मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या कर्तृत्वाने नवे क्षितीज गाठू पाहणाऱ्या वैशाली जोशी या मैदानावरच्या रणरागिणीचा मल्लखांबाचा लक्षवेधी प्रवास जाणून घेताना विलक्षण जिद्द, कठोर व अविरत परिश्रम, जबरदस्त आत्मविश्वास याचा सुरेख समन्वय दिसून येतो. व्यवसायाने आर्किटेक्ट असणाऱ्या वैशाली यांचा मल्लखांबाचा प्रवास त्यांच्या वडिलांच्या प्रेरणेतून सुरू झाला. व्यवसाय आणि खेळ याची अचूक सांगड घालत या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या दमाच्या तरुणांना त्यांच्याकडून बरंच काही शिकता येण्यासारखे आहे.
वेगवेगळ्या प्रसंगात कुटुंबाकडून आपल्या प्रत्येकालाच माया, दिलासा, शाबासकी, धीर, पाठिंबा असे बरेच काही मिळालेले असते. आपल्या कुटुंबाकडून मिळालेल्या याच पाठिंब्यावर वैशाली खेडकर-जोशी यांनी मल्लखांबाचा लक्षवेधी प्रवास साध्य करत प्रत्येक ‘ती’ ला आत्मबलाची दिशा दाखविली. आपल्या वडिलांचा आदर्श ठेवत आजही मल्लखांबाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्या कार्यरत आहेत. वैशाली यांचे वडील सुधाकर खेडकर वयाच्या ८०व्या वर्षीही मल्लखांब खेळताहेत. एवढंच नाही तर वैशाली यांचा मुलगा शार्दुलही मल्लखांबाचे धडे गिरवत आहे. मल्लखांबाच्या अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत, रशियात भारताचे प्रतिनिधित्व करून अनेक सन्मान वैशाली यांनी मिळवले आहेत. वैशाली यांचे वडील आणि मुलगा यांनीही अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. नुकत्याच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे उज्जेन येथे झालेल्या ‘खेलो इंडिया २०२३’ या स्पर्धेत दोन रौप्य आणि एक कांस्य पदक शार्दूलने मिळवले आहे. माझे आजोबा माझ्या आईसाठी प्रेरणा ठरले तर माझी आई माझ्यासाठी. आमचे नाते आई-मुलाचे असले तरी मैदानात आम्ही एकमेकांचे स्पर्धक आणि मार्गदर्शक असल्याचे तो सांगतो.
आपल्या या वेगळ्या प्रयत्नाबद्दल वैशाली सांगतात, काहीतरी वेगळे करण्यासाठी तुमच्या आयुष्यात, तुमच्या करिअरमध्ये अनेक प्रेरणादायी गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक अनुभव तुम्हाला काही देऊ पाहत असतो, तुमच्यात सूक्ष्म का होईना, पण काहीतरी बदल घडवण्याची क्षमता त्यात असते. माझ्या लहानपणापासून माझ्या आई – वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणेने १९८७ सालापासून मी मल्लखांबाचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. आज एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतरही प्रशिक्षणार्थी याच नात्याने नव्या जोमाने प्रत्येक स्पर्धेत मी सहभागी होत असते.
मल्लखांब क्षेत्रात काही तरी अभिनव प्रयोग व्हावेत, आजच्या तरुण पिढीने धाडसाने यात काही करावे यासाठी वैशाली यांची धडपड सुरू आहे. याचा एक भाग म्हणून ‘महाराष्ट्र मल्लखांब असोसिएशन’च्या वतीने ज्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यात विशेष रोख पारितोषिकासह त्यांच्या वडिलांच्या नावाचे खास मानचिन्ह त्यांनी गेल्यावर्षी पासून द्यायला सुरुवात केली आहे. आपले मोलाचे मार्गदर्शन येणाऱ्या पिढीला मिळावे यासाठी विविध लेख तसेच खेळाविषयीच्या चर्चासत्रांमधून वैशाली यांनी मल्लखांबाची दोरी सक्षम करण्याचा ध्यास घेतला आहे.