‘प्रहार’च्या कार्यालयात महिला दिन साजरा
मुंबई (प्रतिनिधी) : पहिल्या महिला बेस्ट ड्रायव्हर लक्ष्मी (माधुरी) जाधव यांचा चालक होण्यापर्यंतचा खडतर प्रवास, डॉ. वीणा खाडिलकर यांनी केलेले किर्तनमय वातावरण, तंत्रज्ञानाच्या सध्याच्या युगात सोनाली पाटणकरांसारख्या सायबर तज्ज्ञांचे मौलिक विचार अशा एकापेक्षा एक दिग्गज महिलांसोबतच्या चर्चांनी दैनिक ‘प्रहार’चे कार्यालय अक्षरश: दणाणून गेले होते. जागतिक महिला दिनानिमित्त दैनिक ‘प्रहार’च्या मुंबईतील वांद्रे येथील कार्यालयात विविध क्षेत्रातीय यशस्वी महिलांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी या महिलांनी आपली संघर्षगाथा, चांगले-वाईट अनुभव, कायम लक्षात राहणारे, तर काही कटू प्रसंग, थक्क करणाऱ्या आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या.
यावेळी दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. संपादकीय विभागाच्या प्रियानी पाटील आणि जाहिरात विभागाच्या स्नेहल राणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी मुख्य लेखा व्यवस्थापक ज्ञानेश सावंत, जाहिरात विभागाचे वरिष्ठ विभागीय अधिकारी किशोर उज्जेनकर, जाहिरात विभागाच्या कल्पना घोरपडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय किर्तनकार डॉ. वीणा खाडिलकर यांच्या संवादाने झाली. त्यामुळे सुरुवातीचे वातावरण अगदी आध्यात्मिक झाले होते. घरातील वातावरण किर्तन क्षेत्राकडे वळविणारे होते, त्यामुळे किर्तनकार नसते झाले तर आश्चर्य असते, असे त्यांनी सांगितले. जे वय खेळायचे असते, मनाला समजही आलेला नसतो अशा चार ते पाच वर्षांच्या वयात सुभाषिते पाठांतराला आली. किर्तन, संगीत, संस्कृत असे अवतीभतीचे वातावरण लहानपणापासून होते. वडिलांनी लहापणापासून जे संस्कार घडवले त्यामुळेच खऱ्या अर्थाने मी घडले, असे त्या आवर्जून सांगतात.
पीएचडीमध्ये मरीन बायोलॉजी आणि पाणपक्षी हा अभ्यास होता. त्यासाठी प्रोटेक्टेड घरात वाढलेले असतानाही शिवडी सारख्या निर्जन वस्तीत अवेळी जाण्याचे प्रसंग अनेकदा आले. महिला म्हणून सुरुवातीला एकटे जाताना भीती वाटायची. पण नंतर सवय झाली. पक्षी येईपर्यंत वाट पहायची. ते आले की त्यांचे फोटो काढायचे. त्यांचा अभ्यास करायचा, अस सर्वसामान्यांसाठी वेगळ्या असणाऱ्या विषयामधील आपले अनुभव डॉ. श्वेता चिटणीस यांनी कथन केले.
मुलींनी फार शिकू नये, ठराविक वेळेत लग्न करावे असा विचार अनेक पालकांचा असतो. परंतु माझे वडिल उदार विचारांचे होते. मुलींनी शिकावे, त्यांना पुढे काही अडचणी येऊ नयेत, हा त्यामागील वडिलांचा उद्देश असल्याचे भांडुप महावितरणच्या जनसंपर्क अधिकारी ममता पांडे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातले शिक्षण, शाळेत असतानाच आपण मोठे व्हावे असे स्वप्न उराशी बाळगले होते. लेखनाची आवड होती. कुटुंबाची तशी फारशी चांगली परिस्थिती नव्हती, मात्र तरीही मेहनत करून इथपर्यंत पोहचले असल्याचे पनवेल महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी सांगतात.
नोकरीचा विचार कधीही केला नव्हता. परंतु शिक्षण असल्यामुळे मी घरी बसू नये असे माझ्या यजमानांना वाटायचे, तसा करियर करण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला. नोकरीमध्ये निम सरकारी ते कॉर्पोरेट समूह असा प्रवास अदानी इलेक्ट्रीकलच्या जनसंपर्क अधिकारी नीता डोळस यांनी अनुभवला आहे. त्यामुळे सरकारी आणि खासगी सेक्टरमधील कामाचे अनुभव त्यांनी सांगितले.
मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढायला हवी, अशी मागणी मुलुंडमधील आर.आर.एज्युकेशन ट्रस्ट मराठी प्राथमिक शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गीतांजली भोसले यांनी केली. सहाय्यक शिक्षिका अपूर्वा पवार यांनी मराठी शाळांना सुगीचे दिवस येण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश घेण्यास प्रवृत्त करत असल्याचेही त्या म्हणाल्या.
सध्या इंटरनेटच्या जगात फसवणुकीचे बरेच प्रकार समोर येतात. अशा वेळी जबाबदारीने इंटरनेट कसे वापरायचे, त्याकरिता कोणती काळजी घ्यायची अशा सध्याच्या काळातील प्रत्येकासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन सायबर तज्ज्ञ सोनाली पाटणकर यांनी केले.
मुंबईतील बेस्टच्या पहिल्या महिला बस चालक लक्ष्मी जाधव यांनी बस चालक होण्यापर्यंतचा आपला खडतर संघर्ष सांगितला. आपल्याला बस चालक का व्हावेसे वाटले व त्याच जिद्दीने व चिकाटीने आपण ते स्वप्न पूर्ण कसे याची उत्तरे त्यांनी आपल्या बिनधास्त शैलीत दिली.
चेंबूरमधील रिक्षा चालक सुशीला देश नेहारे यांनी महिला रिक्षा चालक म्हणून त्यांना येणारे अनुभव सांगितले. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात जास्तीत जास्त महिलांनी यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ऐतिहासिक चित्रपटांची लाट आणि त्याच्याशी संबंधित अनेक अफलातून किस्से यावेळी मनोरंजन क्षेत्रातील जनसंपर्क अधिकारी प्रियंका भोर यांनी सांगितले. ऐतिहासिक चित्रपटांकडे प्रेक्षक कशा पद्धतीने पाहतात, तसेच ऐतिहासिक चित्रपटांबद्दल प्रेक्षक किती संवेदनशील असतात याबद्दल त्या व्यक्त झाल्या.
मुंबई अग्निशमन दलात पहिल्या महिला अग्निशमन म्हणून मान मिळवलेल्या निर्मला ढेंबरे व रोहिणी आव्हाड यांनी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण जीवन ते मुंबई अग्निशमन दलातील अग्निशमन असा प्रवास सर्वांसमोर उलगडला. तसेच आग विजवताना आलेले वेगवेगळे किस्से त्यांनी सांगितले. आग विजवताना व लोकांचे जीव वाचवताना आलेले थरारक अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.