच भार पडणार नाही. राज्य सरकार आता हा हफ्ता भरणार आहे. शेतकऱ्यांना फक्त १ रुपया भरायचा आहे.

२०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देणार. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिला. १२.८४ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ६८३ कोटी रुपये थेट जमा केले. अपघातग्रस्त शेतकऱ्यांना २ लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाईल.

महिलांसाठी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी विशेष तरतुदी केल्या आहेत. आता महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सूट मिळणार आहे. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ मिळणार आहे. यापुढे जन्मानंतर प्रत्येक मुलीला ५ हजार रुपये. त्यानंतर पहिल्या इयत्तेत गेल्याव ४ हजार रुपये, सहावीत ६ हजार रुपये मिळणार आहे. तर अकरावीत ८ हजार रुपये मिळणार आहे. यात सर्वात महात्वाचा निर्णय म्हणजे मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५ हजार रुपये मिळणार आहे.

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनानंतर मोठा दिलासा देत राज्यसरकारने अंगणवाडी सेविका तसेच आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात आशा स्वयंसेविकांचे मानधन ३ हजार ५०० रुपयांवरुन तब्बल ५ हजार रुपये केले आहेत. गटप्रवर्तकांचे मानधन ४ हजार ७०० रुपयांवरुन ६ हजार २०० रुपये इतके केले आहे. तर महत्वाची घोषणा म्हणजे अंगणवाडी सेविकांचे मानधन ८ हजार रुपयांवरुन तब्बल १० हजार रुपये केले आहे.

या तरतुदींमध्ये मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ६ हजार वरुन ७ हजार २०० रुपये तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४ हजार ४२५ वरुन तब्बल ५ हजार ५०० रुपये केले आहे. दरम्यान, राज्यसरकार आता अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २० हजार पदे भरणार आहे. त्यासोबतच अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली सुरु करण्यात येणार आहे.

सामान्यांच्या आरोग्यसेवांमध्येही सरकारने मोठा दिलासा दिला आहे. यात महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार आहे. यात नवीन २०० रुग्णालयांचा यात समावेश करण्यात येणार आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ २.५० लाखांहून ४ लाखांपर्यंत नेण्यात येणार आहेत तर राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत.

गुढी पाडव्याचा आनंद आणखी गोड करत सरकारने गुढीपाडव्याला १ कोटी ६३ लाख शिधाधारकांना आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली आहे. सरकारने अर्थसंकल्पात शिक्षणसेवकांना भरघोस मानधन देत तब्बल १० हजार रुपयांची वाढ केली. अशाप्रकारे दहावी बारावीच्या परिक्षांच्या पार्श्वभूमीवर संपावर केल्या गेलेल्या शिक्षकसेवकांवरुन विरोधकांनी केलेल्या राजकाराणाला सरकारने अर्थसंकल्पातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -