- इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या जाहीर सभेनंतर या पक्षाचे भवितव्य यापुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात आहे, हे स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यापासून भाजप व शिंदे गटावर रोज आसूड मारत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटातील कोणीच पक्ष सोडला नव्हता, दुसऱ्या पक्षात विलीनही झाले नाहीत, उलट आम्ही शिवसेनेतच आहोत, असा घोशा एकनाथ शिंदे यांनी सतत चालवला होता. दहा अपक्षांसह पन्नास आमदार व तेरा खासदार यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारल्यापासून उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. सतत गद्दार म्हणून त्यांची संभावना करीत आहेत. ‘महाराष्ट्र पिंजून काढणार’ अशी त्यांनी घोषणा गेल्या आठ महिन्यांत अनेकदा केली. मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यातही त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढणार, असे जाहीर केले होते. ज्या दिवशी निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले, तेव्हा मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर आले आणि कलानगरच्या बाहेर मोटारीवर उभे राहून त्यांनी संताप प्रकट केला. तेव्हाही त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याची भाषा केली होती. त्यानंतर खेडला उबाठाची सभा झाली. सभेला गर्दी चांगली जमवली होती. शिवाजी पार्क, वरळी किंवा खेड, सभांना गर्दी चांगली झाली. पण गर्दीवरून यशाचे गणित मांडता येत नाही. उबाठाच्या सभेला बाहेरून मोठ्या संख्येने लोक आणले जातात हे काही गुपित राहिलेले नाही. खेडच्या सभेलाही वेगवेगळ्या वाहनांतून मुंबई-कोकणातून मोठ्या संख्येने लोक जमवले गेले होते. इतकेच काय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या सभेला आपली रसद पाठवली होती. नाव उबाठाचे. पण सभेची गर्दी महाविकास आघाडीची होती. खेडमधील गोळीबार मैदानावरील सभेत व्यासपीठावर सर्वात जास्त चमकत होते, ते भास्कर जाधव. याच जाधवांनी उद्धव ठाकरे आपल्याला भेट देत नाहीत म्हणून काही वर्षांपूर्वी मातोश्रीच्या बाहेर थयथयाट केला होता, त्यांनी ठाकरेंच्या विरोधात केलेल्या ठणठणाटाचे थेट प्रक्षेपण अनेक वृत्तवाहिन्यांनी दाखवले होते. हेच भास्कर जाधव पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले व तेथे त्यांनी शरद पवारांच्या चरणी निष्ठा अर्पण केली. प्रदेशाध्यक्ष झाले, मंत्री झाले, नंतर पवारांना धोका देऊन पुन्हा मातोश्रीच्या दारात परतले. आता ते उबाठाचे मुख्य प्रवक्ते असल्यासारखे ओरडून बोलत असतात. ठाकरे सरकारच्या काळात विधानसभेत पीठासीन अधिकारी असताना त्यांनी भाजपच्या डझनभर आमदारांना दीर्घ काळ निलंबित केले होते, ही त्यांची मर्दुमकी. पुढे सर्वोच्च न्यायालयाने आमदारांवरील कारवाई रद्द केली.
खेडच्या व्यासपीठावर सुषमा अंधारे होत्या. त्याही राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच उबाठात आल्या. याच सभेत माजी आमदार संजय कदम यांचा उबाठात प्रवेश झाला. तेही राष्ट्रवादीतून आले. व्यासपीठावर जो काही आवाज होता तो राष्ट्रवादीतून आलेल्यांचा होता. सभेला जमलेल्या गर्दीत स्थानिक खेड-चिपळूण-दापोलीचे किती होते व बाहेरून आलेले किती होते, यावर कोणी बोलणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत कोकणाने शिवसेनेला नेहमीच ताकद दिली. कोकणी माणूस हा शिवसेनेच्या पाठीशी सुरुवातीपासून भक्कम उभा राहिला. शिवसेनेचा विस्तार करण्यात, गावागावांत पोहोचविण्यात नारायण राणे, छगन भुजबळ अगदी राज ठाकरे यांची मेहनत, परिश्रम, संघटन कौशल्य व करिष्मा आहे. उद्धव हे वारंवार आपण शिवसेनाप्रमुखांचे पुत्र असा उल्लेख करतात, पण हे सर्वांना ठाऊक आहे. ते त्यांचे वडील होते. पण शिवसेनाप्रमुख हे तमाम लक्षावधी शिवसैनिकांचे होते, महाराष्ट्रातील जनतेचे होते, याचा उद्धव यांना विसर पडत असावा. खेडच्या व्यासपीठावरून माजी खासदार अनंत गीते यांनी सभेला उपस्थित असलेल्या गर्दीला एक शपथ म्हणायला लावली. सर्वांनी हात वर करून मुठी आवळून शपथ घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही आजन्म राहू, पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याचे