कोहिमा : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा संघर्ष पाहता हे दोघे कधी एकत्र येतील याची शक्यता वाटली नाही. पण नागालँडमध्ये चमत्कार घडलाय. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन नागालँडमध्ये सत्तास्थापन करणार आहेत. दरम्यान, राज्याच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
नागालॅंडमधील नुकत्याच झालेल्या निवडणूकांमध्ये मध्ये रिओ यांच्या आणि भाजपच्या आघाडीला ६० पैकी ३७ जागा मिळाल्या होत्या. तसेच यामध्ये ६० पैकी ७ जागा मिळवून याठिकाणी राष्ट्रवादी हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. पण त्यानंतर राष्ट्रवादीने रिओ यांच्याशी असलेले संबंध आणि राज्याच्या हिताचा विचार करून भाजप, एनडीपीपीसोबत आता सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागालॅंडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी दिली.
तसं पाहिलं तर नागालॅंड हे अतिशय छोटं राज्य आहे. विधानसभेच्या येथे फक्त ६० जागा आहेत. पण तेथे राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची चर्चा होणं साहजिक आहे. आता तेथे भाजप, एनडीपीपीसोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसदेखील सत्तेमध्ये सहभागी होणार आहे.