पुणे: सोशल मिडियाची क्रेझ एका महिलेच्य जीवावर बेतली आहे. मात्र यात दोष तिचा नसून टिकटॉकवर रिल्स बनवणाऱ्या सोशल मिडिया स्टारचा आहे. तो त्याच्या दुचाकीवर रिल बनवण्यात इतका गुंग होता की त्याच्या दुचाकीने वाटसरु महिलेला धडक दिली आहे.
ही घटना पुण्यातील मंमदवाडी परिसरात घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तस्लिम फिरोज पठाण असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात महंमदवाडी येथे ६ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.या प्रकरणी पोलिसांनी आयान शहानुर शेख आणि झाइद जावेद शेख या दोन रिल्स बनवणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयान आणि झाइद हे दोघे बाईकवरून जात असताना रिल्स बनवत होते. त्यावेळी घरी परतणाऱ्या पठाण यांच्या दुचाकीला आयान आणि झाइद यांच्या गाडीची धडक बसली. घटनेवेळी शेख हा गाडी चालवत होता. तर, झाइद हा व्हिडिओ काढत होता. ज्या ठिकाणी हा अपघात घडला तेथे फारशी रहदारी नसते. त्यामुळे आयान आणि झाइद हे दुचाकी चालवताना स्टंट करत रिल्स बनवत होते. त्यावेळी पठान यांच्या गाडीला जोरदार धडक बसली. ज्यात पठान यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आयान आणि झाइद यांनी पळ काढला.
तपासात रिल्स बनवताना हा अपघात घडल्याचे समोर आल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, तरूणांमध्ये वाढती रिल्सची क्रेझ एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतल्याने तरूणांना या जाळ्यातून वेळीस बाहेर काढणे अत्यंत गरजेचे झाले आहे हेच या घटनेवरून अधोरेखित होत आहे.