तंतोतंत पालन करू, ज्या मातोश्रीने ४० लांडग्यांना व १३ कोल्ह्यांना राजकीय जन्म दिला, त्यांना आगामी निवडणुकीत महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू… गंमत म्हणजे स्वतः उद्धव हेही हात वर करून मूठ आवळून शपथ घेताना दिसले… खेडची सभा अनंत गीते यांच्या मतदारसंघात होती. याच मतदारसंघात त्यांचा २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांच्याकडून तो पराभव पत्करावा लागला. चार वेळा खासदार व केंद्रात मंत्रीपद भोगलेल्या गीतेंचे भवितव्य काय? उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलासा देणारा एक शब्दही उच्चारला नाही. याचा अर्थ गीते यांना येत्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांचा प्रचार करावा लागणार व त्यांच्यासाठी मते मागत फिरावे लागणार? सर्वात कहर म्हणजे याच अनंत गीते यांनी काही काळापूर्वी आम्ही शरद पवारांना नेता मानत नाही, आमचे नेते केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आहेत, असे जाहीरपणे म्हटले होते. ज्यांनी उद्धव ठाकरे यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसवले त्यांना आपण मानत नाही, असे जाहीरपणे म्हणण्याचे धाडस गीते यांनी केले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे, उदय सामंत, दीपक केसरकर, रामदास कदम सारे नेते गप्प बसले होते. याच खेडच्या व्यासपीठावरून संजय कदम आमदार झाले पाहिजेत, असे माजी राष्ट्रवादीवाले सांगतात, ते ऐकून गीते यांना आपले पुढे काय होणार? याची चिंता वाढली असेल.
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला म्हणून उबाठाला उकळ्या फुटल्या. पण कसबा किंवा चिंचवडला उबाठाला महाआघाडीने फक्त वापरून घेतले. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यासाठी पक्षप्रमुखांनी ऑनलाइन भाषण दिले होते. कोल्हापूरलाही आपला उमेदवार आघाडीसाठी मागे घेतला होता. यापुढे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जे देईल, त्यावरच उबाठाला समाधान मानावे लागणार आहे. कारण भाजपकडे परतण्याचे दोर स्वतः उद्धव ठाकरे यांनीच कापून टाकले आहेत.
नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे, रामदास कदम, उदय सामंत, दीपक केसरकर, भरत गोगावले, अशी कोकणातील मोठी ताकद आज उबाठाकडे नाही. जे कोकणात उरले आहेत त्यांनाच स्वतःसाठी हातपाय मारावे लागत आहेत. उद्धव ठाकरे यांना स्वतःला विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी काय काय करावे लागले होते, हे सर्व महाराष्ट्राला ठाऊक आहे. ज्यांचा ते आज द्वेष-मत्सर करतात, त्यांनी मदत केली नसती, तर त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहणे तेव्हा कठीण झाले होते. मनाविरुद्ध निर्णय गेला म्हणून निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्याला मान्य नाही, असे सांगत त्यावर दुगाण्या झाडणे कोणत्या लोकशाहीत बसते? शिवसेनाप्रमुख हयात असतानाही सेनेचे कधी शंभर आमदार निवडून आले नव्हते. एकनाथ शिंदे व त्यांची फौज, नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे हे शक्तिमान नेते कोणीही उबाठाबरोबर नाहीत. मग पक्षाचे भविष्य काय…? अमित शहांना मोगॅम्बो म्हणायचे. शिवधनुष्य पेलणार नाही, उताणे पडाल असे एकनाथ शिंदेंना धमकावायचे. देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून टाकेन अशी भाषा वापरायची. भाजपला कुत्रेही विचारत नव्हते असे हिणवायचे. गद्दार, तोतये, मिंधे, कोल्हे, लांडगे, चोर संबोधायचे. रोज तेच तेच आरोप, ऐकून जनता कंटाळली आहे. रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे शंभर वेळा खेडला आले तरी योगेशचा पराभव होणार नाही. नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा तुमची घाबरगुंडी उडाली होती, …पिवळी झाली होती, जीभ हासडण्याची धमकी देता, हिम्मत आहे का?
उबाठाकडे विधानसभेत केवळ १५ आमदार आणि लोकसभेत पाच खासदार उरले आहेत. उबाठाची महाआघाडीत सौदेबाजी करण्याची ताकद कमी झाली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मनात निस्सीम आदर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा द्वेष करणाऱ्यांचे ऐकून पक्ष चालविण्याची वेळ पक्षप्रमुखांवर आली, हेच मोठे दुर्दैव आहे.