अहमदाबाद (वृत्तसंस्था) : ‘खरं सांगू का ज्यावेळी तुम्ही दोन सामने जिंकता त्यावेळी बाहेरचे लोक समजतात की आमच्यात अतिआत्मविश्वास निर्माण झाला आहे. हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. आम्ही सर्व चारही सामन्यात आमचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो, अशा शब्दांत भारताचा कर्णधार रोहित शर्माने भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना प्रत्युत्तर दिले आहे.
रवी शास्त्रींनी भारतीय संघ इंदूर कसोटी हरल्यानंतर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी भारतीय संघ अतीआत्मविश्वासामुळे हरला असे म्हणाले होते. यावर रोहित शर्माने चौथ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला कडक शब्दातच प्रतिक्रिया दिली. त्याने हे वक्तव्य मूर्खपणाचे असल्याचे सांगितले.
रवी शास्त्री यांनी समालोचन करताना भारताच्या पराभवावर वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, ‘हा थोडा आत्मसंतुष्टपणा आणि अतिआत्मविश्वासचा परिणाम आहे. संघाने गोष्टी गृहीत धरल्या. तुम्ही निष्काळजीपणा केला त्यांनी तुम्हाला पराभूत केले.’
रोहित शर्माने दीड वर्ष रवी शास्त्रींवर बोलताना संयम बाळगला होता. मात्र त्याला रवी शास्त्रींनी तिसऱ्या कसोटीचे केलेले विश्लेषणाबाबत विचारण्यात आले त्यावेळी त्याने कडक शब्दांचा वापर केला.